किशोर कोकणे गेल्या काही वर्षांत कसारा, टिटवाळा, आसनगाव, शहाड, आंबिवली भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. या तुलनेत येथील वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही. मुंबईत प्रवास करण्यासाठी येथील नागरिकांना उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यादेखील या मार्गिकेवरून वाहतूक करतात. प्रवाशांची वाढती लोकसंख्या पाहता कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु भूसंपादनातील अडथळे, विरोध यामुळे अनेक अडचणी आहेत. या मार्गिकेची निर्माण कामे सुरू असली तरी मार्गिका पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रवाशांचा भार का वाढत आहे? ठाणे जिल्ह्यातील कसारा, आसनगाव हा भाग ग्रामीण क्षेत्रात मोडतो. ठाणे आणि मुंबई भागात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांनी येथे गृहखरेदी केली. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने तेथे मोठ्या चाळी उभ्या राहिल्या आहेत. स्वस्त घरे उपलब्ध होत असल्याने मागील काही वर्षांत या भागात प्रवाशांचा भार वाढला आहे. त्या तुलनेत प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. हेही वाचा. भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या… मार्गिका का आवश्यक? कल्याणपुढे आसनगाव, कसारा भागात प्रवास करण्यासाठी अप आणि डाऊन अशा दोनच मार्गिका उपलब्ध आहेत. या मार्गावरून उपनगरीय, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या फेऱ्या होतात. कल्याण ते कसारा या मार्गिकेवर एकूण ११ स्थानके आहेत. मार्गिकेवर एखादा तांत्रिक बिघाड झाला किंवा रेल्वेगाडीचे इंजिन बंद पडल्यास संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प होते. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो. लांब पल्ल्याच्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक उशिराने होत असते. कसारा येथून सीएसएमटी प्रवासासाठी केवळ १८ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे मुंबईत कामानिमित्ताने जाणारे बहुतांश नोकरदार लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करतात. नाशिकहून रस्तेमार्गे मुंबईत येणारा प्रवासी मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी कसारा येथून उपनगरीय रेल्वेगाडीने प्रवास करतो. त्यामुळे त्याचा भार देखील उपनगरीय मार्गिकेवर असतो. गर्दीमुळे रेल्वेगाडीतून पडून अनेकांचे अपघाती बळी गेले आहेत. हेही वाचा. गज, गरुड, अश्व… नव्या संसद भवनाच्या सहा प्रवेशद्वारांचा अर्थ काय? प्रकल्पाची सद्यःस्थिती.. कल्याण-कसारा तिसरी मार्गिका ६७.३५ किलोमीटर लांब असून त्यासाठी ७९२.८२ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. मार्गिकेसाठी ४९.२३ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यापैकी ३५.९६ हेक्टर म्हणजेच ७३ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. तर १३.२७ टक्के हेक्टर जमीनीचे अधिकग्रहण शिल्लक आहे. प्रकल्पात २०५ लहान आकाराचे पुल बांधण्यात येणार असून २३ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. नऊ मोठ्या पुलांपैकी पाच पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. हेही वाचा. कॅनडाच्या पंतप्रधानांना खलिस्तान समर्थक भूमिका घ्यायला लावणारा जगमित सिंग कोण आहे? प्रकल्प लांबणीवर? या प्रकल्पाला सुमारे १२ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. पंरतु तांत्रिक कारणांमुळे २०१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतर भूसंपादन करताना अनेक अडचणींचा सामना मध्य रेल्वे प्रशासनास करावा लागला. अद्यापही २७ टक्के भूसंपादन झालेले नाही. २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रकल्प नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होईल की, आणखी प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे. हेही वाचा. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास स्थगिती, भारताचा निर्णय; आता पुढे काय होणार? प्रकल्पाचे फायदे कसे? कल्याण-कसारा तिसरी मार्गिका तयार झाल्यास मोठा दिलासा उपनगरीय प्रवाशांना मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांचा होणारा खोळंबा टळणार आहे. लांब पल्ल्याच्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीस स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल. तसेच रेल्वे अपघात आणि गर्दीतून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल.