Woman Sexually Harassed भर रस्त्यात एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. तसंच तिचा लैंगिक छळही करण्यात आला. रविवारी ही घटना बंगळुरुमध्ये घडली होती. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
नेमकी कुठे घडली ही घटना?
बंगळुरुतल्या रेणुका यल्लमा लेआऊट भागात महिलेने किराणाचं आणि घरातलं आवश्यक सामान घेतलं. रेणुका यल्लमा लेआऊट भाग हा बंगळुरुपासून १२ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी आलेली महिला घरी चालली होती त्यावेळी काही पुरुषांचा जमाव त्या ठिकाणी आला. या महिलेला हे सगळे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागले. तिने विरोध दर्शवल्यावर तिला मारहाण करण्यात आली आणि शिवीगाळ केली. यासंदर्भातला जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक माणूस या महिलेला कानशिलात लगावताना दिसतो आहे.
महिला प्रतिकार करत होती पण..
पीडित महिला प्रतिकार करत होती. मात्र पुरुषांच्या जमावाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच तिचा लैंगिक छळही केला. दरम्यान तिथे स्थानिक लोक आले त्यांनी तिला या पुरुषांच्या तावडीतून सोडवलं. या प्रकरणात ज्या पुरुषांनी महिलेला मारहाण केली त्यांच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. दरम्यान ही महिला ज्या भागात राहात होती तिथेही हे लोक पोहचले. तिथे काही रहिवाशांवर या पुरुषांच्या जमावाने हल्ला केला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
महिलेने माध्यमांना काय सांगितलं?
पीडित महिलेने माध्यमांनाही तिच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची माहिती दिली. पुरुषांचा जमाव अचानक आला. त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी जेव्हा त्यांना विरोध दर्शवला आणि प्रतिकार केला तेव्हा त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. या सगळ्या घटनेनंतर मी पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील महिलेची तक्रार त्यांनी नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात कलमत ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडल्या प्रकारानंतर महिलेने तिच्या मित्राला या ठिकाणी बोलावलं होतं. त्याने महिलेला त्रास देणाऱ्या या जमावाला मारहाण केली होती. त्यामुळे दोन्ही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणात महिलेचा मित्र आणि जिम ट्रेनर असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी हॉस्पिटलमध्ये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.