अकोला : काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही, ते मोदी सरकारने पाच वर्षांमध्ये केले. आताही काँग्रेसने कोंबडय़ा विकण्याचे घोषणापत्र जाहीर करून जनतेला मूर्ख बनवत आहेत. काँग्रेसकडे नीती, नियम व विकासाचे धोरण नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

अकोला मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी दुपारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी संकल्पनाम्याचे विमोचन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवून मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. पुढे बोलताना ते म्हणाले, पाच वर्षांत मोदी सरकारने देशाची आन, बान व शान वाढवली. देश सुरक्षित ठेवण्यासोबतच विकासाकडे नेला. काँग्रेसमधील पाच पिढय़ा ‘गरिबी हटाव’चा नारा देत आहेत. मात्र, काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील गरिबी वाढली असून, हटली नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांची आणि चेल्यांची गरिबी हटवली. आता गरीब जनतेला ७२ हजार कुठून देणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने त्यांच्या सत्तेत काहीच केले नाही. मोदींनी गरिबी हटवण्याचे काम केले. ३४ कोटी गरीब कुटुंबांचे जनधन खाते उघडले. त्यामध्ये कुठल्याही दलालाचा हस्तक्षेप न ठेवता ८० हजार कोटी रुपये टाकले. भाजप सत्तेत येण्यापूर्वी देशातील केवळ ४५ टक्के कुटुंबाकडे शौचालय होते. आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत ९८ टक्के शेतकऱ्यांकडे शौचालय आहे. सहा कोटी घरात उज्ज्वला अंतर्गत जोडणी पोहोचली. २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्यात येईल. मुद्रा योजनेमुळे १३ कोटी लोकांना कर्ज मिळाले. पीएम किसान मार्फत दरवर्षी ७५ हजार कोटींचे अनुदान जमा होणार आहे. शेतकरी, शेतमजुरांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात येईल. सरकारने चार वर्षांत शेतकऱ्यांना १२२६ कोटी दिले, काँग्रेसने १५ वर्षांच्या कार्यकाळात केवळ ३०० कोटी रुपये दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

२००८ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाला, तेव्हा काँग्रेसने निषेधापलीकडे काहीच केले नाही. मोदी सरकारने उरी, पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन बदल घेतला. बदला घेण्याची ताकद मोदी सरकारमध्येच आहे. विकसासोबतच राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले. गत तीन-साडेतीन वर्षांत विकास कामे होऊन कोटय़वधी रुपयांचा विकास निधी आल्याचे संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले. सभेचे सूत्रसंचालक सिद्धार्थ शर्मा यांनी, तर आभार महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी मानले.

राहुल गांधीचे भाषण मनोरंजनात्मक

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केवळ भाषणे देतात. राहुल गांधीचे भाषण फारसे मनावर घेण्याची गरज नाही. त्यांचे भाषण मनोरंजनात्मक असते. त्याचा वास्तव्याशी काही संबंध नसतो, अशी खरमरीत टीका करून मुख्यमंत्र्यांनी ‘त्यांना लाज कशी वाटत नाही?’ असा सवाल केला. कोणी कितीही आघाडय़ा उघडल्या तरी ‘वंचितां’साठी खऱ्या अर्थाने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांवरही निशाना साधला. मोदींना शिव्या देणे हेच त्यांचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.