ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी एका ट्विटर कर्मचाऱ्यावर अपंगत्वाला ढाल केल्याचा आरोप केला. यानंतर या कर्मचाऱ्याने मस्क यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच त्याला नेमकं कशामुळे अपंगत्व आलं आहे याची सविस्तर माहिती देणारी ट्वीट्सची मालिकाच पोस्ट केली. मस्क यांनी कर्मचाऱ्यावर त्याच्या अपंगत्वावरून टीका केल्याने ट्विटर वापरकर्त्यांनीही मस्क यांच्यावर जोरदार टीका केली.

नेमकं काय घडलं?

ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यावर त्याचे काही महिन्यांचे वेतन न दिल्याचा गंभीर आरोप केला. अनेकदा मेल करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचं म्हणत त्याने ट्विटरवर एलॉन मस्क यांना टॅग करत याबाबत विचारणा केली. तसेच आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली.

एलॉन मस्क आणि या कर्मचाऱ्यामधील या ट्वीट्सचे स्क्रिनशॉट काढत एका वापरकर्त्याने म्हटलं की, मी खोटं बोलणार नाही, पण ही नोकरी सोडताना दिलेली आजपर्यंतची सर्वात मनोरंजक मुलाखत आहे.

वापरकर्त्याच्या या ट्वीटवर एलॉन मस्क म्हणाले, “वास्तव हे आहे की, या व्यक्तीने कामच केलेलं नाही. श्रीमंत असलेल्या या व्यक्तीने त्याला अपंगत्व असल्याचं टाईप करता येत नाही असं सांगत काम केलं नाही. दुसरीकडे हाच व्यक्ती सध्या वादळी ट्वीट करत आहे.”

मस्क यांच्या या ट्वीटवर अनेकांनी आक्षेप घेत अपंगत्वावरून बोलल्याने टीका केली. दुसरीकडे अनेकांनी मस्क यांची बाजू घेत या कर्मचाऱ्यावर टीकाही केली.

यानंतर या कर्मचाऱ्याने ट्वीट करत त्याला असलेल्या अपंगत्वाबाबत माहिती दिली. तो म्हणाला, “तुम्हाला माझ्या आरोग्यात रस आहे त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या आरोग्याचा उल्लेख केला. त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला अधिकची माहती देतो. मला ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा आजार आहे. त्याचा माझ्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. मी २५ वर्षांचा असताना पहिल्यांदा माझ्या पायाची हालचाल बंद झाली आणि मला व्हिलचेअर वापरावी लागली. त्यानंतर आजपर्यंत २० वर्षात माझ्या शरीराचे वेगवेगळे अवयवही काम करणं थांबवत आहेत. मला अंथुरणातून उठण्यासाठी आणि शौचालयाला जाण्यासाठीही इतरांची मदत घ्यावी लागते.”

हेही वाचा : एलॉन मस्कने भारतातील ‘या’ शहरांमधील ट्विटरची कार्यालये बंद करण्याचा दिला आदेश, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचारी पुढे म्हणाला, “मी वाचले आहे की, तुम्हीही स्वतःहून शौचालयात जाऊ शकत नाही, हे मी नमूद करायला विसरलो. याबद्दल मला वाईट वाटत आहे. मी त्याबाबतच्या भावना समजू शकतो. आपल्यात फरक इतकाच आहे की, मी अपंगत्वामुळे स्वतःहून शौचालयाला जाऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्यावर शौचालयाला गेल्यावर हल्ला होईल या भीतीने जाऊ शकत नाही.”