‘इस्लामिक राज्या’च्या मागणीसाठी निरपराध्यांचे शिरकाण करीत नृशंस हल्ले करणाऱ्या आयएसआयएल (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड द लेव्हंट) या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निक्षून सांगितले.
तसेच आयएसआयएलचा नि:पात करण्यासाठी अमेरिका आपली लष्करी मोहीम तीव्र करणार असून सीरियातील हवाई हल्ल्यांची धार वाढविण्यात येईल, असे ओबामा यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांच्या या कर्करोगाचा वेळीच बीमोड करू आणि त्यासाठी उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व अमेरिका समर्थपणे करेल, असा इशाराही ओबामा यांनी दिला.
दहशतवादी प्रवृत्तीस विरोध हे अमेरिकेचे धोरण असून या धोरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ‘आयएसआयएल’ला खिळखिळी करीत तिचा पूर्णपणे नि:पात करणे हेच अमेरिकेचे ध्येय आहे, असे ओबामा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.
मात्र दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल याबाबत ओबामा यांनी मौन बाळगले.
आयएसआयएलविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्यात आली आहे. या आघाडीत ३६ हून अधिक राष्ट्रे सहभागी असून अमेरिका या आघाडीचे नेतृत्व करीत आहे. व्यापक आणि सुनियोजित हवाई हल्ल्यांद्वारे या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढू, असा विश्वास ओबामा यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवरून अध्यक्षांच्या या भाषणाचे प्रसारण करण्यात आले.
‘आयएसआयएल’च्या दहशतवाद्यांनी इराक आणि सीरियातील बराच मोठा भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणला आहे. या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ ब्रिटनएवढे असून या परिसरातील निरपराध नागरिकांच्या अस्तित्वास दहशतवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यातच दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दोघा पत्रकारांचा शिरच्छेद करतानाच्या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध केल्या. त्यामुळे पेटून उठलेली अमेरिका या दहशतवाद्यांचा बीमोड केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.