Rise of sleep divorce निरोगी आरोग्यासाठी झोप सर्वांत महत्त्वाची आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सात ते आठ तासांची झोप महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीच्या झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहींना घोरण्याची सवय असते, तर काहींना शांततेतच झोप येते. अनेकांना आवाजामुळे झोप येत नसल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. जोडीदारांमध्येही झोपण्याच्या सवयी एकमेकांच्या विरोधात असू शकतात. त्यामुळे सध्या जोडप्यांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच झोपेच्या घटस्फोटाचा ट्रेंड वाढत आहे. परंतु, ही स्थिती पती-पत्नी यांना वेगळे करत नसून, त्यांच्यात आणखी जवळीक निर्माण करते. काय आहे स्लीप डिव्होर्स? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वाढण्याचे कारण काय? याचा नात्यांवर काय परिणाम होतो? त्याविषयी जाणून घेऊ.
नवीन अभ्यास काय सांगतो?
आता झोपेचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे. अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याबद्दल लोकांमधील जागरूकता वाढताना दिसत आहे. नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, ७० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय जोडपी झोपेचा घटस्फोट घेत आहेत. झोप पूर्ण होण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लोक हा पर्याय निवडताना दिसत आहेत. ‘ResMed’च्या २०२५ च्या ग्लोबल स्लीप सर्वेक्षणानुसार, स्लीप डिव्होर्स घेणाऱ्यांमध्ये भारत आघाडीवर आहे.

आतापर्यंत भारतात ७८ टक्के जोडप्यांनी स्लीप डिव्होर्स घेतला आहे. भारतानंतर चीन (६७ टक्के) व दक्षिण कोरिया (६५ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या अभ्यासात १३ देशांतील ३०,००० हून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासातून अशी बाब समोर आली की, जागतिक झोपेचे संकट वाढत चालले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील ५० टक्के जोडपीही या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.
स्लीप डिव्होर्सचा अर्थ काय?
स्लीप डिव्होर्स म्हणजे आपल्या जोडीदारापासून वेगळे झोपणे. या ट्रेंडमध्ये लोक एकाच घरात राहतात; परंतु वेगवेगळ्या पलंगावर किंवा वेगवेगळ्या खोलीत झोपतात. लग्न झालेली जोडपी एकत्र झोपल्याने संबंध अधिक मजबूत होतात, असा लोकांचा विश्वास आहे. मात्र, स्लीप डिव्होर्स याच्या अगदी विरुद्ध आहे. स्लीप डिव्होर्समुळे नात्यात अंतर येत नाही; तर त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारते आणि परिणामी त्यांचे संबंधही अधिक मजबूत होत जातात.
जोडप्याने वेगवेगळे झोपणे कदाचित अनेकांना विचित्र किंवा चुकीचे वाटू शकते. परंतु, अनेक जण झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी याचा अवलंब करीत आहेत. झोपेत व्यत्यय येण्याची प्रमुख कारणे म्हणजे जोडीदाराचे घोरणे, जोरात श्वास घेणे, अस्वस्थता, दोघांच्याही झोपेचे वेळापत्रक न जुळणे किंवा अंथरुणावर असताना मोबाईलचा वापर करणे.
ज्या जोडप्यांनी वेगळ्या झोपण्याच्या व्यवस्थेचा पर्याय निवडला आहे, त्यांनी आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारली असल्याचे मत नोंदवले आहे. तज्ज्ञ असा सल्ला देतात की, एकमेकांबरोबर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जोडीदाराबरोबर झोपल्याने शरीरातऑक्सिटोसिन म्हणजेच ‘प्रेम संप्रेरके’ तयार होतात आणि त्यामुळे नैराश्य, चिंता व तणाव कमी होऊ शकतो. ‘स्लीप’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, एकत्र झोपल्याने अनेक भावनिक फायदे होतात.
भारतीयांमध्ये स्लीप डिव्होर्सचे वाढते प्रमाण
आजच्या धकाधकीच्या जीवनात काम, कुटुंब व सामाजिक अपेक्षांमध्ये संतुलन राखत असताना लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या झोपेवरदेखील होतो. ताणतणाव, चिंता, आर्थिक ताण, मानसिक आरोग्याच्या समस्या व नातेसंबंधातील समस्या ही झोपेच्या कमतरतेची प्रमुख कारणे असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. मुख्य म्हणजे ६९ टक्के भारतीयांमध्ये तणाव हा एक महत्त्वाचा घटक असल्याची नोंद त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर यात दक्षिण कोरिया (६७ टक्के), थायलंड (६५ टक्के), सिंगापूर (६५ टक्के) व जर्मनी (६१ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
कमी झोप होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, याचा एकूणच परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो आणि कामाच्या ठिकाणी उत्पादकता कमी होते. ‘यूएस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन कमिटी ऑन स्लीप मेडिसिन अँड रिसर्च’ने म्हटले आहे की, रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने उत्पादकतेत लक्षणीय घट होते. आपल्या संज्ञांनात्मक विकासासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते.
भारतात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये झोपेचे प्रमाण कमी
भारतातील महिलांमध्ये पुरुषांपेक्षा झोपेची गुणवत्ता कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. हार्मोनल बदल हा घटक यात महत्त्वाची भूमिका बाजवतो. कामाच्या ठिकाणी झोपेच्या कमतरतेचा परिणाम महिलांमध्येही अधिक दिसून येतो. झोपेअभावी १२% पुरुषांनी, तर १७ टक्के भारतीय महिलांनी आजारी पडल्यास रजा घेतल्याचे समोर आले आहे. स्लीप डिव्होर्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे झोपेच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक जोडप्यांसाठी वेगळे झोपणे हा एक उपाय असू शकतो. परंतु झोपेमध्ये अडथळा येण्याची कारणे, जसे की ताण, जीवनशैली व वैद्यकीय परिस्थिती यांवर लक्ष देणेदेखील महत्वाचे आहे. त्याबरोबरच झोपेच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणेही महत्त्वाचे आहे.
कमी झोपेचा आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी होणारा परिणाम
झोपेचा अभाव गंभीर आरोग्य धोक्यांशी जोडलेला आहे, ज्यामध्ये मानसिक त्रास, धोकादायक ड्रायव्हिंग व दीर्घकालीन आजार यांचा समावेश आहे. ‘रेसमेड’चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कार्लोस नुनेज इशारा देतात की, दीर्घकाळ झोपेचा अभाव संज्ञानात्मक घट, मूड विकार, चिंता व नैराश्याचा धोका वाढवतो. स्लीप अॅप्नियावर उपचार न घेतलेल्या व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह व स्ट्रोक होण्याचा आणखी जास्त प्रमाणात धोका असतो.