scorecardresearch

विश्लेषण : सुखराम… भाजपाने सामावून घेतलेले पहिले वादग्रस्त नेते!

सुखराम यांना शिक्षा झाल्यावर भाजपाने काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून आकाशपाताळ एक केले होते.

(Express Photo)

-संतोष प्रधान

‘आता फोनची घंटा वाजणार नाही’ ही माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या निधनानिमित्त उमटलेली एक बोलकी प्रतिक्रिया. कारण हिमाचल या पर्वतमय प्रदेशातील दुर्गम भागातली दूरध्वनी सेवा पोहचावी म्हणून सुखराम यांनी प्रयत्न केले होते. वयाच्या ९४व्या वर्षी हिमाचल प्रदेशमधील या नेत्याने अखेरचा श्वास घेतला. देशातील काँग्रेसच्या राजकारणातील एक महत्त्वाचा नेता. काँग्रेसमध्ये हयात घालविलेल्या या नेत्याने अखेरच्या काळात भाजपशी घरोबा केला. काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून भाजपचे नेते नेहमीच नाके मुरडतात. सुखराम यापैकी एक. सुखराम यांना शिक्षा झाल्यावर भाजपने काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून आकाशपाताळ एक केले होते. पण याच सुखराम यांच्याबरोबर हिमाचलमधील सत्तेसाठी भाजपने आधी हातमिळवणी केली, तर नंतर त्यांना पक्षात सन्मानाने सामावून घेतले.

सुखराम यांची देशात ओळख असण्याचे कारण काय? –

काँग्रेसच्या जुन्या पठडीतील नेत्यांपैकी सुखराम हे एक नेते होते. हिमाचल प्रदेशातील ब्राह्मण समाजातील या नेत्याने राज्याच्या राजकारणावर स्वत:चा ठसा उमटविला. पण केंद्रात दूरसंचारमंत्री म्हणून त्यांनी बजावललेली भूमिका अधिक गाजली. हिमाचल प्रदेश या पर्वतमय राज्याच्या कानाकोपऱ्यात दूरध्वनी सेवा पोहचली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतात मोबाइल सेवा सुरू झाली तेव्हा १९९६ मध्ये मोबाइलवरून पहिला फोन सुखराम यांनी केला होता.

सुखराम यांची राजकीय कारकीर्द –

सुखराम यांनी १९६३ ते १९८४ या काळात हिमाचल प्रदेश विधानसभेवर सातत्याने निवडून येत. १९८४मध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण उत्पादन, नियोजन आणि अन्न व नागरी पुरवठा या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले होते. १९९३ ते १९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून काम केले होते. पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोकप्रतिनिधी, मंत्रिपदे भूषविली तरीही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही.

सुखराम वादग्रस्त कशामुळे ठरले? –

केंद्रातील पी. व्ही . नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये १९९३ ते १९९६ या काळात सुखराम यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती भूषविली होती. दूरध्वनी सेवेचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. पण मंत्रिपद भूषविताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. १९९६ मध्ये सुखराम यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सीबीआयचा छापा पडला असता त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली होती. सुखराम यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप झाले. मंत्रिपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. भ्रष्टाचाराशी त्यांचे नाव जोडले गेल्याने काँग्रेस पक्षातून सुखराम यांना निलंबित करण्यात आले. काँग्रेस पक्षाने दूर केल्यावर स्वत:चे राजकीय अस्तित्व कायम राखण्याकरिता त्यांनी हिमाचल विकास काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. भ्रष्टाचार आणि गैरव्यवाहारांच्या खटल्यात २०१२ मध्ये न्यायालयाने सुखराम यांना दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. वयाच्या ८४व्या वर्षी सुखराम यांना तुरुंगात जावे लागले. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लगेचच जामीन मंजूर केला होता.

भाजपशी कधी हातमिळवणी केली? –

१९९६ मध्ये सुखराम यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सुखराम यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. त्यावर मात करण्याकरिताच सुखराम यांनी हिमाचल विकास काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. काँग्रेसला धडा शिकविण्याकरिता त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. १९९८ मध्ये झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच सत्ता मिळवून देण्यात सुखराम यांची भूमिका महत्त्वाची ठरली. १९९६मध्ये सीबीआयच्या छाप्यानंतर भाजपने सुखराम यांच्यावर अनेक आरोप होते तसेच यथेच्छ टीकाही केली होती. तरीही भाजपने सत्तेसाठी सुखराम यांच्याशी हातमिळवणी केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुखराम हे काँग्रेसमध्ये परतले. पण फार काळ काँग्रेसमध्ये रमले नाहीत. २०१७ मध्ये सुखराम व त्यांच्या मुलाने अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मंडी हा सुखराम यांचा बालेकिल्ला. सुखराम यांच्या प्रभावामुळेच मंडी भागातील १० पैकी नऊ जागा तेव्हा भाजपला मिळाल्या होत्या. २०१२मध्ये पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊनही भाजपने सुखराम यांना पक्षात प्रवेश दिला होता. भाजपची भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई किती पोकळ आहे अशी तेव्हा भाजपवर अन्य पक्षांनी टीका केली होता. वादग्रस्त अशी प्रतिमा किंवा शिक्षा झाल्यावरही भाजपने सुखराम यांना पक्षात सन्मानाने प्रवेश दिला होता. कालांतराने भाजपने अनेक नेत्यांना पक्षात सामावून घेतले. पण वादग्रस्त असतानाही भाजपने पक्षात प्रवेश दिलेले सुखराम हे पहिले नेते होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained sukhram the first controversial leader to be accommodated by the bjp print exp msr