कोकणच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इथे पर्यटनाबरोबरच आंबा, काजू आणि मासळी ही नैसर्गिक उत्पादने महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः आंबा हे या प्रदेशातले नगदी पीक मानले जाते. त्यातही इतर आंब्यांच्या तुलनेच हापूस आंब्याचे काही वेगळेच महात्म्य असते. मात्र गेल्या काही वर्षांतील लहरी हवामानाचा फटका ‘कोकणच्या राजा’ला बसू लागला आहे. तशात कर्नाटकी आंब्याकडून स्पर्धा आणि कीडरोगाचा धोका ही नवी संकटे उभी राहिली आहेत.

कोकणात हापूस आंबा कसा आला?

फळांच्या या राजाचा इतिहास रंजक आहे. इ.स. १५१०-१५ या काळात अल्फान्सो डी अल्बुकर्क या नावाचा पोर्तुगीज व्हाइसरॉय गोव्यामध्ये कारभार पाहत होता. त्याने आंब्याची विशिष्ट प्रकारची रोपे मलेशियातून इथे आणली. या रोपांचे स्थानिक आंब्याच्या जातींवर कलम बांधण्यात आले. या कलमाला व्हाइसरॉयचे नाव – अल्फान्सो – दिले गेले. हाच आपला हापूस आंबा पुढे गोव्यातून कोकणात आला आणि इथे स्थिरावला. काही शतकांचा इतिहास असूनही सुमारे ३५-४० वर्षांपूर्वीपर्यंत या फळाची कोकणातही फार मोठ्या प्रमाणात लागवड केली जात नव्हती. पण १९९३-९४ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेअंतर्गत येथे फळबाग लागवड मोहीम हाती घेण्यात आली. आंब्यासाठी पोषक जमीन आणि अनुकूल हवामानामुळे त्याच्या लागवडीची मोहीम जोरात सुरू झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६७ हजार हेक्टर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. यापैकी काही ठिकाणी आंब्याच्या पूर्वापार, पिढीजात बागा होत्या. मात्र अनेक ठिकाणी नव्याने जमीन विकसित करून किंवा काही मंडळींनी खास गुंतवणूक करून आंबा कलमांची लागवड केली.

india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर

हेही वाचा – ‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

आंब्याचा हंगाम किती महिने?

हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र हवा तेवढा पिकत असावा, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर आणि दापोली या तालुक्यांमध्ये हापूसचे उत्पादन जास्त चांगल्या प्रकारे होते. विशेषतः अशा कातळाची जमीन असलेल्या किंवा खाडी पट्ट्याच्या भागात आणि पूर्वापार लाल मातीच्या जमिनीत हा चांगला पिकतो. शिवाय हा सर्वत्र एकाच वेळी पिकत नाही. तर दक्षिणेकडून मुरमाड, कातळाची जमीन किंवा खाडीपट्ट्यात साधारणत: फेब्रुवारीपासून कोकणातल्या आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि जिल्ह्याच्या अंतर्भागात तो अगदी मे अखेरपर्यंत चालतो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील सुप्रसिद्ध देवगडचा आंबा सर्वांत आधी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच बाजारात दाखल होतो. त्यामुळे त्याचा हंगामही लवकर संपतो. पण त्या पाठोपाठ राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, पावस, गणपतीपुळे, जयगड, संगमेश्वर, मंडणगडमधील बाणकोट या परिसरातील आंबा तयार होऊ लागतो. जंगल भाग किंवा नदी किनारी परिसरातील आंबा म्हणजेच संगमेश्‍वर, चिपळूणमधील आंबा साधारणतः एप्रिल-मे महिन्यात पिकतो. त्यामुळे, आंब्याचा एकूण हंगाम सुमारे साडेतीन-चार महिने चालू राहतो.

बदलत्या निसर्गचक्रात अडकला ‘राजा’?

नैसर्गिक रचना आणि हवामान व्यवस्थित असेल तेव्हा या आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होते. पण यामध्ये थोडा बिघाड झाला तरी उत्पादनाचे प्रमाण, स्वरूप आणि दर्जामध्ये लक्षणीय फरक होतो. गेल्या दहा-बारा वर्षांत त्याचा वारंवार अनुभव येत आहे. कधी लांबणारा पावसाळा, तर कधी कमी काळ टिकणारी थंडी आणि भाजून काढणारा उन्हाचा कडाका असे तिन्ही ऋतूंचे विपरित वर्तन त्याचा घात करत आहे. या बदललेल्या हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. एरवीही आंब्याच्या झाडाला चांगला मोहोर येण्यासाठी सुमारे १४-१५ अंश किमान तापमान असलेली थंडी पडावी लागते आणि फळधारणा झाल्यानंतर आंबा चांगल्या प्रकारे पिकण्यासाठी सुमारे ३०-३५ अंशांपर्यंत तापमान लागते. हा काटा थोडा पुढे सरकला तरी हा नाजूक राजा करपतो. फळ लहान असताना तापमान वाढले तर ते गळून पडते आणि मोठे झाले असताना ३५ अंशांपुढे तापमान गेले तर त्याची साल भाजून निघते. थोडक्यात, आंब्याचा मोहोर, कणी, कैरी या प्रत्येक टप्प्यावर या हवामानाचे संतुलन आवश्यक असते. ते थोडे जरी बिघडले तरी अंतिम उत्पादनाला फटका बसतो.

यंदा आंब्याची स्थिती काय?

दरवर्षी कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे एक लाख पेटी आंबा वाशीच्या घाऊक बाजारपेठेत जातो. गेल्या वर्षी हा आकडा २५-३० हजारांवर अडकला. यंदा उद्दिष्ट गाठले, पण फळाचा आकार अपेक्षेएवढा राहिलेला नाही. बहुसंख्य फळ सुमारे दोनशे-अडीचशे ग्रॅमपर्यंत आहे. कारण यंदा अपेक्षित थंडी पडली नाही. दिवस आणि रात्रीच्या तापमानात फार फरक राहिला नाही. त्यामुळे आंब्याचा गर चांगला तयार झाला, पण बाकी वाढ व्यवस्थित, समान पद्धतीने झाली नाही. शिवाय मध्यंतरीच्या काळात तापमान गरजेपेक्षा जास्त वाढल्याने फळ पिकण्याच्या प्रक्रियेलाही नेहमीपेक्षा जास्त गती आली आणि बाजारातील आवक वाढून दर पडले.

कीडरोगाचाही फटका?

हवामानातील या बदलांबरोबरच कीडरोगाचेही प्रमाण वाढले आहे. विशेषतः, यंदाच्या हंगामात फुलकिडीने (थ्रिप्स) येथील बागायतदारांचे खर्चाचे गणित पार बिघडवले आहे. ही कीड आटोक्यात आणण्यासाठी औषधांच्या फवारण्या वाढल्या. त्यामुळे खर्चात वाढ झाली, पण उत्पादनात घट होऊन अंतिम गणित घाट्याचे झाले आहे.

हेही वाचा – प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

सर्वसामान्य ग्राहकाचा पाडवा गोड…

गेल्या काही वर्षात हापूसच्या आंब्याला कर्नाटकच्या आंब्याची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात वाशीच्या बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली असतानाच कर्नाटकी आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल झाला. त्यामुळे दर पडले. अशा परिस्थितीत बागायतदारांच्या दृष्टीने यंदाचा पाडवा फारसा आनंदाचा गेला नसला तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी दरवर्षाच्या तुलनेत खिशाला परवडणाऱ्या दरात आंबा मिळाल्याने पाडवा गोड झाला.

भविष्यातील वाटचालही अस्थिर, अनिश्चित?

‘हवामान बदल’ हा गेल्या काही वर्षांत परवलीचा शब्द झाला आहे. भारतासारख्या उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू तीव्र असणाऱ्या देशात त्याचे जास्त गंभीर परिणाम अनुभवाला येत आहेत. अशा परिस्थितीत या चक्राच्या संतुलनावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या हापूस आंब्याचे भवितव्य निश्चितपणे सांगणे कठीण होऊन बसले आहे. हे चक्र बिघडतच राहिले तर फळांच्या या राजाचीही भविष्यातील वाटचाल अस्थिर, अनिश्चित राहणार आहे.

satish.kamat@expressindia.com