गँगस्टर असलेल्या आणि राजकारणात प्रवेश केलेल्या मुख्तार अन्सारी त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र उत्तर प्रदेश आहे. मात्र सध्या त्यांची पंजाबमध्ये चर्चा आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अन्सारी यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाला त्याची ५५ लाख रुपये फी देण्यास थेट नकार दिला आहे. पंजाबमधील करदात्यांच्या पैशांतून आम्ही ही फी देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याच कारणामुळे उत्तर प्रदेशमधील मुख्तार अन्सारी यांची पंजाबमध्ये का चर्चा होत आहे? पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अन्सारी यांच्याबाबत अशी भूमिका का घेतली? मुख्तार अन्सारी कोण आहेत? हे जाणून घेऊ या.

मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार

मुख्तार अन्सारी सध्या उत्तर प्रदेशमधील रोपर येथील तुरुंगात आहेत. या तुरुंगात अन्सारी यांना महत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जात आहे. अन्सारी यांच्यासाठी तुरुंगात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोय करण्यात आली आहे, असा आरोप पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारने केला आहे. तसेच अन्सारी यांना उत्तर प्रदेशमधून पंजाबमध्ये हलवण्यात आल्यामुळे भगवंत मान सरकारकडून मागील सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी असून ते माऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत.

हेही वाचा >>> युरोपमध्ये उष्माघातामुळे २०२२ मध्ये तब्बल १५ हजार नागरिकांचा मृत्यू; जागतिक हवामान संस्थेने दिला इशारा

मुख्तार अन्सारी यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक

मुख्तार अन्सारी यांच्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी हेदेखील यापैकीच ए आहेत. त्यांचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी हे स्वातंत्र्यसैनिक असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. मुख्तार अहमद अन्सारी हे जामिया मिलिया विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक होते. विशेष म्हणजे ते या विद्यापीठाचे १९२८ ते १९३६ या कालावधीत कुलपती होते. मुख्तार अन्सारी यांच्या आईकडील आजोबा मोहम्मद उस्मान हे ब्रिगेडियर होते. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना वीरमरण आले होते. पुढे भारत सरकारने मोहम्मद उस्मान यांच्या त्यागाचा मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मान केला होता. तर दुसरीकडे मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी विश्वातील मोठे नाव आहे. त्यांच्याविरोधात जमीन बळकावणे, खून, खंडणी यांसारखे ६० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मागील १५ वर्षांपासून मुख्तार अन्सारी हे तुरुंगात आहेत.

मुख्तार अन्सारी यांचा पंजाबशी संबंध काय?

जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२१ या काळात साधारण दोन वर्षे ते रोपर येथील तुरुंगात होते. मोहाली येथील एका बिल्डरला खंडणीचा फोन आल्याप्रकरणी २२ जानेवारी २०१९ रोजी त्यांना पंजाबमधील तुरुंगात हलवण्यात आले. या खंडणीप्रकरणी मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३८६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा कुलदीपसिंह चहल मोहालीचे एसएसपी होते. १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा अन्सारी यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्तार अन्सारी यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पुढे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना रोपर तुरुंगात हलवण्यात आले होते. त्यानंतर साधारण दोन वर्षे अन्सारी याच तुरुंगात होते. अन्सारी यांना उत्तर प्रदेशमधून पंजाबमध्ये हलवण्यात आले, तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. तर मुख्यमंत्रीपदी कॅप्टन अमरिंदरसिंग होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : चीनची लोकसंख्यावाढ मंदावली… पण जगाला याची चिंता का वाटते?

पंजाब सरकारवर नेमका आरोप काय?

मुख्तार अन्सारी रोपर तुरुंगात असताना त्यांच्याविरोधात एकूण ४८ वेळा वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र तरीदेखील पंजाब पोलिसांनी अन्सारी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवले नाही. परिणामी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. पंजाब सरकार मुख्तार अन्सारी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवत नाहीये, असा आरोप त्या वेळी उत्तर प्रदेश सरकारने केला होता. त्यानंतर पंजाब सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार अन्सारी यांना एप्रिल २०२१ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवले होते.

अन्सारी यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट? चौकशीत काय समोर आले?

पंजाबमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भगवंत मान सरकारने मुख्तार अन्सारी यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात चौकशी करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर एन ढोके यांच्यावर सोपविण्यात आली होती. चौकशीनंतर ढोके यांनी धक्कादायक खुलासे केले होते. अन्सारी यांना तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारखी वागणूक देण्यात आली. त्यासाठी तुरुंग प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी लाच घेतली. अन्सारी यांच्या नातेवाईकांना सहजपणे तुरुंगात प्रवेश मिळायचा. अन्सारी यांच्यासोबत कारागृहात दोन मदतीनसही राहायचे. रोपर तुरुंगात अन्सारी साधारण दोन वर्षांसाठी होते. मात्र तरीदेखील त्यांनी जामिनासाठी एकही अर्ज केला नाही, असे ढोके यांनी तपासानंतर सांगितले. अन्सारी यांच्यावर खंडणीचे जे आरोप होते, त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले नाही. अन्सारी यांच्यावर काही राजकारण्यांचा वरदहस्त होता, असेही ढोके यांच्या तपासात स्पष्ट झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> विश्लेषण : आतिक अहमद हत्या प्रकरण : एखाद्या गुन्ह्याचा देखावा पोलीस का निर्माण करतात?

अन्सारी यांचा मुद्दा आत्ताच का चर्चेत आला?

मुख्तार अन्सारी यांचा मुद्दा सध्या पंजाबमध्ये चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तत्कालीन कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सरकराने मुख्तार अन्सारी यांचा खटला लढण्यासाठी दुष्यंत दवे यांची वकील म्हणून नेमणूक केली होती. दुष्यंत दवे यांची आतापर्यंतची एकूण फी ५५ लाख रुपये झाली आहे. मात्र विद्यमान भगवंत मान सरकारने ही फी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. आम्ही जनतेच्या पैशातून मुख्तार अन्सारी यांची वकिली करणाऱ्या वकिलाची फी देणार नाही. याउलट मागील सरकारमधील ज्या मंत्र्यांनी मुख्तार अन्सारी यांना पंजाबमधील तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्या मंत्र्यांकडून ही फी वसूल करण्याचा आमचा विचार आहे, असे भगवंत मान म्हणाले आहेत. याच कारणामुळे मुख्तार अन्सारी हे मूळचे उत्तर प्रदेशमधील असून त्यांची पंजाबमध्ये चर्चा होत आहे.