– अभय नरहर जोशी

विख्यात हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो, ‘अ‍ॅमेझॉन’ या सुप्रसिद्ध ई वाणिज्य कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस यांनी अ‍ॅमेझॉनच्या जंगल रक्षणासाठी कंबर कसली आहे. या दोन दिग्गजांनी त्यासाठी तब्बल दोनशे दशलक्ष डॉलरचा (२० कोटी डॉलर) संरक्षण निधी उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी हे दोघेही एकत्र आले आहेत.

Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
remembering economist amiya kumar bagchi
व्यक्तिवेध : प्रा. अमिया कुमार बागची
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
Success Story Started a business by selling food on a bicycle
Success Story : सायकलवरून पदार्थ विकून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली तब्बल ५,५३९ कोटींची कंपनी
Success Story of Bhogi Sammakka village girl who got three government job at once wants to become ias officer
शेवटी कष्टाचं फळ मिळालंच! गावातील मुलीने कोचिंगशिवाय केला अभ्यास, एकाचवेळी मिळवल्या चक्क तीन सरकारी नोकऱ्या
bhandara tree cut
वन विभागाचा प्रताप! आंधळेपणाने केली शेकडो झाडांची कत्तल
Loksatta viva Space on Wheels special bus launched through joint efforts of ISRO and Vigyan Bharati
इस्रोची महाराष्ट्र वारी

डिकॅप्रियो, बेझोसचे योगदान कसे?

लिओनार्डो डिकॅप्रियो हा हॉलिवूडचा ४८ वर्षीय झगमगता तारा-विख्यात अभिनेता-निर्माता आहे. त्याचे चित्ताकर्षक अस्तित्व, देखणे व्यक्तिमत्त्व, वलयांकित वावर आणि प्रभावी अभिनयाने त्याने रसिकांची दाद मिळवली आहे. याव्यतिरिक्त पर्यावरण रक्षणासाठी तो नियमित योगदान देत असतो. त्यासाठी सक्रिय सहभागी होत अनेक उपक्रमांना आर्थिक मदत, निधी उभारण्यासाठी सहाय्य डिकॅप्रियो देत असतो. त्याचे हे वनसंपदा-वन्यजीवप्रेमही त्याच्या असंख्य चाहत्यांना भावते. ५९ वर्षीय जेफ बेझोसही त्यांच्या संस्थेतर्फे पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देत असतात. तसेच त्यांचे सतत आर्थिक पाठबळही लाभत असते. आता ताज्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉनचे जंगल वाचवण्यावर तो मुख्य भर देणार आहे. डिकॅप्रियो आणि जेफ बेझोस यांनी एकत्र येत तब्बल दोनशे दशलक्ष डॉलरचा अवाढव्य अ‍ॅमेझॉन जंगल संरक्षण निधी उभारणीत सिंहाचा वाटा उचलण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट काय?

‘व्हरायटी’ या अमेरिकन नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार ‘प्रोटेक्टिंग अवर प्लॅनेट (पीओपी) चॅलेंज’ या पर्यावरणरक्षणासाठी सर्वांत मोठा खासगी निधी उभ्या करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने ब्राझीलशी एका करारानुसार भागीदारी जाहीर केली. त्यानुसार ब्राझीलमधील संरक्षित वनक्षेत्र आणि स्थानिक मूळ निवासी (आदिवासी) वस्ती-प्रदेशांचे संरक्षण, विस्तार आणि संबंधित उपक्रमांना पाठिंबा आणि व्यवस्थापनासाठी ब्राझील सरकारला मदत म्हणून दोनशे दशलक्ष डॉलर निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनमधील १४५ दशलक्ष एकर सार्वजनिक जमिनीचे रक्षण करून, अ‍ॅमेझॉनमध्ये जंगलतोडीचे प्रमाण शून्यावर आणणे, हे या उपक्रमाचे आणि निधी उभारणीचे उद्दिष्ट आहे. अ‍ॅमेझॉनमधील मूळ रहिवासी असलेल्या विविध आदिवासी जमातींच्या हक्क संरक्षणासह या संरक्षित वनक्षेत्रातील जंगलतोड व गुरांसाठी सुरू असलेली जंगलतोड रोखणे हे सर्वांत मोठी तारेवरची कसरत आहे.

या निधीचा विनियोग कशासाठी?

येत्या चार वर्षांत या दोनशे दशलक्ष डॉलर देणगीचा उपयोग ब्राझीलचे अ‍ॅमेझॉन जंगलतोड संपूर्ण थांबवण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी करण्यात येईल. तसेच ब्राझीलच्या शाश्वत आणि पर्यावरण अनुकूल (हरित) अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचालीस गती देण्यासाठी, चांगले सुरक्षित वन्यजीव स्थान निर्मितीसाठीही या निधीचा विनियोग करण्यात येईल. या वृत्तानुसार डिकॅप्रियो, बेझोस हे दोघे ब्राझीलचे पर्यावरण मंत्री आणि आदिवासी मंत्र्यांशी या कामात समन्वय साधणार आहेत. अ‍ॅमेझॉनचे नऊ प्रदेश, लिओनार्डो डिकॅप्रियोचा सहभाग असलेली ‘री:वाइल्ड कंझर्व्हेशन नॉनप्रॉफिट’ आणि जेफ बेझोसची ‘नेचर सोल्युशन्स ऑफ द बेझोस अर्थ फंड’ही या संस्थाही सक्रिय सहभागी होणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : वन्यप्राण्यांच्या यशस्वी स्थलांतराचे गमक काय?

डिकॅप्रियोचे म्हणणे काय?

डिकॅप्रियोने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आपल्या वसुंधरेवरील वन्यजीवांसाठी सर्वात महत्वाचे निवासस्थान असलेल्या अॅमेझॉन वनसंपदेचे संरक्षण करण्याच्या ब्राझीलच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांनी आम्ही प्रेरित झालो आहोत. या प्रयत्नांना सक्रिय पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. मे २०२१ मध्ये, ‘टायटॅनिक स्टार’ डिकॅप्रियोने प्रशांत महासागरातील गालापागोस द्वीपसमूहावरील पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी ४३ दशलक्ष (चार कोटी तीन लाख) डॉलरचा निधी उभा करण्याची संकल्प समाजमाध्यमांद्वारे जाहीर केला होता. त्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ आणि द्वीप संवर्धन तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. धोक्यात असलेल्या प्रजाती आणि जंगलव्याप्त जमिनींच्या संरक्षणासाठी डिकॅप्रियोने सप्टेंबर २०२१ मध्ये पाच अब्ज डॉलर उभारण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे जाहीर केले होते.

बेझोस यांच्या संस्थेची भूमिका काय?

‘नेचर सोल्युशन्स ऑफ द बेझोस अर्थ फंड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख क्रिस्टियन सॅम्पर यांनीही सांगितले, की जागतिक स्तरावरील जैवविविधता आणि हवामानासाठी अ‍ॅमेझॉनचे जंगल महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही ब्राझीलचे अध्यक्ष लुला आणि ब्राझील सरकारच्या कटिबद्धतेचे स्वागत करतो. जंगलाचे संरक्षण आणि हानी न पोहोचवता शाश्वत वापरावर आधारित विकासाच्या नवीन आर्थिक प्रारुपांसह, संरक्षित क्षेत्र आणि या जंगलातील आदिवासी प्रदेशांतील निवासी जनतेच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण, या संरक्षित क्षेत्राची निश्चिती आणि व्यवस्थापन जंगलतोड घटवण्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रयत्नांना सक्रिया पाठिंबा देत असल्याचे आनंद व समाधान वाटत आहे.

हेही वाचा : विश्लेषण : काळ्या बिबट्यांची संख्या का वाढत आहे विदर्भातील व्याघ्रप्रकल्पांत?

अ‍ॅमेझोनचे जंगल कुठे, महत्त्व काय?

अ‍ॅमेझोन जंगलाला ‘अ‍ॅमेझॉनिया’ (कधी कधी पॅन-अ‍ॅमेझोनिया) असेही संबोधले जाते. हा दक्षिण अमेरिका खंडाचा सुमारे ४० टक्के भाग व्यापलेला एक विशाल प्रदेश आहे. येथे हे घनदाट वर्षावन आहे. यात प्रामुख्याने ब्राझीलसह बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयानाचा समावेश आहे. हा प्रदेश तेथील ४०० हून अधिक आदिवासी जमातींसाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रदेशात वन्यसंपदा, वन्यजीव, पक्षी-कीटकांच्या लाखो प्रजातींचे अस्तित्व आहे. तथापि आतापर्यंत १७ टक्के अ‍ॅमेझॉनचे जंगल आधीच नष्ट झाले आहे. हे जंगल २०-२५ टक्‍क्‍यांपर्यंत नष्ट झाल्यास त्याचा पर्यावरणावर भयंकर परिणाम होण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.

abhay.joshi@expressindia.com

Story img Loader