इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामापूर्वीचा खेळाडू लिलाव शुक्रवारी पार पडला. या लिलावात विश्वविजेत्या इंग्लंडचे खेळाडू प्रमुख आकर्षण ठरले. दहाही संघांमध्ये इंग्लंडच्या काही आघाडीच्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. इंग्लंडचा डावखुरा अष्टपैलू सॅम करनला पंजाब किंग्जनी तब्बल १८.५० कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे तो ‘आयपीएल’ खेळाडू लिलावाच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि युवा फलंदाज हॅरी ब्रूक यांच्यावरही मोठी बोली लावण्यात आली.
करनवर विक्रमी बोली का लावण्यात आली?
डावखुरा मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असलेल्या सॅम करनवर यंदाच्या लिलावात मोठी बोली लागणार हे अपेक्षितच होते. करनने यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती आणि इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. करनने या स्पर्धेच्या सहा सामन्यांत १३ गडी बाद केले होते. तसेच त्याने केवळ ६.५२च्या धावगतीने धावा दिल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्ध १० धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२ धावांतच ३ बळी मिळवले होते. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यामुळेच ‘आयपीएल’ खेळाडू लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
करनने कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला?
लिलावात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे संघ करनला खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसले. अखेरीस पंजाबने १८.५० कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह करनला आपल्या संघात समाविष्ट केले. त्यामुळे तो ‘आयपीएल’ खेळाडू लिलावाच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या नावे होता. मॉरिसला २०२१च्या लिलावात राजस्थान रॉयल्सनी १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते.
करनला यापूर्वी ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचा किती अनुभव?
करनने यापूर्वी पंजाब आणि चेन्नई या संघांचे प्रतिनिधित्व करताना ‘आयपीएल’मध्ये ३२ सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने ९.२१च्या धावगतीने आणि ३१.०९च्या सरासरीने (एका बळीमागे धावा) ३२ बळी मिळवले आहेत. तसेच फलंदाजीतही उपयुक्तता सिद्ध करताना त्याने दोन अर्धशतकांच्या मदतीने ३३७ धावा केल्या आहेत. करनला सर्वप्रथम पंजाबने २०१९च्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात ७.२ कोटी रुपयांत खरेदी केले होते. आता पुन्हा पंजाबने विक्रमी बोली लावताना करनला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
इंग्लंडचे अन्य कोणते खेळाडू ठरले आकर्षण?
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू स्टोक्सवर यंदाच्या लिलावातील तिसरी सर्वांत मोठी बोली लागली. स्टोक्सला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनी १६.२५ कोटी रुपयांच्या बोलीसह आपल्या संघात स्थान दिले. स्टोक्ससाठी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेरीस चेन्नईने बाजी मारली. सनरायजर्स हैदराबादनी इंग्लंडचा युवा फलंदाज ब्रूकवर १३.२५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली. तसेच लेग-स्पिनर आदिल रशीदलाही सनरायजर्सनी मूळ किंमत २ कोटी रुपयांमध्ये, तर अष्टपैलू विल जॅक्सला बंगळूरुने ३.२० कोटी रुपयांत खरेदी केले.
हेही वाचा- IPL Auction 2023: कोट्यावधींचा झाला व्यवहार! तब्बल सहा तास चाललेल्या लिलावात ८० खेळाडूंचे चमकले नशीब
ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनसाठा मुंबईने मोठी रक्कम का मोजली?
यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा २३ वर्षीय अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दुसरा सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सनी १७.५ कोटी रुपयांत खरेदी केले. आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्त मध्यम गती गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रीनला यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. दशकभरापासून मुंबईच्या संघाचा आधारस्तंभ असलेला अष्टपैलू किरॉन पोलार्डने यंदाच्या हंगामापूर्वी ‘आयपीएल’मधून निवृत्ती पत्करली. आता त्याची जागा घेण्याची जबाबदारी ग्रीनवर असेल.