इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १७व्या हंगामाला सुरुवात होऊन आता आठवडा झाला असून या कालावधीत काही रोमहर्षक सामने पाहण्याची चाहत्यांना संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. अखेरीस मुंबईला या सामन्यात हार पत्करावी लागली. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव होता. मुंबईने अद्याप दोनच सामने खेळले असले, तरी नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या डावपेचांवर बरीच टीका होत आहे. हार्दिककडून पहिल्या दोन सामन्यांत दोन मोठ्या चुका घडल्या आणि मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता हार्दिकवरील दडपण वाढत चालले आहे.

मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांत काय घडले?

मुंबईला ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामातील आपले पहिले दोनही सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावे लागले. सलामीच्या लढतीत मुंबईला आपला नवा कर्णधार हार्दिकचा माजी संघ गुजरात टायटन्सकडून अवघ्या सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत मुंबईवर हैदराबादने मात केली. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तब्बल २७७ धावा केल्या. ‘आयपीएल’च्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मग मुंबईनेही कडवी झुंज दिली, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईने २० षटकांत ५ बाद २४६ धावा केल्या आणि त्यांना ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला.

Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
IPL 2024 R Ashwin Scolds Fans Over booing Hardik Pandya
IPL 2024: “तुम्ही इतर देशांमध्ये खेळाडूंच्या चाहत्यांना असं भांडताना पाहिलंय का?” हार्दिकला ट्रोल करत असलेल्या चाहत्यांना अश्विनने सुनावले
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

हेही वाचा : इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

या दोन सामन्यांत हार्दिककडून कोणत्या चुका?

अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईने गुजरातला ६ बाद १६८ धावांवर रोखले. याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ सुस्थितीत होता. त्यांना ३० चेंडूंत ४३ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे सात फलंदाज शिल्लक होते. मात्र, यानंतरच्या दोन षटकांत मिळून मुंबईला केवळ सात धावा करता आल्या आणि त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला (४६) गमावले. ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर हार्दिकने स्वत: सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याऐवजी टिम डेव्हिडला पाठवले. ही हार्दिकची पहिली चूक ठरली. डेव्हिडला १० चेंडूंत ११ धावाच करता आल्या. मग सातव्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या हार्दिकने अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि चौकार मारला. मात्र, उमेश यादवने टाकलेल्या या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यात मुंबईचा सहा धावांनी पराभव झाला.

दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्धही हार्दिकने नाणेफेक जिंकली आणि पुन्हा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने तब्बल २७७ धावांची मजल मारली. त्यातच हैदराबादचे फलंदाज अगदी सहज फटकेबाजी करत असताना हार्दिकने मुंबईचा प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराला रोखून ठेवले होते. हैदराबादच्या डावातील चौथ्या षटकात बुमराला प्रथम गोलंदाजी देण्यात आली आणि त्याने केवळ पाच धावा दिल्या. मात्र, त्यानंतर हार्दिकने त्याला १३व्या षटकापर्यंत पुन्हा गोलंदाजीच दिली नाही. हेन्रिक क्लासन खेळपट्टीवर येईपर्यंत बुमराला रोखून ठेवण्याची हार्दिक आणि मुंबईच्या संघ व्यवस्थापनाची योजना होती. मात्र, सामन्याच्या परिस्थितीनुसार हार्दिकने आपल्या डावपेचांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्याची ही चूकही मुंबईला महागात पडली. तसेच दोनही सामन्यांत बुमराला सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याऐवजी हार्दिकने स्वत:च नवा चेंडू हाताळला. यावरूनही त्याच्यावर बरीच टीका झाली.

हेही वाचा : विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?

हार्दिक आणि रोहित संबंध कसे?

हार्दिक आणि रोहित शर्मा या मुंबईच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये सारे आलबेल नाही हे मैदानावर दिसून येते. हे दोघे एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांच्यातील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, हे त्यांच्या मैदानावरील वावरावरून निश्चितपणे जाणवते. गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने रोहितला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करायला लावले. याचे रोहितला आश्चर्य वाटले होते. कर्णधारपद भूषवत असताना रोहित ३० यार्ड वर्तुळात क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे आपल्याला सीमारेषेवर पाठवले जाईल हे त्याला अपेक्षित नव्हते. कर्णधार म्हणून हार्दिकला कोणत्या खेळाडूला कुठे क्षेत्ररक्षण करायला लावायचे हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, ३६ वर्षीय रोहित आता कितपत चपळ आहे, तसेच सीमारेषेवर असताना सूर मारून चेंडू अडवण्याची त्याची तयारी आहे का, याचा हार्दिकने विचार करणे गरजेचे होते.

हार्दिकवर होणारी टीका कितपत रास्त?

कर्णधार किंवा अष्टपैलू म्हणून हार्दिककडून चुका झाल्या आणि त्याच्यावर टीका झाली, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, रोहितला कर्णधारपदावरून हटवून मुंबईने हार्दिककडे नेतृत्व सोपवले ही बाब मुंबईच्या काही चाहत्यांना आवडलेली नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवरून हार्दिकवर बरीच टीका होते. त्याच्याविषयी अपशब्द वापरले जातात. अनेकांना तो भारताचाही खेळाडू आहे याचा विसर पडल्याचे दिसून येते.

हेही वाचा : विश्लेषण: आजच व्यवहार, आजच सेटलमेंट… शेअर बाजाराच्या T+0 प्रणालीचे आणखी कोणते फायदे?

इतका रोष ओढवण्याचे कारण काय?

हार्दिक जागतिक दर्जाचा अष्टपैलू आहे, त्याने मुंबईला आणि भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. गेल्या दोन हंगामांत त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवले होते. या सगळ्या यशानंतरही हार्दिकला महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे प्रेम चाहत्यांकडून कधीही लाभले नाही. हार्दिकच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वावरावरून त्याला फार ‘ॲटिट्युड’ असल्याचा निष्कर्ष चाहते काढतात. तसेच गेल्या काही वर्षांत दुखापतींमुळे त्याला बरेचदा सामन्यांना मुकावे लागले आहे. ही बाबही चाहत्यांना फारशी आवडत नाही. त्यातच रोहित आता भारतीय संघाचा कर्णधार असताना त्याच्याकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतल्याचाही चाहत्यांमध्ये राग आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले. त्यामुळे हार्दिक आता मुंबईसाठी यश मिळवत नाही, तोपर्यंत चाहत्यांकडून होणारी टीका थांबण्याची शक्यता कमीच आहे.

हार्दिकचे नेतृत्व धोक्यात येऊ शकेल का?

गेल्या दोन ‘आयपीएल’ हंगामांत हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, या यशासाठी हार्दिकइतकाच किंबहुना त्याहूनही जास्त प्रशिक्षक आशिष नेहरा जबाबदार असल्याचे अनेकांचे मत आहे. नेहरा सीमारेषेच्या बाहेर उभा राहून सतत कर्णधाराला मार्गदर्शन करत असतो. त्याची हार्दिकला खूप मदत झाल्याचे माजी क्रिकेटपटूंकडून म्हटले जाते. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी रोहितला हटवून हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. हार्दिकला गुजरातकडून परत मिळवण्यासाठी मुंबईला बरीच आर्थिक गणितेही जुळवावी लागली. त्यामुळे केवळ दोन पराभवांनंतर हार्दिकचे नेतृत्व धोक्यात येणार नाही. मात्र, त्याला डावपेचांमध्ये निश्चित सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा त्याच्यावरील दडपण वाढतच जाईल.