हर्षद कशाळकर

बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र या अटी व शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन जोमाने सुरू झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकांत घुसल्याने भीषण अपघात झाला. यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. यापूर्वी अलिबाग, मुरुड आणि कर्जतमध्ये अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनातील सुरक्षेच्या मुद्द्याकडे डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

धुळवडीच्या दिवशी अलिबागमध्ये काय घडले?

धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून मंगळवारी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान अंतिम फेरी सुरू असताना बैल उधळून एक बैलगाडी थेट प्रेक्षकांमध्ये घुसली. या दुर्घटनेत विनायक जोशी आणि राजाराम गुरव हे दोघे गंभीर, तर दोन किरकोळ जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या दोघांना सुरवातीला अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेत असतानाच रात्री मृत्यू झाला तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.

दुर्घटनेमागची कारणे कोणती?

जिल्ह्यात बैलगाडी स्पर्धेदरम्यान दुर्घटना होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अलिबाग, मुरुड आणि कर्जत तालुक्यात स्पर्धेदरम्यान बैलगाडी उधळून प्रेक्षकात घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यात यापूर्वीही दोघांचा मृत्यू झाला आहे. अलिबाग वरसोली येथील उमेश वर्तक आणि उक्रुळ येथील दौलत देशमुख यांचा अशाच दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला होता. स्पर्धेदरम्यान बैलगाडी वेगाने पळविण्याच्या नादात बैलांवरील गाडीवानाचे नियंत्रण सुटते. त्यामुळे बैल भरकटतात. ते वाट मिळेल तिथे धावत सुटतात. आसपास उभ्या असलेल्या प्रेक्षकांना चिरडतात. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात.

न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली?

बैलगाडी स्पर्धेदरम्यान बैलांना होणाऱ्या अमानुष मारहाणीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने २०१७मध्ये बैलगाडी स्पर्धांवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यानंतर २०२१मध्ये सर्वोच्च न्ययालयाने बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाला सशर्त परवानगी दिली होती. राज्य सरकारने स्पर्धांच्या आयोजनाबाबत नियम घालून दिले होते. मात्र या नियमांचे स्पर्धेच्या आयोजकांकडून पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. योग्य खबरदारी न घेता बैलगाडी स्पर्धांचे आयोजन होत असल्याने स्पर्धेदरम्यान दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बैलगाडी स्पर्धा आयोजनांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचे वरातीमागून घोडे?

अलिबाग येथील दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तपासही सुरू झाला. न्यायालयीन प्रक्रियाही सुरू होईल. पण स्पर्धेपूर्वी अशा दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने नेमकी खबरदारी का घेतली असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत. ज्यात चार जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे या घटनांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. बैलगाडी स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांकडे प्रशासनाची डोळोझाक होत असून दुर्घटनांनंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. प्रशासनाची ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका होऊ लागली आहे.

नियम काय सांगतात ?

बैलगाडी स्पर्धेची धावपट्टी १ हजार मीटरपेक्षा मोठी नसावी. ही धावपट्टी तीव्र उतार, दगड अथवा खडक असलेली नसावी. दलदल, चिखल आणि पाणथळ जागा नसावी. रस्त्यावर अथवा महामार्गावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊ नये. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची व्यवस्था आयोजकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक आहे. शर्यतीच्या वेळी धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे उभारणे अथवा सुरक्षेचे उपाय करणे अपेक्षित आहे. मात्र या नियमांचे स्पर्धेदरम्यान पालन होत नसल्याचे अलिबाग येथील दुर्घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.

कोणत्या उपाययोजना हव्यात?

अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी स्पर्धांना पोलीस आणि महसूल प्रशासनाने प्रतिबंध घालावा, स्पर्धांचे आयोजन रीतसर परवानगी घेऊन व्हावे, न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन व्हावे, स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी आयोजकांनी घ्यावी अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.

harshad.kashalkar@expressindia.com