रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

भारतातील विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतानाच आता परदेशी विद्यापीठातही काही काळ शिकण्याची संधी मिळू शकणार आहे. भारतीय आणि परदेशी विद्यापीठे यांच्यात करार करून एकत्रित पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार असून अशा अभ्यासक्रमांची कक्षा आता विस्तारणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत नव्या नियमावलीला मान्यता देण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आदान-प्रदान उपक्रमाला २०१२ पासून परवानगी आहे. त्या परिपत्रकात २०१६ मध्ये काही सुधारणा करून विद्यापीठांचे स्वातंत्र्य आणखी वाढवण्यात आले. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परदेशी विद्यापीठांना भारतात अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार आयोगाने पावले उचलली आहेत.

अभ्यासक्रमांचे स्वरूप कसे असेल?

भारतीय आणि परदेशी विद्यापीठे एकमेकांशी करार करून एकत्रित अभ्यासक्रम सुरू करू शकतील. जोड अभ्यासक्रमाबरोबरच (ट्विनिंग प्रोग्रॅम), सामायिक पदवी (जॉइंट डिग्री) आणि दुहेरी पदवी (डय़ुएल डिग्री) अशा तीन स्वरूपांत अभ्यासक्रम सुरू करता येतील. यातील ट्विनिंग प्रोग्रॅममध्ये विद्यार्थी कमाल ३० टक्के श्रेयांक परदेशी विद्यापीठातून मिळवू शकतील. जॉइंट आणि डय़ुएल डिग्रीमध्ये किमान ३० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक श्रेयांक परदेशी विद्यापाठातून घ्यावे लागतील. मात्र हे अभ्यासक्रम नियमित, प्रत्यक्ष अध्यापन होणारे असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून मिळवलेली पदवी या योजनेत ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ परदेशी जाऊन शिकावे लागेल. एक किंवा दोन सत्रे विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकू शकतील. अभ्यासक्रमाचा आराखडा भारतीय विद्यापीठांतील नियमित अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा असणे अपेक्षित आहे. परदेशातील विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठाने मिळून अभ्यासक्रमाचा आराखडा करणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तो मध्येच सोडायचा असल्यास तशी मुभा विद्यार्थ्यांला असेल. दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी त्याचे श्रेयांक ग्राह्य धरण्यात येतील.

प्रवेश प्रक्रिया, शुल्क कसे असेल?

या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी असावी याबाबत आयोगाने ठोस सूचना दिलेल्या नाहीत. पण दोन्ही विद्यापीठांनी मिळून तिचे निकष ठरवावेत असे सांगितले आहे. या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठांना देताना अवाजवी शुल्क आकारू नये अशी सूचना दिली आहे. परदेशातील तसेच भारतीय विद्यापीठाचे शुल्क, वास्तव्य, इतर खर्च मिळून या अभ्यासक्रमांचे शुल्क असेल. त्यामुळे अर्थातच ते भारतातील नियमित अभ्यासक्रमांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आखव्यात, शुल्क रचना, योजना, प्रवेश प्रक्रिया यांचे तपशील वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक आहे.

पदवी कुणाची मिळणार?

दोन विद्यापीठांच्या एकत्रित अभ्यासक्रमाची पदवी अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार वेगवेगळी मिळेल. ट्विनिंग प्रोग्रॅममध्ये भारतीय विद्यापीठच पदवी देईल. त्यावर अभ्यासक्रमाचा उल्लेख असेल. जॉइंट डिग्री स्वरूपातील अभ्यासक्रमाची पदवीही भारतीय विद्यापीठाची असेल मात्र त्याचबरोबर परदेशी विद्यापीठ प्रमाणपत्र देईल. डय़ुएल डिग्री स्वरूपातील अभ्यासक्रमासाठी दोन्ही विद्यापीठे सामायिक पदवी देतील. म्हणजेच दोन्ही विद्यापीठांच्या नावे ही पदवी असेल. मात्र या दोन स्वतंत्र पदव्या असणार नाहीत. एकाच विद्याशाखेतील ही पदवी असेल. भारतीय विद्यापीठांमध्ये पदवीचे नामाभिधान आयोगाने निश्चित केल्यानुसार असणे आवश्यक आहे. मात्र, परदेशी विद्यापीठाबरोबरील डय़ुएल डिग्री अभ्यासक्रमाचे नामाभिधान ठरवण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठाला असेल.

कोणती विद्यापीठे पात्र असतील?

भारतातील बहुतेक नामवंत विद्यापीठे या नव्या रचनेत परदेशी विद्यापीठांबरोबर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१६ मध्ये जाहीर केलेल्या नियमावलीतील पात्रतेचे निकष काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. विद्यापीठांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर करणाऱ्या क्यूएस किंवा टीएचई या संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या हजारात स्थान मिळवलेली विद्यापीठे पात्र ठरू शकतील. या क्रमवारीसाठी अर्ज केला तरीही बहुतेक विद्यापीठे ८०० ते १००० या क्रमवारीच्या स्तरात गणली जात असल्याचे अहवालांवरून दिसून येते. यापूर्वी पहिल्या ५०० मध्ये स्थान मिळवणारी विद्यापीठेच परदेशी विद्यापीठांबरोबर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र होती. याशिवाय राष्ट्रीय क्रमवारीत (एनआयआरएफ) पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवलेली विद्यापीठे किंवा राष्ट्रीय श्रेयांक आणि मूल्यांकन परिषदेने (नॅक) केलेल्या मूल्यांकनात किमान ३.०१ मूल्यांक मिळवलेली विद्यापीठेही पात्र ठरतील. या निकषांमध्ये बसणाऱ्या विद्यापीठांना पूर्वपरवानगी न घेता थेट परदेशी विद्यापीठांशी करार करता येईल. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या हजारात स्थान मिळवलेल्या परदेशी विद्यापीठांशीच करार करता येईल.

विद्यार्थ्यांचा फायदा काय?

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात काही काळ शिकता येईल. त्याचप्रमाणे भारतात शिकण्यासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांबरोबर शिकण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर परदेशी विद्यापीठातील अभ्याससाहित्य, प्रयोगशाळा, सुविधा वापरता येऊ शकतील. तेथील विद्यापीठातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळू शकेल.

आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील स्थान वधारण्यास कसा फायदा?

या योजनेमुळे भारतातील विद्यार्थ्यांना परदेशी तर तिथल्या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल, अशी आयोगाला आशा आहे. विद्यापीठांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी निश्चित करताना परदेशी विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेण्यात येते.