‘मैं नही हम..’ या वाक्यावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात गुंतलेले असले तरी या वाक्याची मालकी भाजप किंवा काँग्रेस यांपैकी कोणाचीच नाही, असा ‘पोलिस तपासा’चा निष्कर्ष निघतो.. कारण, भिवंडी पोलिसांनी याआधीच २००७ मध्येच या वाक्याचा वापर केला होता. अर्थात, या वाक्याचा ‘कॉपीराईट’ पोलिसांच्या नावे आहे किंवा कसे, याबद्दलही शंका आहेतच.. जातीय सलोख्यासाठीच्या एका मोहिमेत भिवंडी पोलिसांनी केलेल्या जाहिरातीत हे वाक्य वापरण्यात आल्याचे मात्र उजेडात आले आहे. त्या वेळी पोलिसांना हे वाक्य नेमके कोठून मिळाले हे कळू शकलेले नाही, पण आता या वाक्याच्या ‘कॉपी कॅट’ स्पर्धेत भिवंडी पोलीसही दाखल झाले आहेत.
निवडणुकीची हवा अजून पुरेशी तापू लागलेली नसली तरी राजकीय पक्षांनी जाहिरातबाजीद्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडेच काँग्रेसने राहुल गांधी यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या एका जाहिरातीत ‘मैं नही हम’चा वापर केला. लगेच भाजपने आक्षेप घेतला, आणि हे वाक्य नरेंद्र मोदी यांनी अगोदरच वापरले असल्याचा दावा करताच काँग्रेसची ती जाहिरात अडगळीतही गेली.. २०१० मध्ये मोदी यांच्या एका जाहीर सभेच्या व्यासपीठावर हे वाक्य असलेल्या फलकाचे छायाचित्रही भाजपने प्रसिद्ध केल्याने काँग्रेसी जाहिरातीची हवाच गेली. मग हळूच ही जाहिरात मागे घेतली गेली. मात्र भाजपचा ‘कॉपी कॅट’चा अमान्य करीत, आमच्या एका नगरसेवकाने इंदूरमध्ये त्याचा वापर केल्याचा दावा काँग्रेसने केला, व ‘कॉपी कॅट’ स्पर्धेत रंग भरला..  
मात्र, २००७ मध्येच भिवंडी पोलिसांनी हे वाक्य वापरले होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त अंकुश शिंदे यांच्या काळात भिवंडीत जातीय सलोखा राखण्याचा भाग म्हणून अशा पद्धतीची पोस्टर्स तयार करण्यात आली होती. त्यात ‘मैं नही हम’ या वाक्याचा वापर केला होता. ‘शांती की कोई राह नही, शांती ही राह है’, ‘सफल समाज का एक ही रास्ता.. शांती, सभ्यता और एकता’ आदी काही वाक्येही भिवंडी पोलिसांनी तयार केली होती. त्यामुळे आता ‘कॉपीराईट’ च्या मुद्दय़ावरील राजकीय स्पर्धेची हवा निघून गेली आहे.