scorecardresearch

Premium

बिहारमधील १७०० कोटींचा पूल पडला की पाडला? एका वर्षात दोनदा पूल कोसळण्याचे कारण काय?

बिहारमधील अगुवानी-सुलतानगंज दरम्यान असलेला गंगा नदीवरील पूल रविवारी पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला. हा पूल पडण्याची वर्षभरातील दुसरी घटना आहे. भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, हा पूल जाणूनबुजून पाडण्यात आला.

bihar bridge collapse
बिहारमध्ये गंगा नदीवर असलेला १७०० कोटींचा निर्माणाधीन पूल कोसळला. (Photo – ANI)

ओदिशामध्ये दि. २ जून रोजी झालेल्या भयावह रेल्वे अपघातातून देश सावरला नाही तोच रविवारी बिहारमधून एक अजस्र पूल कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ओदिशामधील रेल्वे अपघातात जवळपास २७० हून अधिक प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत. तर हजारो लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच रविवारी बिहारमधील खगरियाच्या गंगा नदीवर असलेला मोठा पूल कोसळल्याचे समोर आले. अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधलेल्या या पुलाचा काही भाग मागच्या वर्षी एप्रिल महिन्यातही कोसळला होता. त्या वेळी नितीन गडकरी यांनीदेखील पूल कोसळल्याची दखल घेतली. त्या वेळी त्यांच्या सेक्रेटरीने हवेमुळे सदर पूल कोसळल्याचे सांगितल्यावर गडकरी यांनी डोक्यावर हात मारला होता. फक्त हवेमुळे पूल कसा काय कोसळू शकतो? तिथे नक्कीच भ्रष्टाचार झाला असणार, असा अंदाज त्यांनी २०१९ सालीच व्यक्त केला होता.

रविवारी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी जनता दल युनायटेड व राष्ट्रीय जनता दल आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्या वाकयुद्ध सुरू झाले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पण हा पूल कसा काय कोसळला? १७०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आल्यानंतरही पूल कोसळण्याचे कारण काय? यासंबंधी घेतलेला हा आढावा.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

हे वाचा >> बिहार पूल वाऱ्यामुळे कोसळल्याच कारण ऐकून गडकरी अवाक; म्हणाले “मला एक कळत नाही…”

वारा सुटल्यामुळे पूल कसा काय कोसळू शकतो?

भागलपूर आणि खगारिया जिल्ह्यांना जोडणारा अगुवानी-सुलतानगंज यांच्यादरम्यान गंगा नदीवर असणारा २०० मीटर लांबीचा पूल पत्त्याच्या घराप्रमाणे क्षणाधार्थ गंगेत विसर्जित झाला. सायंकाळी ६ वाजता काही स्थानिकांनी हा पूल कोसळत असल्याचे चित्रण आपल्या मोबाइलमध्ये केले आणि त्यानंतर काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. सुदैवाने, पूल कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झालेली नाही.

पूल पडल्यामुळे मागच्या वर्षी २९ एप्रिलचाही प्रसंग या वेळी लोकांना आठवला. त्या वेळी पाऊस आणि वाऱ्यामुळे सदर पूल कोसळला असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्या वेळी पूल कोसळण्याच्या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले होते. आयएएस दर्जाचे अधिकारी जेव्हा वाऱ्यामुळे पूल कोसळला असे सांगतात, तेव्हा धक्काच बसतो, असेही गडकरी त्या वेळी म्हणाले होते. “मला हे समजत नाही, जोरात वारा सुटल्यामुळे पूल कसा काय कोसळू शकतो. पुलाच्या कामात नक्कीच काहीतरी चूक झालेली असणार!”, अशी संतप्त प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली होती.

अगुवानी-सुलतानगंज पुलाचे बांधकाम २०१४ साली हाती घेण्यात आले होते. २०१९ साली हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही याचे काम सुरूच आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जात होते. ३,१६० मीटर लांबीचा हा पूल खगरिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडण्याचे काम करत होता. याचा बांधकाम खर्च १७०० कोटी इतका होता. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलामुळे खगरिया आणि भागलपूरमधील प्रवासाचे अंतर अनेक तासांनी कमी होणार होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले होते की, या पुलाचे अनन्यसाधारण महत्त्व असून यामुळे भागलपूरमधील विक्रमशीला पुलावरील वाहतूक भार काही अंशी कमी होणार आहे.

पूल पडल्यामुळे भ्रष्टाचाराला जलसमाधी मिळाली

रविवारी पत्त्याच्या घराप्रमाणे पूल कोसळल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच प्रशासनावरही जोरदार टीका करण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी हा पूल भ्रष्टाचाराचे ढळढळीत उदाहरण असल्याचे सांगत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. “अगुवानी-सुलतानगंज दरम्यानचा पूल हा नितीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पूल कोसळला. पूल कोसळण्याची बारा महिन्यातील दुसरी घटना आहे. विचार करा, या कामात किती भ्रष्टाचार झाला असेल? जनतेच्या कर रूपातील १,७५० कोटी रुपयांना रविवारी जलसमाधी मिळाली. नितीश कुमार देशभर फिरून विरोधकांच्या एकीचा पूल बांधत असताना बिहारमध्ये भ्रष्टाचाराचा पूल मात्र कोसळला. आता पप्पू मीडिया या घटनेकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान मोदींवर कसे दोषारोप लावतायत, हे आपण पाहू”, असे ट्वीट पूनावाला यांनी केले आहे.

हे वाचा >> बिहारमध्ये १७०० कोटी रुपयांचा निर्माणधीन पूल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला, VIDEO आला समोर

भाजपाचे नेते आणि भागलपूरचे माजी खासदार सय्यद शाहनवाज हुसैन यांनीदेखील या घटनेवर टीका केली असून पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत पूल पडल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी राज्यभरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाच कंत्राटदाराला अनेक कामांच्या निविदा कशा काय मिळू शकतात? याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पूल जाणूनबुजून पाडला

विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना सरकारने मात्र पूल कोसळण्याची घटना ही नियोजित असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, २०२२ साली आलेल्या वादळानंतर हा पूल पाडण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेण्यात आला होता. भविष्यकाळातील दुर्घटना टाळण्यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पत्रकार परिषदेला तेजस्वी यादव यांच्यासह रस्ते बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अम्रित उपस्थित होते.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा पूल पाडण्यात आला आहे. आम्ही आयआयटी रुरकीकडे याबाबत मदत मागितली होती. रुरकी संस्थेच्या तज्ज्ञांची पुलाच्या कामाचा अभ्यास केला. सध्या तरी तज्ज्ञांचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. पण त्यांच्या प्राथमिक तपासात या पुलामध्ये गंभीर दोष असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अम्रित म्हणाले की, अंतिम अहवाल येण्याच्या आधीच राज्याने या पुलाचे बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. अंतिम अहवाल येईपर्यंत आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे सरकारने पुलाचा काही भाग पाडण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. “रविवारी पुलाचा काही भाग पाडण्यात आला. मागच्या वर्षीही पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर मी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळेच तो वारंवार कोसळत आहे. संबंधित विभाग यात लक्ष घालून पुढील कार्यवाही करेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या अनेक घटना

अगुवानी-सुलतानगंज येथील पूल कोसळल्याची घटना ही एकमात्र घटना नाही. याआधीही डिसेंबर महिन्यात बेगुसराय जिल्ह्यातील बुढी गंडक नदीवरील पुलाचे दोन भाग होऊन तो कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारण या पुलाचे उदघाटन बाकी होते, त्यामुळे तो वापरात नव्हता. त्याआधी नितीश कुमार यांच्या नालंदा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला होता.

बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आल्या आहेत. मागच्या वर्षी जुलै महिन्यात कटिहार जिल्ह्यात एका निर्माणाधीन पुलाचा आरसीसी भाग कोसळल्यामुळे दहा कामगार जखमी झाले होते. त्याच महिन्यात गोपालगंज आणि सरन यांना जोडणारा पूल पाण्यात वाहून गेला होता. जून महिन्यात भागलपूर जिल्ह्यात कोसी नदीवर बांधण्यात येत असलेला पूल पाण्याच्या वेगामुळे वाहून गेला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×