राजस्थान विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. तसेच २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, त्याला आता १५ दिवसच बाकी आहेत. तरीही काँग्रेसच्या प्रचारासाठी अद्याप राहुल गांधी यांनी राज्यात पाऊल ठेवलेले नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्यासह स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल गांधी यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी-वाड्रा, खरगे यांच्यासह दिवाळीनंतर राहुल गांधी राजस्थानमध्ये प्रचाराला उतरतील. राहुल गांधी यांची अनुपस्थिती राजस्थानमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

९ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून खरगे यांनी राज्यात दोन सभा घेतल्या आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी एकदा उपस्थिती लावली. प्रियांका गांधी-वाड्रा यांनीही दौसा व झुंझूनू येथे दोन सभा घेतल्या. तथापि, राहुल गांधी २३ सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये कार्यकर्ता संमेलनानिमित्त आले होते. तसेच ९ ऑगस्ट रोजी मंगरधाम येथील जाहीर सभेला त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्यांनी राज्यात पाऊल ठेवलेले नाही.

हे वाचा >> “मोदी दिवसातून दोनदा लाखो रुपयांचे सूट बदलतात”, राहुल गांधींची टीका; म्हणाले, “मी फक्त…”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुकजिंदर सिंह रंधवा यांनी सांगितले की, राजस्थानच्या मतदानाआधी इतर राज्यांतील मतदान होत आहे. त्यामुळे राहुल गांधी आधी त्या राज्यात प्रचार करणार आहेत. त्यानंतर ते राजस्थानमध्ये येतील. मिझोरम व छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राजस्थानमध्ये मतदान झाल्यानंतर पाच दिवसांनी तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या तारखांनुसार राहुल गांधी यांनी दौरा निश्चित केला आहे.

मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- काँग्रेसला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकण्याची जास्त संधी दिसत आहे. त्यामुळे या दोन राज्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी स्वतः याचे संकेत दिले होते. दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “तेलंगणामध्ये आम्ही कदाचित जिंकू. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आम्ही नक्कीच जिंकू. राजस्थानमध्ये आम्ही सरकार स्थापन करण्याच्या जवळ पोहोचू आणि आम्हाला वाटते की, तिथेही आम्ही सरकार नक्कीच स्थापन करू.”

राहुल गांधी राजस्थानमध्ये प्रचार करीत नसले तरी प्रियांका गांधी-वाड्रा यांनी राजस्थानची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असल्याचे दिसते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे प्रियांका गांधी यांचे विश्वासू सहकारी असल्याचे बोलले जाते. राजस्थानमध्ये घेतलेल्या सभांमध्ये सचिन पायलट यांच्या योगदानाबाबत प्रियांका गांधी यांनी भाष्य केले.

सप्टेंबर महिन्यापासून प्रियांका गांधी यांनी तीन जाहीर सभा घेतल्या. त्यातील दोन सभा पायलट यांचा प्रभाव असलेल्या विभागात झाल्या आहेत. २०२० साली जेव्हा सचिन पायलट यांनी काँग्रेसशी बंडखोरी केली होती, तेव्हा सचिन पायलट आणि इतर बंडखोरांची समजूत काढून, हे संकट कमी करण्यात प्रियांका गांधी यांनीच महत्त्वाची भूमिका साकारली होती. तथापि, या निवडणुकीत पायलट फारसे मुख्य भूमिकेत दिसलेले नाहीत. त्यांचे प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री गहलोत काँग्रेसच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा आहेत. तसेच दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गहलोत यांनी सांगितले की, राज्यात काँग्रेसचा विजय झाल्यास त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई नाही.

हे वाचा >> लवकरच ‘भारत जोडो यात्रे’चे दुसरे पर्व? काँग्रेसकडून तयारीला सुरुवात!

काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, गहलोत-पायलट यांच्यातल्या न संपणाऱ्या संघर्षाची काहीतरी पार्श्वभूमी राहुल यांच्या अनुपस्थितीमध्ये आहे. गहलोत यांनी मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी आणि पायलट यांना दूर ठेवण्यासाठी हायकमांडची उघडपणे अवहेलना केली होती. त्याबद्दल राहुल यांच्या निकटवर्तीयांमध्ये अद्यापही संशयाचे वातावरण आहे.

राजस्थान काँग्रेसने सुरू केलेल्या ईआरसीपी (Eastern Rajasthan Canal Project) यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेसने ज्या प्रकारे प्रचाराची रणनीती ठरविली होती त्याप्रमाणे प्रचार झालेला नाही. तसेच काँग्रेस गॅरंटी यात्रा सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती स्थगित करण्यात आली. या यात्रेलाही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थगिती देण्यात आली. पण, पक्षाचे पदाधिकारी दिवाळीनंतर पुन्हा यात्रा सुरू करू, असे सांगत आहेत. राहुल गांधीही या यात्रेला उपस्थित राहतील, असे सांगितले जाते.

रंधवा यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी-वाड्रा व राहुल गांधी हे तीनही नेते १४ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात प्रचार करणार आहेत. तथापि, राजस्थानमध्ये आपण पराभूत होऊ, असे काँग्रेस मानत असल्याचा आभास निर्माण झाला आहे, अशी भीती एका नेत्याने व्यक्त केली. त्यामुळेच कदाचित राजस्थानमध्ये प्रचार करण्यात राहुल गांधींचा उत्साह दिसत नसल्याचे या नेत्याने सांगितले.

भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मीकांत भारद्वाज म्हणाले की, राहुल गांधी राजस्थानच्या जनतेला कसे सामोरे जाणार? मागच्या निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिलात वाढ न करणे, नवीन बस विकत घेणार इत्यादी आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे राजस्थान काँग्रेसलाच वाटते की, त्यांनी राज्यात येऊ नये.

आणखी वाचा >> तेलंगणात बीआरएसचा पराभव निश्चित – राहुल गांधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच भारद्वाज पुढे म्हणाले की, राहुल गांधी राजस्थानमध्ये प्रचारासाठी आल्याने किंवा न आल्याने काहीही फरक पडणार नाही. काँग्रेससाठी आता इथे काहीही राहिलेले नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागतात तेवढ्याही जागा ते जिंकू शकणार नाहीत.