scorecardresearch

विश्लेषण : २९ जूनला सर्वात लहान दिवसाची नोंद, पृथ्वी वेगाने का फिरत आहे, त्याचा काय परिणाम होईल?

पृथ्वी दररोज साधारण २४ तासात एक प्रदक्षिणा-परिवलन पूर्ण करते, २९ जूनला त्या दिवशी १.५९ मिलीसेंकंद-०.००१५९ सेकंद कमी लागले होते

Explain : Shortest day recorded on June 29, Why is Earth rotating faster, what will be the effect?
विश्लेषण : २९ जूनना सर्वात लहान दिवसाची नोंद , पृथ्वी वेगाने का फिरत आहे, त्याचा काय परिणाम होईल?

आपण अनेकदा म्हणतो की वेळ कसा पटकन निघून समजलंच नाही, पण हे म्हणण्याची खरोखर वेळ आलेली आहे, उद्याचा एक दिवस हा सेंकदाच्या काही भागाने आणखी लवकर आला आहे. २९ जुनला पृथ्वीने प्रदक्षिणा -परिवलन पुर्ण केलं खरं पण ते नेहमीपेक्षा काहीशा कमी वेळेत. म्हणजे नेमकं किती कमी वेळेत? तर पृथ्वीला त्या दिवशी एक प्रदक्षिणा पुर्ण करायला ०.००१५९ सेंकद कमी लागले अशी माहिती समोर आली आहे. १९६० पासून सातत्याने पृथ्वी प्रदक्षिणेबाबत विविध निरीक्षणे नोंदण्यात येत आहेत. त्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेचा नोंदवण्यात आलेला हा सर्वात कमी कालावधी असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच पृथ्वीने २९ जुनला प्रदक्षिणा ही नेहमीच्या वेळेपेक्षा ०.००१५९ सेंकद आधी पूर्ण केली आहे.

पृथ्वी वेगाने फिरत असल्याच्या म्हणजेच कमी कालावधीत प्रदक्षिणा पुर्ण करत असल्याच्या नोंदी गेल्या काही वर्षात करण्यात आल्या आहेत. २६ जुलैला प्रदक्षिणेच्या बाबत अशाच कमी कालवधीची नोंद करण्यात आली. त्या दिवशी प्रदक्षिणा पुर्ण करायला ०.००१५० एवढे सेकंद कमी लागले. करोना काळात सर्व जग ठप्प झाले असतांनाही शास्त्रज्ञांकडून प्रदक्षिणेबाबत अशीच निरीक्षणे नोंदवली जात होती. १९ जुलै २०२० ला अशीच एक नोंद करण्यात आली ज्यामध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा पुर्ण कऱण्यास ०.००१४७ सेंकंदाचा कमी कालावधी लागला होता.

एक मिलीसेकंद म्हणजे सेकंदाचा एक हजारावा भाग. आपल्या डोळ्याची पापणी ही सेकंदाच्या एक दशांश भागात लवते, म्हणजे एका सेकंदाचे दहा भाग केले तर त्या दहाव्या भागाच्या कालावधी एवढ्या अल्प काळात हे घडते. प्रसिद्ध धावपटू पी टी उषाचे लॉस एंजलिस ऑलंपिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत कांस्य पदक हे सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या अंतराने हुकले होते. म्हणजे कांस्य पदक जिंकणाऱ्या रोमानियाच्या धावपटूने ५५.४१ सेंकदात शर्यत पुर्ण केली तर पी टी उषाला शर्यत पुर्ण करण्याकरता ५५.४२ सेकंद लागले. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या स्वीडनच्या धावपटुला ५५.४३ सेकंद लागले.

पृथ्वी प्रदक्षिणेचा वेग का वाढला आहे?

गेल्या काही वर्षातील निरीक्षणे आणि पृथ्वीचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं आहे की पृथ्वी प्रदक्षिणा वेगाने पु्र्ण करत आहे. मात्र पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास केला तर लाखो वर्षांच्या तुलनेत पृथ्वी प्रदक्षिणेचा वेग उलट मंदावला आहे, प्रदक्षिणेला जास्त कालवधी लागत आहे. प्रत्येक शतकानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचा कालावधी काही मिली सेंकदांनी वाढला आहे, दिवस मोठा होता चालला आहे. ‘दि गार्डियन’ने एका शोधनिबंधावर आधारीत दिलेल्या वृत्तानुसार १४ लाख वर्षांपूर्वी एक दिवस हा २४ तासांचा नाही तर चक्क १९ तासांचा होता, म्हणजेच पृथ्वी अवघ्या १९ तासात एक प्रदक्षिणा पुर्ण करत होती. मुख्यतः चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील भरती-ओहोटी येते आणि त्यामुळे पृथ्वीची गती मंदावत आहे.

सध्या पृथ्वी वेगाने प्रदक्षिणा का पुर्ण करत आहे?

याबाबत टास्मानिया विद्यापीठातील प्राध्यापक किंग यांनी ABC NEws या वृत्तवाहिनीला एक प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीचे परिवलन हे कमी कालावधीत झाल्याची नोंद करण्यात येत आहे हे खरं आहे, रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात १९७० च्या दशकात झाल्यानंतरही याबाबतचे नेमके कारण अजुन लक्षात आलेलं नाही. तर पॅरिस वेधशाळेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पृथ्वीच्या परिवलनात होत असलेला बदलाचे कारण माहित नाही, पृथ्वीचा गाभ्यामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम हा परिवलनावर-प्रदक्षिणेवर होत असावा.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या ध्रुवांमध्ये होत असलेल्या हालचालीमुळे लहानसे बदल होत असल्याने परिवलामध्ये बदल अनुभवाला येत असावा. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या परिवलनामध्ये बदल होण्याची अनेक कारणे असू शकतात. समुद्रात असलेले पाण्याचे विविध प्रवाह, हवेची दिशा यामुळे हे बदल होऊ शकतात, यामुळे पृथ्वीचा वेग कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो.

पृथ्वीच्या परिवलनाचा वेग वाढत गेल्यास काय होऊ शकते?

मोजला जाणारा वेळ आणि पृथ्वीचा वेग यामधील फरक कळावा यासाठी लिप सेंकद प्रणालीचा वापर १९७० च्या दशकापासून केला जात आहे. यानुसार जागतिक वेळ Universal Time-UTC ठरवण्यात आली आहे, यानुसारच जगातील सर्व वेळ ही निश्चित करण्यात आली आहेत. पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधी कमी झाल्याने या लिप सेकंद प्रणालीत २७ लिप सेंकद हे अधिक करण्यात आले आहेत. जर अशाच प्रकारे परिवलनातील बदल हे वेगाने होत राहीले तर शास्त्रज्ञांना एक लिंप सेकंद प्रणालीत भविष्यात मोठा बदल करावा लागेल. अर्थात हया वेगाचा आपल्यावर परिणाम होणार नाही आणि लिप सेकंद प्रणालीत केला जाणारा बदल हा अतिशय सुक्ष्म असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explain shortest day recorded on june 29 why is earth rotating faster what will be the effect as

ताज्या बातम्या