Tiruppur : तामिळनाडूमधील तिरुप्पूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका २७ वर्षीय विवाहितेने स्वत:चं जीवन संपवंल आहे. पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. तिचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्यामुळे तिने स्वत:चं जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकी काय घडलं?
तिरुपूर येथील रहिवासी असलेले अन्नादुराई यांनी एप्रिलमध्ये त्यांची मुलगी रिधान्या हिचं लग्न २८ वर्षीय कविन कुमारशी लावून दिलं होतं. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. ८०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह ७० लाख रुपयांची व्होल्वो कार जावायाला लग्नात दिली होती असा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतरही सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, रविवारी रिधान्या ही मंदिरात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर तिने मध्येच आपली गाडी थांबवली आणि कीटकनाशक औषध प्राशन केलं. मात्र, एक कार मध्येच खूप वेळापासून उभा असल्यामुळे स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आले आणि गाडीची तपासणी केली असता गाडीत रिधान्या मृतावस्थेत आढळून आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने मृत्यूपूर्वी तिच्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर ७ ऑडिओ संदेश पाठवले होते. त्यामध्ये तिने तिच्या निर्णयाबाबत माफी मागितली होती आणि पती व सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होत असलेला छळ सहन होत नसल्याचं मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा दावा तिच्या पालकांनी केला आहे.
तिने मेसेजमध्ये म्हटलं आरोप केला की, “मी त्यांचा दररोजचा मानसिक छळ सहन करू शकत नाही. मला हे कोणाला सांगावं हे माहित नाही. मला आता हे जीवन जगावं असं वाटत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. पण आता तुम्हाला खूप दुखावत आहे. मी तुमचं दुःख समजू शकते. मला माफ करा, मी जात आहे”, असं तिने म्हटलं. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणात आता पती कविन, सासरा आणि सासू यांना पोलिसांनी अटक केलं आहे.