India’s bunker buster missile: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणच्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर जीबीयू-५७ बंकर बस्टर्स बॉम्बने हल्ला केला. या हवाई हल्ल्याने इराणच्या या प्रमुख अणुस्थळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाकिस्तानशी वाढत असलेल्या तणावामुळे आता भारतालाही संरक्षण धोरणाचा टर्बो मोड ऑन करावा लागणार आहे. खरे तर, इराणने डोंगराळ भागात जमिनीपासून १०० मीटर खोल फोर्डो प्रकल्प उभारला होता. त्याला उद्ध्वस्त करणे ही साधारण स्फोटाने साध्य होणारी बाब नव्हती. म्हणूनच अमेरिकेने या अणुऊर्जा प्रकल्पावर बंकर बस्टर्स बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. हे बॉम्ब आधी जमिनीत ५० ते ६० मीटर खोलवर भगदाडे तयार करतात आणि मग जमिनीत घुसून त्यांचा स्फोट होतो. म्हणजेच शत्रूच्या भूमिगत सुविधांना लक्ष्य करून, उद्ध्वस्त करण्यासाठी हे बॉम्ब वापरले जातात.
याच पार्श्वभूमीवर भारतदेखील अग्नी-५ हे बंकर-बस्टर वॉरहेडसह अपग्रेड करणार आहे, जे शत्रूच्या कितीही मजबूत आणि शक्तिशाली भूमिगत तळांना उद्ध्वस्त करू शकते.
इराणमध्ये काय घडले?
२२ जून २०२५ रोजी अमेरिकेने बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सने इराणच्या फोर्डो, मतान्झ व इस्फहान या तीन प्रमुख अणुस्थळांवर स्फोटक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सुमारे १३ हजार ६०० किलो वजनाचे जीबीयू-५७ मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बॉम्ब वापरण्यात आले. ते जमिनीपासून २०० फूट खाली घुसून बंकर नष्ट करू शकतात. इराणच्या सर्वांत शक्तिशाली आणुऊर्जा केंद्र फोर्डोला अशा प्रकारच्या सहा बॉम्बद्वारे लक्ष्य करण्यात आले. त्यासोबतच अमेरिकन नौदलाच्या पाणबुड्यांनी ३० टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रेही डागली. या ऑपरेशनचे नाव ‘मिडनाईट हॅमर’, असे होते. संपूर्ण जगाचे लक्ष या मिशनने वेधले होते. मात्र, भारतासाठी ही केवळ बातमी नव्हती, तर ती एक धोक्याची घंटा होती.
भारताचे पाऊल काय?
अमेरिका-इराणच्या या लष्करी संघर्षामुळे भारताला त्याच्या बंकर बस्टर तंत्रज्ञानावर जलद गतीने काम करण्यास भाग पाडले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO)ने त्यांच्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची क्षमता आणि ताकद अधिक वाढवून, ते आणखी घातक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अग्नी-५ आता बंकर बस्टर वॉरहेडसह अपग्रेड केले जात आहे. ते शत्रूच्या भूमिगत तळांनाही नष्ट करू शकते. हे क्षेपणास्त्र आधीच पाच हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. आता त्यात अपग्रेडेड वॉरहेड जोडल्यानंतर ते आणखी धोकादायक श्रेणीत गणले जाईल.
बंकर बस्टर म्हणजे नेमकं काय?
असे समजा की, शत्रूने त्यांची शस्त्रे किंवा अणुस्फोटके मजबूत काँक्रीटच्या बंकरमध्ये जमिनीखाली लपवली आहेत. साधारण बॉम्ब त्यांचे काहीही नुकसान करू शकत नाही. नेमक्या अशा जिकिरीच्या परिस्थितीत बंकर बस्टर उपयोगी पडतो. हे बॉम्ब आधी जमिनीत खोलवर खोलवर भगदाड करून घुसतात आणि नंतर त्याचा स्फोट होतो. अमेरिकेचे जीबीयू-५७ हे असेच एक शस्त्र आहे. ते ६० फूट काँक्रीट किंवा २०० फूट मातीमध्ये घुसू शकते. भारताकडे सध्या असा कोणताही बॉम्ब नाही. मात्र, डीआरडीओ आता अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर खास लक्ष ठेवून आहे. यापूर्वी भारताने २०१९ च्या बालाकोट हल्ल्यात इस्रायली स्पाईस-२००० बॉम्ब आणि राफेल जेटचे हॅमर क्षेपणास्त्र वापरले होते. त्यामार्फत जमिनीमध्ये असलेले बंकर नष्ट करण्याची क्षमता होती.

भारताचा डिफेन्स गेम प्लॅन
डीआरडीओचा हा प्रकल्प भारताच्या धोरणात्मक वर्चस्वाला आणखी बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. अलीकडेच भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. त्यामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. आता अग्नी-५ ला बंकर बस्टरमध्ये परावर्तित करून, भारत शेजारी देशांना पाकिस्तान आणि चीनला कोणत्याही आव्हानांसाठी तयार असल्याचा स्पष्ट संदेश देतो.
या प्रकल्पासमोर कोणती आव्हानं आहेत?
डीआरडीओचा गेम प्लॅन तर आहेच; मात्र हा प्रकल्प तेवढा सोपा नाही. बंकर बस्टर क्षेपणास्त्र बनवणे हे तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या बरेच महाग आहे. तसेच त्याचा प्रादेशिक आणि जागतिक राजनैतिकतेवर परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांशी केलेल्या संभाषणात व्यक्त केल्याप्रमाणे भारत नेहमीच शांतता आणि राजनैतिकतेचा पुरस्कार करीत आला आहे. मात्र, संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी देण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.
पुढे काय?
अमेरिका-इराण संघर्षाने हे दाखवून दिले आहे की, बंकर बस्टरसारखी ही शस्त्रे कशी गेम-चेंजर ठरू शकतात. तेव्हा भारताचे अग्नी-५ बंकर बस्टर जगाचे लक्ष वेधून घेईल का याचे उत्तर येत्या काळात मिळेलच.
भारतीय बंकर बस्टरची सक्षमता
नव्याने विकसित होणाऱ्या अग्नी-५ च्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये सुमारे आठ टन वजनाचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असेल. त्यामुळे ते जागतिक स्तरावर सर्वांत शक्तिशाली पारंपरिक शस्त्रांपैकी एक ठरेल. अग्नी-५ च्या मूळ आवृत्तीच्या तुलनेत दोन्ही नवीन आवृत्त्यांची श्रेणी २,५०० किमीने वाढेल. मात्र, त्यांची विध्वंसक क्षमता व अचूकता यांमुळे ते भारताच्या ताफ्यात उपलब्ध असलेले एक शक्तिशाली शस्त्र ठरेल. ही दोन्ही शस्त्रे प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू देशांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, क्षेपणास्त्र साइट्स आणि इतर महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
या क्षेपणास्त्रांचा वेग मॅक ८ ते मॅक २० (ध्वनीच्या वेगाच्या ८ ते २० पट)दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ती हायपरसोनिक शस्त्रांच्या श्रेणीत येतात. या क्षेपणास्त्राची गती अमेरिकेच्या बंकर बस्टर शस्त्रप्रणालीच्या गतीइतकीच असेल; मात्र त्यांची पेलोड क्षमता खूपच जास्त असेल. अशी शस्त्रास्त्रे स्वदेशी पद्धतीने विकसित आणि तैनात करण्याचे भारताचे हे प्रयत्न त्याच्या वाढत्या लष्करी क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता होण्याच्या दृष्टीने वाटचाल दर्शवितात