पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिक्सिंग आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. एवढंच नाही तर संघ आणि आयसिसचा काही संबंध आहे का? ते मोहन भागवतांनी सांगावं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा संघावर निशाणा साधला आहे. सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या भेटीमागे काही अर्थ काढू नका भेट सहजच घेतली होती त्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची पंढरपूर येथे जाहीर सभा झाली. या सभेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदी पुन्हा येणे गरजेचे आहे असे वक्तव्य केले होते. हे योग्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आंबेडकर म्हणाले ,पुलवामाची माहिती सरकारला होती. मात्र केंद्राने त्यासंदर्भात दक्षता घेतली नाही. इम्रान आणि मोदींचे एकदाही पटले नाही आणि पुढेही पटेल असे वाटत नाही. हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे असा आरोप त्यांनी केला. तर पुढे जाऊन याबाबत आता मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि आयसिसचा काही संबध आहे का ? ते स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.

दरम्यान,सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या बाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे एका ठिकाणी प्रचार करून थांबले होते. त्या ठिकाणाहून मी पण आलो मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काही मिनिटात ते एकीकडे गेले आणि मी माझ्या मार्गाने गेलो. साधी भेट झाली आमची असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.