संदीप कदम
निराशाजनक सुरुवातीनंतर पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने ‘आयपीएल’मध्ये दणक्यात पुनरागमन केले आहे. सलग दोन सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात कोणी योगदान दिले, अजूनही मुंबईला कोणत्या गोष्टीवर मेहनत घेणे गरजेचे आहे, याचा घेतलेला हा आढावा.
मुंबई इंडियन्सची सध्याच्या ‘आयपीएल’मधील कामगिरी कशी राहिली?
मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यांचे ९ सामन्यांत पाच विजय आहेत. मात्र, मुंबईची हंगामाची सुरुवात चांगली झाली नव्हती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्जकडून सात गडी राखून हार पत्करली. मुंबईला आपल्या पहिल्या विजयासाठी हंगामातील तिसऱ्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय नोंदवला. यानंतर त्यांनी कोलकाता नाइट रायडर्स संघाला नमवले. त्यांनी सनरायजर्स हैदराबादला नमवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. मात्र, त्यानंतर त्यांना पंजाब किंग्स व गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर राजस्थान रॉयल्स व पंजाब संघांना नमवत आपले ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याचे आव्हान अजून शाबूत ठेवले आहे. मुंबईचे अजून पाच सामने शिल्लक आहेत. ‘प्ले-ऑफ’ गाठायचे असल्यास मुंबईला या सर्व सामन्यांत चमक दाखवावी लागेल.
कोणत्या फलंदाजांनी मुंबईच्या यशात आपले योगदान दिले आहे?
मुंबईकडून इशान किशन, तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईच्या पुनरागमनात निर्णायक भूमिका पार पाडली आहे. आतापर्यंतच्या हंगामात सलामीवीर किशनने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २८६ धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या खालोखाल तिलक वर्माचा क्रमांक लागतो. ९ सामन्यांत २७४ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद ८४ अशी आहे. यानंतर जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवचा क्रमांक येतो. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फारसे योगदान न देणाऱ्या सूर्यकुमारने २६७ धावा केल्या असून यादरम्यान त्याने तीन अर्धशतके झळकावली. सूर्यकुमारने पंजाबविरुद्ध ५७, राजस्थानविरुद्ध ५५ आणि पुन्हा एकदा पंजाबविरुद्धच ६६ धावांच्या खेळी केल्या. गेल्या दोन सामन्यातील विजयात त्याने निर्णायक भूमिका पार पाडली. यासह आक्रमक फलंदाज टिम डेव्हिडनेही गेल्या दोन सामन्यात भरीव योगदान दिले आहे. राजस्थानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना डेव्हिडने १४ चेंडूंत नाबाद ४५ धावांची खेळी केली व पंजाबविरुद्ध त्याने १० चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या.
मुंबईसाठी अनुभवी पीयूष चावला का निर्णायक ठरतो आहे?
भारताचा अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला सध्या मुंबईसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गेल्या हंगामात कोणीही लिलावात बोली न लावलेल्या चावलाला २०२१च्या हंगामात केवळ एकच सामना खेळण्यास मिळाला होता. यावेळच्या हंगामात मुंबईने चावलाला ५० लाख रुपयांना संघात घेतले. आघाडीचे फिरकीपटू या ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवत आहेत. मात्र, चावला सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत चावलाने ९ सामन्यांत १५ गडी बाद केले आहेत. ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत चावला चौथ्या स्थानावर आहे. हंगामातील पहिला सामना सोडल्यास त्याने सर्व सामन्यांत बळी मिळवले आहेत. हंगामात मुंबईचे गोलंदाज खोऱ्याने धावा देत असताना चावला मात्र, किफायतशीर गोलंदाज ठरतो आहे. त्यानंतर मुंबईचा दुसरा यशस्वी गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ आहे. ज्याने ८ गडी बाद केले. त्यामुळे मुंबईला आगेकूच करायची झाल्यास चावलाची भूमिका महत्त्वाची असेल.
मुंबईला कोणत्या गोष्टींवर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे?
मुंबईची गोलंदाजी या हंगामात कमकुवत बाजू म्हणून समोर आली आहे. आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमरा जायबंदी झाल्याने संघाला अजूनपर्यंत योग्य गोलंदाजी पर्याय सापडला नाही. चावला व बेहरेनडॉर्फ वगळता कोणालाही गोलंदाजीत चुणूक दाखवता आली नाही. जोफ्रा आर्चरकडून संघाला अपेक्षा होत्या. मात्र, त्याही फोल ठरल्या. सर्व गोलंदाज मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत. त्यावर मुंबईला काम करणे महत्त्वाचे आहे. मुंबईने आतापर्यंत अर्जुन तेंडुलकर, रायली मेरेडिथ, अर्शद खान, आकाश मढवाल व कॅमेरून ग्रीन यांचे पर्याय वेगवान गोलंदाजीसाठी वापरले आहेत. यामधील कोणीही अपेक्षाकृत कामगिरी केली नाही. ग्रीन वगळता सर्व गोलंदाजांना फार सामनेही खेळण्यास मिळाले नाहीत. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे पर्याय मुंबईचा संघ वापरताना दिसत आहे. ज्याचा फटका संघाला बसला आहे. चांगल्या फिरकीपटूची कमतरता असल्याने चावलाला दुसऱ्या बाजूने म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. त्यासाठी मुंबईच्या संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल. कर्णधार रोहित शर्माची लय ही संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांत केवळ १८४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले. मध्यक्रम चांगली कामगिरी करत असल्याने मुंबईचे आव्हान शाबूत आहे. मात्र, आगेकूच करायची झाल्यास रोहितची फलंदाजी संघासाठी निर्णायक ठरू शकते.