scorecardresearch

विश्लेषण : लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरण म्हणजे काय?

मुंबईत आतापर्यंत अनेक ठिकाणी लहान स्तरावर असे प्रयोग करण्यात आले आहेत

BMC tactical urbanism plan
(Express Archive)

इंद्रायणी नार्वेकर

यंदाचा अर्थसंकल्प मांडताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टॅक्टीकल अर्बनिझम म्हणजेच `लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरणा’ची संकल्पना मांडली. या नव्या संकल्पनेनुसार आता शहराचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या नव्या संकल्पनेविषयी ….

लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरण म्हणजे काय?

आतापर्यंत विकासकामे करताना शहरीकरणाचा विचार केला जातो. म्हणजे पूल, रस्ते, रुग्णालय, शाळा यांची उभारणी केली जाते. यापुढे जगभरात लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरण म्हणजेच नागरिकांच्याच सहभागातून  विरंगुळ्याच्या जागा, मोकळ्या जागा तयार करणे ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरांमध्ये लोकांचा, विशेषतः पादचाऱ्यांचा, सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार करून नियोजन करणे हा त्यातला मुख्य भाग आहे.

मुंबईत हा प्रयोग पहिल्यांदा होत आहे का ?

मुंबईत आतापर्यंत अनेक ठिकाणी लहान स्तरावर असे प्रयोग करण्यात आले आहेत. परंतु, संपूर्ण मुंबईचा विचार करून ही संकल्पना राबवण्यासाठी धोरण म्हणून स्वीकारणारे मुंबई हे पहिले शहर आहे. अर्थसंकल्पात या संकल्पनेकरीता तरतूदही करण्यात आल्यामुळे यंदा प्रथमच स्वतंत्र लेखाशीर्ष सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या संकल्पनेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्या प्रकारची कामे यात अंतर्भूत आहेत?

लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरणामध्ये शहरातील पडीक जागांचा नागरिकांसाठीच कल्पकतेने वापर करण्यावर मुख्य भर असेल. आतापर्यंत पालिकेच्यावतीने जागांच्या सुशोभीकरणावर भर दिला जात होता. पण यापुढे त्या जागा नागरिकांना कशाप्रकारे वापरता येतील हेच या कार्यात्मकतेमध्ये पाहिले जाणार आहे. याचे काही प्रयोग मुंबईत आधीच झाले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसरात मधल्या चौकात पालिकेने त्रिकोणी आकाराची जागा तयार करून तेथे सेल्फी पॉईंट तयार केला आहे, ताडदेवला भल्या मोठ्या वाहतूक बेटावर उद्यानच साकारण्यात आले असून त्यात नागरिकांना बसण्याचीही सोय आहे, दादर आणि गिरगाव चौपाटीवर पर्जन्यजलवाहिन्यांच्या पातमुखांवर दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे.

भविष्यात आणखी कोणत्या संकल्पना राबवल्या जाणार ?

उड्डाणपूलांखालील जागांबाबत आतापर्यंत काहीही धोरण नव्हते मात्र यापुढे या सर्व जागा मोकळ्या करून त्यावर उद्याने, खेळण्यासाठीच्या जागा, धावपट्ट्या तयार करण्यात येणार आहेत. संपूर्ण मुंबईत ही संकल्पना राबवली जाणार आहे. प्रत्येक विभागात अशा पडीक जागांचा शोध घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर शाळांच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्यासाठी पदपथ, सिग्नल यंत्रणा, रस्त्यांवर रंगीत पट्टे असेही नियोजन केले जाणार आहे. मैदानांच्या सभोवती भिंतींऐवजी आरपार पाहता येईल असे रेलिंग बसवणे, ज्यामुळे दृष्टीक्षेत्र वाढते, असेही प्रयोग केले जाणार आहेत.

पादचारी प्रथम…

रस्त्यावरून चालण्याचा पहिला हक्क पादचाऱ्यांचा असला तरी वाहनांच्या गर्दीमुळे पादचारी भांबावलेले असतात. मात्र नव्या संकल्पनेत रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवून लोकांना त्याचा वापर करण्यासाठी संडे स्ट्रीट सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. चांगले, चालण्यायोग्य पदपथ या प्रकल्पात बांधण्यात येतील. सार्वजनिक परिवहन सेवा बळकटीकरणावर भर दिला जाणार असून बस थांबेही सुशोभित केले जातील.

शौचालयांचेही स्वरूप बदलणार

गर्दीच्या ठिकाणी शौचालय बांधणे हा देखील याच प्रकल्पाचा भाग आहे. मात्र यापुढे सार्वजनिक शौचालयेही बहुपयोगी असावीत असे नियोजन करणे अपेक्षित आहे. मुंबईत धारावी, अंधेरी अशा ठिकाणी प्रसाधनगृहात आंघोळ व कपडे धुण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. तृतीयपंथीय, अपंग यांच्यासाठी स्वतंत्र शौचकूपाची व्यवस्था येथे केली जाणार आहे. एकूणात कार्यात्मकता वाढल्याने शहर नागरिकांसाठी अधिक सुसह्य व आनंददायी असणे अपेक्षित आहे.

indrayani.narvekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained bmc tactical urbanism plan across mumbai print exp 0522 abn

ताज्या बातम्या