जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवरुन लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने पकडले आहे. त्यांच्याकडे चौकशीकेल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांची पोलखोल केली आहे. आपण पाकपुरस्कृत दहशतवादी कारवायांसाठी भारताच्या हद्दीत घुसल्याची कबुली या दहशतवाद्यांनी दिली आहे. याचा एक व्हिडिओ बुधवारी लष्कराने पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला.

चिनार सेनेचे कमांडर लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे एडीजी मुनीर खान यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या पकडलेल्या दहशतवाद्यांचा कबुलीनामा देतानाचा व्हिडिओ सादर करण्यात आला. यावेळी ढिल्लन म्हणाले, पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशत पसरवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तान काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी येथे जास्तीत जास्त दहशतवादी पाठवण्याच्या पाक तयारीत आहे. २१ ऑगस्ट रोजी आम्ही दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडले आहे. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाशी जोडलेले आहेत.

दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी सांगतो आहे की, तो पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील जलेबी चौकातील रहिवासी आहे. तो आधी लष्कर-ए-तोयबासाठी काम करीत होता. त्यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यानंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीनसाठी काम करीत होता. दरम्यान, त्याने यावेळी अनेक असे खुलासे केले ज्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांची पोलखोल झाली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका दहशतवाद्याने अनेक खुलासे केले आहेत.

यावेळी असरार अहमद खान या दगडफेकीत जखमी झालेल्या काश्मिरी नागरिकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे धिल्लन यांनी सांगितले. दहशतवाद्यांमुळे, दगडफेक करणाऱ्यांमुळे ३० दिवसांत हा पाचव्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये असरार अहमद खान जखमी झाले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.