गोव्यातील पर्यटन बहुआयामी आहे. गोव्यात समुद्र, नद्या, धबधबे, हिरवीगार जंगले, पर्वत आहेत, एकूणच काय तर संपूर्ण गोवा निसर्गाने वेढलेलं आहे, त्यामुळेच मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सुंदर समुद्रकिनारे निसर्गप्रेमींना साद घालतात. निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी लोक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात, परंतु अनेक महिला प्रवाशांना अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या पुरुषांकडून छळ सहन करावा लागतो. अशा अनेक घटना सातत्याने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घडतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी गोवा प्रशासनाने महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता यावा म्हणून महिलांसाठी समुद्रकिनाऱ्यांवर एक क्षेत्र सुरू केले आहे, त्याचा नेमका अर्थ काय? प्रशासनाचे नवीन नियम काय आहेत? हा निर्णय घेण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
नवीन नियम काय आहेत?
गोव्यातील अधिकाऱ्यांनी आरामबोल, मोरजिम, बागा, कलंगुट, मिरामार, बैना, बोगमलो, कोल्वा, बागा-२ आणि अश्वेम या समुद्रकिनाऱ्यांवर ४० सीमांकित जलतरण क्षेत्र तयार केले आहेत. पर्यटन हंगामात या जलतरण क्षेत्रांची संख्या वाढवून १०० करण्यात येणार असल्याची गोवा प्रशासनाची योजना आहे. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर आता तीन नियुक्त क्षेत्रे आहेत, त्यात एक क्षेत्र कुटुंबांसाठी, एक पुरुषांसाठी आणि एक केवळ महिलांसाठी आहे. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, तयार करण्यात आलेल्या या सीमांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी या विभागांवर मूरिंग पार्टीशन आणि चिन्हे आहेत. तसेच सुरक्षितता वाढविण्यासाठी या झोनमध्ये पाण्यातील सर्व खेळ बंद करण्यात आले आहेत.

सरकारने नियुक्त केलेल्या लाइफगार्ड एजन्सी ‘दृष्टी मरीन’ अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. या एजन्सीने गोव्यातील सर्वात व्यस्त समुद्रकिनाऱ्यांवर जलतरण क्षेत्र तयार करण्यास सुरुवात केली आहे. महिलांसाठी असलेल्या झोनला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असे ‘दृष्टी मरीन’चे ऑपरेशन्स मॅनेजर शशिकांत जाधव म्हणाले. ते म्हणाले, “जेव्हा महिला त्यांच्या कुटुंबासह येतात तेव्हा त्या एकत्र असतात. परंतु, जेव्हा त्या एकट्या येतात किंवा महिलांचा एखादा गट येतो, तेव्हा त्या फक्त महिलांसाठी असलेल्या क्षेत्राला प्राधान्य देतात; कारण या क्षेत्रात त्यांना निश्चिंत आणि सुरक्षित वाटते,” असे जाधव यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तात सांगितले आहे.
हा निर्णय घेण्यामागील कारण काय?
महिलांनी अनेकदा समुद्रकिनाऱ्यांवर त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली आहे. अशा तक्रारी पोलिसांकडे किंवा सोशल मीडियावर करण्यात आल्या आहेत. एका महिलेने सांगितले की, अरंबोल समुद्रकिनाऱ्याला भेट दिली असताना काही पुरुषांकडून तिला चुकीचा स्पर्श करण्यात आला, तिला बोलावण्यात आले आणि तिच्याकडे टक लावून पाहिले गेले. इतर काही महिलांनी अशाच परिस्थितींचे वर्णन केले. अनेक महिलांनी सांगितले, काही पुरुषांच्या गटांनी सेल्फी काढण्याच्या नावाखाली त्यांचे व्हिडीओ किंवा फोटो काढले. तसेच स्विमसूटमध्ये असणाऱ्या महिलांजवळ फिरताना त्यांच्यावर टिप्पणी केली. महिलांचा सुरक्षेच्या दृष्टीने आणि ही वाढती प्रकरणे थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
हा वादाचा मुद्दा का ठरत आहे?
टीकाकारांचे असे म्हणणे आहे की, क्षेत्रांचे विभाजन करण्यापेक्षा सुरक्षा वाढवणे महत्त्वाचे आहे. अनेक टीकाकारांनी आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे की, महिलांची सुरक्षा शारीरिक विलगीकरणापेक्षा पोलिसिंग किंवा विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीने याहूनही अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित केली जाऊ शकते. मानवाधिकार कार्यकर्त्या अल्बर्टिना अल्मेडा यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले, “आज तुम्ही महिलांसाठी वेगळे झोन तयार करत आहात, नंतर तुम्ही स्थानिक आणि पर्यटकांसाठी वेगळे झोन तयार कराल. परिणामी, यात मच्छीमार लोक त्यांचे क्षेत्र गमावतील.” त्या पुढे म्हणाल्या की, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस कॉन्स्टेबल किंवा विशेष सुरक्षा कर्मचारी असणे हाच यावर प्रभावी उपाय आहे.
गोवा पर्यटनाचे भविष्य
इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांभोवती अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे चित्र आहे. स्विमसूट घातलेल्या महिलांचे व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन अपलोड केल्या गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मुख्य म्हणजे, गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांबरोबरदेखील छेडछाड किंवा छळ झाल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये गोव्यात देशातील ८६,२८,१६२ आणि विदेशातील ४.५२ लाख पर्यटक आले. याचाच अर्थ असा की, २०२४ मध्ये एकूण १.४ कोटी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.
२०२३ मध्ये गोव्यात ८१,७५,४६० देशातील आणि ४,५२,७०२ विदेशातील पर्यटक आले, म्हणजेच एकूण ८६,२८,१६२ पर्यटक गोव्यात आले. दाबोलीम विमानतळावर प्रवाशांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. बागा आणि कलंगुटसारख्या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होत असल्याने, याची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली होती. राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी पूर्वी सांगितले होते की, सरकार गर्दी, कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक व पर्यटकांमध्ये कधीकधी निर्माण होणारा तणाव यांसारख्या समस्यांवर काम करत आहे. बजेट पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या दबावांना तोंड देताना गोव्याच्या पायाभूत सुविधा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सक्रिय दृष्टिकोनाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती.