मागील अनेक दिवसांपासून कुस्ती या खेळप्रकरात देशाला पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होते. या आंदोलनात साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप या कुस्तीपटूंनी केले होते. नुकतेच या आंदोलनाने तीव्र रुप धारण केले होते. परिणामी केंद्र सरकारने या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांची आंदोलक कुस्तीपटूंसोबत एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आगामी काळात भारतीय कुस्ती महासंघात काही बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल कोणते आहेत? लैंगिक छळाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या कारकिर्दीचे काय होणार? महासंघाची आगामी निवडणूक कशी आयोजित केली जाणार? हे जाणून घेऊ या…
कुस्तीपटू-अनुराग ठाकूर यांच्यात तब्बल सहा तास बैठक
मागील अनेक दिवसांपासून ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक कुस्तीपटूंकडून केली जात होती. त्यासाठी या कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरु होते. मात्र आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटू यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक, तक्रार निवारण समिती यासंदर्भात काही अटी घातल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत ब्रिजभूषण सिंह यांच्यासह त्यांच्या परिवारातील कोणालही कुस्ती महासंघाची निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये, अशी अट कुस्तीपटूंनी घातली आहे.
हेही वाचा >> आतिशी यांचा ब्रिटनमध्ये मार्ग मोकळा! परदेशात जाण्यासाठी मंत्र्यांना केंद्राची परवानगी का घ्यावी लागते? जाणून घ्या…
कुस्ती महासंघाचे दरवाजे ब्रिजभूषण यांच्यासाठी बंद?
साधारण दशकभरापासून ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष होते. या महासंघाच्या वेगवेगळ्या पदांवरही ब्रिजभूषण यांचेच नातेवाईक होते. मात्र महासंघाच्या आगामी निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्यासह त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या जवळची कोणतीही व्यक्ती या निवडणुकीत उभी राहणार नाही. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला नवे नेतृत्व मिळणार आहे. विशेष म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षपदावर कोणाची निवड करावी यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांची मतं विचारात घेतली जातील.
अनुराग ठाकूर काय म्हणाले?
याबाबत क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी अधिक माहिती दिली आहे. “आगामी ३० जून रोजी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक आयोजित केली जाऊ शकते. महासंघात अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना केली जाईल. या तक्रार निवारण समितीचे अध्यक्षपद महिलेकडे सोपवले जाईल. या निवडणुकीनंतर भारतीय कुस्ती महासंघात चांगले पदाधिकारी असतील. त्यामुळे महासंघ चांगल्या पद्धतीने काम करेल. यासाठी खेळाडूंचेही विचार जाणून घेतले जातील,” असे अनुराग ठाकूर म्हणाले.
हेही वाचा >> Odisha Accident : ‘एलएचबी’ डबे नसते तर मृतांची संख्या वाढली असती; एलएचबी डब्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली?
भारतीय कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण सिंह यांची सत्ता!
ब्रिजभूषण सिंह मागील १२ वर्षांपासून भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या अध्यक्षपदी होते. मात्र आगामी निवडणुकीत ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसतील. कुस्तीपटूंची अनुराग ठाकूर यांच्याशी बैठक झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह तसेच त्यांच्या परिवारासाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचा दरवाजा कायस्वरुपी बंद करण्यात आला आहे. याआधी ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र करण भूषण हे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष होते. ब्रिजभूषण सिंह यांचे जावाई विशाल सिंह हे बिहार कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे सहसचिव आदित्य प्रताप सिंह हेदेखील ब्रिजभूषण यांचे जावई आहेत.