स्वामित्व हक्काचे उल्लंघन झाल्याबद्दल ह्यूमन्स ऑफ बॉम्बे (HOB) या इन्स्टाग्राम हँडलने पिपल ऑफ इंडिया (POI) या इन्स्टाग्राम हँडलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी पिपल ऑफ इंडिया हँडलला समन्स बजावले आहे. एचओबी हँडलवरून ज्या पद्धतीने सामान्य लोकांच्या कथा सांगितल्या जातात, त्याच प्रकारचे सादरीकरण पीओआय हँडलवरून केले जात आहे, असा आरोप एचओबीने केला. एचओबी या इन्स्टाग्राम हँडलला २७ लाख फॉलोअर्स आहेत, तर पीओआय हँडलचे १५ लाख फॉलोअर्स आहेत.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे (HOB) कडून ज्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात, त्याचे मोठ्या प्रमाणात अनुकरण किंवा नक्कल पीओआयकडून केली जात आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले. दोन्ही हँडलवर फोटोंचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे साधर्म्य आढळल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या एकलपीठाने पीओआयला समन्स बजावून ११ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील वैशिष्ट्य असे की, यामध्ये स्वामित्व हक्काचे उल्लंघन (copyright infringement) आणि सादरीकरणाचे अनुकरण (passing off) या दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. पासिंग ऑफ ही युकेमधील कायद्याची संकल्पना आहे. ट्रेडमार्क, चिन्ह आणि नाव याची नक्कल करण्याबाबतचा हा कायदा आहे. स्वामित्व हक्क उल्लंघनाच्या बाबत कायदे काय सांगतात? याबाबत माहिती घेऊ.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने उच्च न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला?
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने याचिकेद्वारे सांगितले की, आमचा स्वतःचा कथा सांगणारा प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर आहे. त्या माध्यमातून सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कथा आम्ही सांगतो. यासाठी कधी मुलाखती, लेख किंवा पोस्टच्या माध्यमातून कथा सादर केल्या जातात. या कथा गोळा करण्यासाठी भरीव संशोधन करण्यात येते. तसेच ज्यांना स्वतःची कथा जगासमोर आणण्यात स्वारस्य आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संवाद साधणे यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एचओबीने पुढे सांगितले की, लोकांशी संपर्क साधल्यानंतर ऑडिओ-व्हिडीओ माध्यमातून तयार केलेली कथा वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाते. याचिकेत म्हटले आहे की, पिपल ऑफ इंडिया (POI) या इन्स्टाग्राम हँडलचे १५ लाख फॉलोअर्स असून त्यांनी आमच्या पोस्टमधील फोटो आणि व्हिडीओ वापरून त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी त्याचा वापर केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने मागणी केली आहे की, पीओआयने त्यांच्या मजकुराशी निगडित जेवढ्या गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरलेल्या आहेत, त्या सर्व त्यांच्या हँडलवरून काढून टाकण्यात याव्यात. एचओबीची स्थापना २०१४ साली झाली. न्यूयॉर्कमधील फोटोग्राफर ब्रँडन स्टँटंन यांनी २०१० साली स्थापन केलेल्या “ह्यूमन्स ऑफ न्यूयॉर्क” यावरून एचओबीने कथितपणे प्रेरणा घेतली असे सांगितले जाते.
लक्षणीय अनुकरण हे स्वामित्व हक्काचे उल्लंघन कसे होते?
स्वामित्व हक्क कायद्यांतर्गत कलाकारांची कलाकृती-चित्र, शिल्प, छायाचित्र, संगीत, साहित्य, नाट्यकृती यांच्यासह चित्रपट तसेच ध्वनिमुद्रण यांचा समावेश आहे. या कायद्यामुळे सर्जनशील व्यक्तीच्या प्रतिभेचे, निर्मितीचे संरक्षण होते. स्वामित्व हक्क कायद्याने कलाकृतीच्या निर्मात्याला विविध हक्क प्रदान केले आहेत. यामध्ये पुन्हा निर्माणाचा हक्क, लोकांशी संवाद साधणे, रुपांतर करणे आणि भाषांतर करण्याच्या कामाचा समावेश होतो. स्वामित्व हक्क कायदा, १९५७ (The Copyright Act, 1957) च्या माध्यमातून कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करण्यात आलेले आहे. कलावंताला स्वामित्व हक्काच्या कायद्याचे कवच लाभले आहे, असेही म्हणता येईल.
एचओबीच्या याचिकेवर युक्तीवाद सुरू असताना पीओआयने त्यांच्या सेवांशी साधर्म्य असणारे पोर्टल आणि सोशल मीडिया हँडल तयार केले. या दोघांमध्ये लक्षणीय अनुकरण असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. तथापि, लक्षणीय या शब्दाचा अर्थही प्रत्येक प्रकरणानुसार वेगवेगळा घेण्यात येतो. अशा प्रकरणात अनुकरणाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या गीतकाराने दुसऱ्या एखाद्या गाण्यातील सर्वात आकर्षक किंवा लोकप्रिय वाक्याचा भाग उचलला तरीही ते उल्लंघन मानले जाईल. इथे वाक्य लहान असले तरी त्याची गुणवत्ता पाहिली जाते.
स्वामित्व हक्काचे उल्लंघन म्हणजे काय?
जेव्हा संमती न घेता एखाद्या कलाकृतीमधील महत्त्वाचा भाग वापरला जातो, तेव्हाच स्वामित्व हक्काचे उल्लंघन झाले असे मानले जाते. जर उल्लंघन झाल्याचा प्रकार लक्षात आला तर कलकृतीचा निर्माता उचलेगिरी करणाऱ्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागू शकतो. स्वामित्व हक्काचा भंग झाल्याबद्दल उचलेगिरी केलेल्या कलाकृतीला मनाई आदेश देणे, नुकसान भरपाई मिळणे किंवा आर्थिक दंड लगावला जाऊ शकतो. मनाई हुकूम देऊन (injunction) न्यायालय एखादी गोष्ट थांबविण्याचा अधिकृत आदेश देऊ शकते. उदाहरणार्थ – एखाद्या चित्रपटातील गाणे उचलेले असेल तर न्यायालय ते दाखवू नये, असा आदेश देऊ शकते.
“एचओबी स्टोरीज प्रा. लि विरुद्ध पीओआय सोशल मीडिया” या खटल्यात फिर्यादी असलेल्या एचओबीने त्यांच्या मजकुराची उचलेगिरी होण्यापासून मनाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेले साहित्य विषयक काम, फोटो किंवा व्हिडीओ, कल्पक अभिव्यक्ती यांचा समावेश आहे.
मात्र, मनाई हुकूमाद्वारे फक्त प्रतिबंधात्मक निर्देश दिले जातात. त्याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी उचलेगिरी झाली आहे, त्या त्या ठिकाणी दुरुस्ती होईल असे नाही. कारण न्यायालयाने मनाई आदेश दिल्यानंतर कुठे कुठे कलाकृतीची चोरी झाली आहे, हे शोधणे आणि त्याचा मागोवा घेणे सोपे नाही. या प्रकरणात ‘एचओबी’ला गुगलसारख्या मध्यस्थ्याला उल्लंघन झालेले काम काढून टाकण्यासाठी वेगळे आदेश द्यावे लागतील.
दिल्ली उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी १८ सप्टेंबर रोजी प्रतिवादी पीओआय सोशल मीडिया प्रा. लि. यांना समन्स बजावले. तसेच हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात कसे येते? हे निदर्शनास आणून देण्यासाठी एचओबीच्या वकिलांनाही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढची सुनावणी घेण्यासाठी एकलपीठाने ११ ऑक्टोबर तारीख दिली. तसेच एचओबी स्टोरीज प्रा. लि. च्या याचिकेनंतर त्यांना अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढचा आदेश येईपर्यंत पीओआयला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एचओबीने सादर केलेल्या कथा पोस्ट करता येणार नाहीत. तसेच त्यांच्या सादरीकरणाच्या शैलीची नक्कल करता येणार नाही.