Kolkata Law Student Rape Case: कोलकातामधील विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बलात्कर प्रकरण ताजे असतानाच कोलकातामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार झाल्यामुळे विरोधकांनी राज्यातील सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान या प्रकरणावर विधान करत असताना तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला जात आहे. “जर एखाद्या मित्राने मैत्रीणीवर बलात्कार केल्यास काय करू शकतो?”, असे विधान बॅनर्जी यांनी केले आहे.

कल्याण बॅनर्जी हे सेरामपूर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. कोलकाता बलात्कार प्रकरणावर बोलत असताना त्यांनी महिलांना घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

माध्यमांशी बोलत असताना कल्याण बॅनर्जी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. एखादा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा करत असेल तर अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी, असा प्रश्न बॅनर्जी यांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आता आपण शाळा-महाविद्यालयातही पोलीस ठेवायचे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

कल्याण बॅनर्जी पुढे म्हणाले, “विधी महाविद्यालयात घडलेल्या घटनेचे मी अजिबात समर्थन करत नाही. आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे. काही निवडक पुरूष अशाप्रकारचा गुन्हा करत असतात. पण जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल तर काय करू शकतो? आता शाळांमध्येही पोलीस असतील का? या प्रकरणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा केला. अशावेळी पीडितेचे रक्षण कोण करणार?”

काही महिन्यांपूर्वीच आरजी कर महाविद्यालयात झालेल्या बलात्कार प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता कल्याण बॅनर्जी म्हणाले की, जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कोणताही कायदा किंवा पोलीस हे थांबवू शकत नाहीत.

प्रकरण काय आहे?

दक्षिण कोलकाता येथील एका विधी महाविद्यालयातील २४ वर्षीय विद्यार्थीनीवर माजी विद्यार्थी आणि दोन ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला. तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. तो सध्या अलीपूर पोलीस ठाणे आणि सत्र न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत आहे. तर इतर दोन आरोपी महाविद्यालयात सध्या शिकत आहेत.