सध्या ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या एका ड्रग्जची चर्चा होत आहे. या ड्रग्जमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून एकाने तर त्वचेला छित्र पडल्याचे सांगितले आहे. या ड्रग्जच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तेथील प्रशासनाकडून या ड्रग्जचा अवैध व्यापार, वापर थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण ब्रिटनची चिंता वाढणाऱ्या या ड्रग्जचे नाव काय आहे? त्याच्या अतिसेवनाने शरीरावर काय परिणाम पडतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

तब्बल १ लाख ५० हजार गोळ्या जप्त

सध्या ब्रिटनमध्ये सेवन वाढलेल्या ड्रग्जचे नाव निटाझीन असे आहे. हा कमी ज्ञात असलेला कृत्रिम स्वरुपाचा (सिंथेटिक ओपीऑइड) ड्रग्ज आहे. या ड्रग्जच्या अतिसेवनाची अनेक प्रकरणं ब्रिटनमध्ये समोर आली आहेत. ज्यामुळे ब्रिटन प्रशासनाची चिंता वाढली आहे. ब्रिटनचे पोलीस आणि सीमेवरील सुरक्षा दलाने या ड्रग्जची मोठी तस्करी रोखली आहे. पोलिसांनी निटाझीन या ड्रग्जच्या तब्बल १ लाख ५० हजार गोळ्या जप्त केल्या आहेत. आपल्या कारवाईत पोलिसांनी निटाझीनसह अन्य प्रकारचे अमली पदार्थही पोलिसांनी जप्त आहेत.

निटाझीन म्हणजे नेमकं काय?

सर्वांत आधी १९५० साली स्वित्झर्लंडच्या सीबा फार्मासुटीकल्स नावाच्या औषधनिर्माण कंपनीने निटाझीन नावाचे औषध तयार केले होते. मात्र हे औषध प्रत्यक्ष बाजारात कधी आलेच नाहीच. हे औषध अतिशय शक्तिशाली होते. तसेच त्याची सवय लगण्याचीही शक्यता होती. हे एका प्रकारचे ओपिऑइड औषध होते. त्यामुळे ते प्रत्यक्ष विक्रीला बाजारात कधी आलेच नाही.

मेंदूतील म्यू-ओपिऑइड रिसेप्टर्सना चालना मिळते

ओपिऑइड हे औषध मेंदूतील म्यू-ओपिऑइड रिसेप्टर्स या भागावर प्रभाव टाकतात. मेंदूतील हे रिसेप्टर्स एकदा सक्रिय झाल्यानंतर शरीरात होणारा त्रास, वेदना नाहीशा होता. ओपिऑइड औषधांचे अधिक सेवन केल्यास आनंदी वाटते. तसेच ओपिऑइड्सचे सेवन केल्यास तंद्री येते. हेरॉईन, मॉर्फीन, फेंटॅनील यासारख्या ड्रग्जमुळे मेंदूतील म्यू-ओपिऑइड रिसेप्टर्सना चालना मिळते. निटाझीन हा ड्रग्ज फेंटॅनील प्रमाणेच काम करतो. हा ड्रग्ज हेरॉईनपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि म्हणूनच त्याला ड्रग्जच्या अ श्रेणीत टाकलेले आहे.

निटाझीनसह इतर ओपिऑइड्स किती घातक आहेत?

शक्तिशाली ओपिऑइड्सच्या सेवानामुळे अमेरिकेत गेल्या काही वर्षांत अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. टेनेसीच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांत निटाझीनच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारपट वाढली आहे. सध्या निटाझीन या ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढले आहे. या निटाझीनचा वापर कोकेन, बेंझोडायझेपाइन तसेच सिंथेटिक कॅनाबिनॉइड्स यासारख्या बेकायदेशीर ड्रग्जमध्ये भेसळ म्हणून वापरला जात आहे. ही बाब २०१९ साली समोर आली. हा ड्रग्ज इतर ड्रग्जसोबत मिसळल्यामुळे ओव्हरडोस तसेच मृत्यूची शक्यता वाढते.

श्वास घेण्यास त्रास होतो, मळमळ होते

बीबीसीच्या म्हणण्यानुसार निटाझीनचे सेवन केल्यानंतर डोळ्यांची बुबळं छोटी होतात. श्वास घेण्यास त्रास होतो, मळमळ होते, उलट्या होतात. शरीर थंड पडते. रक्तदाब कमी होतो, चेतना कमी होते. या ड्रग्जचे अतिसेवन केल्यास श्वास घेण्यासही अडचण येऊ शकते. ज्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो.

निटाझीन ड्रग्जचा ब्रिटनवर काय परिणाम पडतोय?

सध्या ब्रिटनमध्येही नशेसाठी निटाझीन या ड्रग्जचा वापर केला जात आहे. हा ड्रग्ज ब्रिटनमध्ये एप्रिल २०२१ मध्ये सर्वप्रथम आढळला होता. तेव्हापासून हा ड्रग्ज हेरॉईन, कॅनाबीस, कोकेन, वेप अशा ड्रग्जमध्ये आढळत आहे. ऑक्टोबर महिन्यात याच ड्रग्जच्या तस्करी संदर्भात ब्रिटनच्या पोलिसांनी सर्वांत मोठी कारवाई केली होती. या कारवाईत निटाझीन या ओपऑइडचा सर्वांत मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईचा तपास करणारे डिटेक्टीव्ह सुपरिटेंडंट हेलन रेन्स यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “लंडन तसेच संपूर्ण ब्रिटनमध्ये हेरॉईनच्या बॅचेसमध्ये निटाझीन हे सिंथेटिक ओपिऑइड आढळत आहे. नेटाझीनमुळे ड्रग्ज सेवन करणाऱ्याच्या शरीरावर गंभीर परिणाम पडू शकतात. या ड्रग्जचे अतिसेवन केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो,” असे हेलेन रान्स म्हणाले.

“माझ्या पायात छिद्र झाले”

याच नेटाझीन ड्रग्जबाबत लंडन शहरातील व्हाईटचॅपल परिसरातील एका २३ वर्षीय मुलीने प्रतिक्रिया दिली. या ड्रग्जचे सेवन केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझ्यात वेगळी लक्षणं दिसत आहेत. माझ्या पायात छिद्र झाले आहे. त्या भागातील त्वचा गायब झाली आहे. तेथे फक्त एक छिद्र आहे. मला खूप वेदना होत आहेत, असे या तरुणीने सांगितले. अन्य ड्रग्जमध्ये नेटाझीन या ड्रग्जचा भेसळ म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळेच कदाचित या तरुणीला तशी लक्षणं दिसली असावीत, असे ड्रग्जचे सेवन कमी करण्यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेने सांगितले.

सिंथेटिक ओपिऑइडच्या सेवनाचे प्रमाण वाढले

तालिबानने अफगाणिस्तानमधील हेरॉईनच्या उत्पादनावर कारवाई केली आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधून ब्रिटनमध्ये तस्करी केल्या जाणाऱ्या ड्रग्जचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे नेटाझीन यासारख्या सिंथेटिक ओपिऑइडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे, असे ब्रिटिश पोलिसांचे मत आहे. याच नेटाझीनबद्दल नॅशनल प्रोग्रॅम ऑन सबस्टन्स अ‍ॅब्यूज डेथ्सचे संचालक डॉ. कॅरोलीन कोपलँड यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं लोक हेरॉईन समजून नेटाझीन या ओपीऑइडचे सेवन करत आहेत. सध्या हेरॉइन ड्रग्जमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. नेटाझीन हा ड्रग्ज खूप शक्तिशाली आहे. या ड्रग्जचे किती सेवन करावे, याची लोकांना कल्पना नाही. लोक याआधी जे प्रमाण सुरक्षित आहे असे समजायचे, तेच प्रमाण आता भेसळीमुळे धोकादायक ठरत आहे,” असे कोपलँड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरकारने लवकरात लवकर योग्य ती काळजी घ्यायला हवी”

सोशल जस्टीस चॅरिटी क्रॅनस्टॉनच्या संचालिका मेग जोन्स यांनीदेखील नेटाझीन या ड्रग्जवर भाष्य केले आहे. “नेटाझीन हा ड्रग्ज आज ब्रिटनमध्ये लोकांच्या खिशात सहज आढळून येत आहे. ही फार चिंतेची बाब आहे. सध्या वेगवेगळ्या ड्रग्जमध्ये सिंथेटिक ओपिऑइड्सचे प्रमाण वाढत आहे. याबाबत सरकारने लवकरात लवकर योग्य ती काळजी घ्यायला हवी. हे एक आरोग्यसंकट आहे. सध्या आपण झोपेत आहोत. या आरोग्यसंकटाला तोंड देण्यास ब्रिटन पूर्णपणे तयार नाही,” असे मेग जोन्स म्हणाल्या.