राज्य सरकारने बृहन्मुंबईतील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत भुयारी मार्गांचे जाळे विणता येईल का याचा अभ्यास करण्याकरीता एक समिती स्थापन केली आहे. या समितीने मुंबईत कुठे, किती आणि कसे भुयारी मार्ग बांधता येतील याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या अभ्यासाला सुरुवात होणार असून या अनुषंगाने मुंबईत येत्या काळात भुयारी मार्गांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा भुयारी मार्गांसंबंधीचा नेमका निर्णय काय आहे याबाबत घेतलेला हा आढावा…
वाहतूक कोंडीने हैराण
देशाची आर्थिक राजधानी आणि आंतराराष्ट्रीय दर्जाचे शहर अशी ओळख असलेल्या मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळत असल्याने राज्यातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक मुंबईत नोकरी-धंद्यासाठी येतात. त्यामुळे आजघडीला मुंबईतील लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा, रस्ते अपुरे पडत असून वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. उपनगरीय रेल्वेतही तुडुंब गर्दी असते. तर दुसरीकडे रस्त्यांवरील वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी आदी सरकारी यंत्रणा विविध प्रकल्प राबत आहेत. मेट्रो, सागरी सेतू, सागरी मार्ग, उन्नत रस्ते, उड्डाणपूल बांधले जात आहे. मात्र तरीही वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आता राज्य सरकारने इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे.
भुयारी मार्गांचे जाळे?
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही वाहतूक कोंडी दूर होत नसल्याने, तसेच नवीन प्रकल्प राबविण्यासाठी आता मुंबईत पुरेशी जागाच नसल्याने हा प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न राज्य सरकार समोर होता. त्यावर उतारा म्हणून राज्य सरकारने मुंबईत भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करता येईल का यादृष्टीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. भुयारी मार्गांसंबंधीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी २०२३ मध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची ही समिती असून यात एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या अभियंत्यांचाही समावेश आहे. मात्र भुयारी मार्गांच्या अभ्यासाला अद्याप सुरुवात झालेली नाही. आता लवकरच या अभ्यासाला सुरुवात होणार आहे.
पालिकेकडून महिन्याभरात सल्लागाराची नियुक्ती
राज्य सरकारने समिती स्थापन करून भुयारी मार्गांचा अभ्यास आणि सल्लागार नेमण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवली. पालिकेने आतापर्यंत सल्लागाराची नियुक्ती करून अभ्यास करणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने यास विलंब झाला. काही महिन्यांपूर्वीच पालिकेने सल्लागार नियुक्तीसाठीच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात केली आहे. यासाठी पालिकेला दोन निविदा सादर झाल्या आहेत. ॲम्बर्ग इंजिनीअरिंग आणि माईनहार्ट इंडिया या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदांचा छाननी सुरू असून पुढील कार्यवाही करून महिन्याभरात सल्लागाराची नियुक्ती करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
अभ्यासासाठी तीन महिने
मुंबईत कुठे वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे आणि त्या ठिकाणी भुयारी मार्ग शक्य होईल का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी नियुक्त सल्लागारावर असणार आहे. त्यामुळे सल्लागाराचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच भविष्यात मुंबईत कुठे आणि कसे भुयारी मार्ग बांधणार हे स्पष्ट होईल. मात्र त्यासाठी आखणी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी पालिकेला महिन्याभराचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांमध्ये याबाबतचा अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दोन भुयारी मार्गात पडणार भर?
बोरिवली – ठाणे प्रवास अतिजलद व्हावा यासाठी एमएमआरडीएने ठाणे – बोरीवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे पूर्वमुक्त मार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना सीएसएमटीत वाहतूक कोंडीत अडकावे लागते. चर्चगेट, मरीन ड्राईव्हकडे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईतील जागेची टंचाई पाहता एमएमआरडीएने बोगद्यांचा, भुयारी मार्गांचा पर्याय निवडला आहे. भविष्यात मुंबईतील भुयारी मार्गांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात मुंबईत नवीन भुयारी प्रकल्प हाती घेतले जाणार असून काही प्रकल्प एमएमआरडीए, तर काही प्रकल्प पालिका राबविण्याची शक्यता आहे.
