जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या पाच जवानांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी होणाऱ्या चर्चेची गती, वाव आणि स्वरूप याबाबत दोन्ही देशांनी धोरण निश्चित करावयाचे आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हल्ला झाला असला तरी दोन्ही देशांमध्ये शांततेबाबतची चर्चा सुरू होईल, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हल्ला झाल्याचे वृत्त आम्हाला कळले असले तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार ही चिंतेची बाब आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन सॅकी यांनी म्हटले आहे.
काश्मीर प्रश्नाबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल झालेला नाही. या प्रश्नावर किती लवकर चर्चा करावयाची, चर्चेचा वाव आणि स्वरूप याबाबत भारत आणि पाकिस्ताननेच निर्णय घ्यावयाचा आहे, असेही सॅकी  म्हणाल्या.

चर्चा वेळापत्रकानुसारच -चाको
संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा बैठकीच्या वेळी म्हणजेच येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार चर्चा होणार असल्याचे काँग्रेसने बुधवारी स्पष्ट केले. चाको म्हणाले की, दोन्ही देशांमधील सर्व प्रश्न समोरासमोर बसून चर्चेद्वारे सोडविण्यात येतील. युद्ध पुकारून हे प्रश्न सोडविता येणार नाहीत.