राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीत परतले असून महायुतीने त्यांना परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. जानकर हे सध्या परभणी मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. तसेच ते इतर मतदारसंघांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जानकर प्रामुख्याने बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार) यांच्या प्रचारात सर्वात पुढे आहेत. दरम्यान, जानकर यांनी बारमतीकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सुनेत्रा पवारांना भरघोस मतं देऊन खासदार करावं. त्यानंतर आम्ही दिल्लीतून बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणू. हे मी भावी केंद्रीय मंत्री म्हणून बोलतोय.

विरोधी पक्ष दावा करत आहेत की, भाजपासह एनडीएचे नेते ‘अब की बार ४०० पार’चा नारा देत असले तरी त्यांचे २०० खासदारही निवडून येणार नाहीत. यावर महादेव जानकर म्हणाले, तुमच्या २०० जागा येत असतील तर तुमचा पंतप्रधान कोण होणार आहे ते सांगा. तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार त्याचं नाव तरी सांगा. मी आत्ता सांगतोय, आम्ही या निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवतोय. आम्ही एनडीएचं सरकार बनवतोय आणि मी भावी मंत्री म्हणून बोलतोय. सरकार आमचंच बनणार आहे.

जानकर म्हणाले, देशात एनडीएचंच सरकार येणार असल्यामुळे मी बारामतीकरांना विनंती करतो की त्यांनी सुनेत्रा वहिनींना (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी) साथ द्यावी. मग आम्ही दिल्लीतून बारामतीच्या विकासाला लागणारं बजेट आणण्याचा प्रयत्न करू. मी सांगलीची लोकसभा निवडणूक लढलो आहे. नांदेड, माढा, परभणी येथून लोकसभा निवडणूक लढलो आहे, आता मी परभणीचा गुलाल हाती घेतला आहे.

हे ही वाचा >> “माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माढ्यातील नेते उत्तम जानकर हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांनी बारामतीत वक्तव्य केलं होतं की, आम्ही अजित पवारांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावरही महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महादेव जानकर उत्तम जानकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, त्याच्याबद्दल बोलायला तो काही मोठा नेता नाही. आमदार होण्यासाठी जात बदलणाऱ्या नेत्याने अशा भूमिका कधी घेऊ नयेत. तसेच प्रसारमाध्यमांनीदेखील अशा लोकांची नावं चर्चेत आणू नयेत. जात बदलायची आणि विधानसभेची निवडणूक लढवायची असं कुठे असतं का? स्वतःला काही पार्श्वभूमी नाही, काही भूमिका नाही, लायकी नाही त्या लोकांनी असं बोलू नये. या लोकांनी आपल्या लायकीत राहावं. आपली लायकी काय आहे ते पाहावं. आपण छोटे लोक आहोत उगाच काहीतरी मोठं बोलायचं नाही. तसेच तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याची चर्चासुद्धा करू नये असं मला वाटतं.