काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात ३० जागा जिंकून अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. तर राज्यात ‘४५पार’चा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. राज्यात भाजपाला मोठा फटका बसला असून, काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला दुहेरी संख्यादेखील गाठता आलेली नाही. भाजपाने राज्यात केवळ ९ जागा जिंकल्या आहेत. तसेच सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने २६ जागा लढून २३ खासदार निवडून आणले होते. या वेळी भाजपाने २८ जागा लढल्या होत्या, त्यापैकी ९ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपाला १४ जागांचा फटका बसला. भाजपा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला सारख्याच म्हणजे नऊ जागा मिळाल्या आहेत. फोडाफोडीचे राजकारण, मराठा-ओबीसी वाद, शेतकऱ्यांमधील नाराजीचा भाजपाला मोठा फटका बसला आहे. अशीच परिस्थिती देशातही आहे. ‘अब की बार ४०० पार’चा नारा देणारी एनडीए ३०० जागाही जिंकू शकली नाही. मागील दोन्ही निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपाने २४० जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसचे ९९ उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीने ३७, तृणमूल काँग्रेसने २९, द्रविड मुन्नेत्र कळघमने २२, तेलुगू देशम पार्टीने १६, संयुक्त जनता दलाने १२, शिवसेनेच्या ठाकरे गटाने ९, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या आहेत.

देशात एनडीएने बहुमत मिळवलं असलं तरी नवं सरकार मित्रपक्षांच्या जोरावर उभं असेल. त्यामुळे भाजपा काही प्रमाणात पिछाडीवर आहे. दरम्यान, याच राजकीय परिस्थितीवर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी सूचक पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या नकाशाचा फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत म्हटलं आहे की, “स्वाभिमानी महाराष्ट्रात मस्ती उतरवून मिळेल.”

त्याआधी त्यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये म्हटलं होतं, “भाजपासह फोडलेल्या दोन्ही मित्रपक्षांची संख्या एक आकडी करून दाखवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब आपले त्रिवार अभिनंदन! हाच पराक्रम आता विधानसभेलाही करून दाखवा, त्यासाठी आपणास आगाऊ शुभेच्छा!”

हे ही वाचा >> अबकी बार…आघाडी सरकार! तिसऱ्या कार्यकाळात मोदींची मदार मित्रांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला मोठा विजय मिळाला. हा लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी मिळालेला कौल आहे. यानिमित्त कायम लोकशाही आणि संविधानाचा सन्मान करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगम (कराड) येथे नतमस्तक होण्यासाठी जात आहे.”