scorecardresearch

Premium

‘पिप्पा’मधील ए. आर. रहमान यांच्या गाण्यावरून वाद का निर्माण झाला? बांगलादेशी कवी काझी नझरूल इस्लाम कोण होते?

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘करार ओई लुहो कोपट’ या गाण्याचा ताल आणि स्वर बदलून, प्रेमगीतामध्ये त्याला बदलल्यामुळे बंगाली भाषकांनी संताप व्यक्त केला आहे. गाण्याचे मूळ लेखक व संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांचा हा अवमान असल्याचे सांगत पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधून निषेधाचा सूर उमटला.

pippa-a-r-rahman-controversy
पिप्पा चित्रपटातील ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल गाणे मागे घ्यावे लागले आहे. (Photo – Wikimedia Commons, Pippa Movie Poster, PTI)

ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या पिप्पा या चित्रपटातील एका गाण्यामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते रॉय कपूर फिल्म्स यांनी दिलगिरी व्यक्त केली. पिप्पा या चित्रपटातील ‘करार ओई लुहो कोपट’ या गाण्याची चाल बदलल्यामुळे अनाहूतपणे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आम्ही माफी मागतो, अशी भूमिका निर्मात्यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध बंगाली कवी व संगीतकार काझी नझरुल इस्लाम यांनी १९२२ साली मूळ गाणे लिहिले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात लढत असताना बंगालमध्ये हे गाणे जणूकाही राष्ट्रगान असल्यासारखे प्रसिद्ध झाले होते. पिप्पा या चित्रपटात संगीतकार ए. आर. रहमान यांनी या गाण्याची चाल बदलल्यामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधील बंगाली भाषकांनी जोरदार टीका करीत नाराजी व्यक्त केली होती.

अभिनेता इशान खट्टर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पिप्पा या चित्रपटाचे दिग्दर्शन राज क्रिष्णा मेनन यांनी केले होते. १९७१ रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पश्चिम ढाकास्थित असलेल्या गरीबपूर येथे कॅप्टन (नंतर ते ब्रिगेडियर झाले) बलराम सिंह मेहता यांनी महत्त्वपूर्ण लढाई लढली होती. या लढाईच्या कथेवर ‘पिप्पा’ सिनेमा बेतलेला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर १० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
religion of lion
नावावरून सिंहांचाही धर्म शोधायचा का?
Amol Kolhe in Loksabha Speech
“मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण…”, अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले, मराठी भाषेतील काव्यात्मक भाषण चर्चेत!
poverty
बहुविध दारिद्र्य म्हणजे काय? बहुविध दारिद्र्य निर्देशांक कसा ठरवला जातो?

हे वाचा >> ‘पिप्पा’ चित्रपटातील कवी नजरुल इस्लाम यांच्या गाण्यावर वाद, निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत मागितली माफी

चित्रपट निर्मात्यांनी काय सांगितले?

‘पिप्पा’च्या निर्मात्यांनी इन्स्टाग्राम आणि एक्स या सोशल साईटवर आपली भूमिका जाहीर केली आहे. “आम्ही गाण्याचे नव्याने केलेले सादरीकरण हे कलात्मक स्वातंत्र्य घेऊन केलेली अभिव्यक्ती होती. दिवंगत कवी काझी नजरूल इस्लाम यांच्या वारसदारांकडून अधिकृत हक्क प्राप्त केल्यानंतरच या गाण्यावर काम करण्यात आले होते.”

“मूळ गाण्याची चाल आणि संगीत यांचा आम्हाला मनापासून आदर आहे. मूळ चालीशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्यांना जर आमचे नवे सादरीकरण आवडले नसेल किंवा त्यामुळे ते जर दुःखी झाले असतील, तर आम्ही प्रामाणिकपणे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”, असे निवेदन निर्मात्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

मूळ ‘करार ओई लुहो कोपट’ हे गाणे काय होते?

१९२२ मध्ये ‘बांग्लार कथा’ (बंगालच्या कथा) या मासिकात सर्वप्रथम हे गाणे प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर नझरूल यांच्या ‘भांगार गान’ या पुस्तकात या गाण्याचा समावेश करण्यात आला. देशबंधू चित्तरंजन दास (१८७०-१९२५) यांना ब्रिटिशांनी १९२२ रोजी तुरुंगात टाकल्यानंतर नझरूल यांनी हे क्रांतिकारी गाणे लिहिले होते. या गाण्याच्या ओळी होत्या, ‘करार ओई लुहो कोपट, भेंगे कोर ले लोपट’. या ओळींचा, तुरुंगाचे ते लोखंडी दरवाजे तोडून टाका आणि त्यांना मोकळे करा, असा अर्थ होतो. १९४९ साली पहिल्यांदा हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आणि ते गायक गिरीन चक्रवर्ती यांनी गायले होते.

काझी नझरूल इस्लाम कोण होते?

नझरूल (१८९९-१९७६) हे प्रसिद्ध बंगाली कवी, लेखक व संगीतकार होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘रवींद्र संगीत’ रचनेखालोखाल नझरूल यांनी लिहिलेल्या गाण्यांची ‘नझरूलगीती’ ही शैली बंगाली भाषकांमध्ये प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि जगभरात जिथे जिथे बंगाली भाषक पोहोचले, त्या सर्वांमध्ये नझरूल यांच्या रचनेला प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांना बांगलादेशचे राष्ट्रीय कवी म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे.

नझरूल यांना बंगाली भाषेत ‘बिद्रोही कोबी’ (विद्रोही कवी), असेही म्हटले जाते. त्यांनी लिहिलेली चार हजारहून अधिक गाणी ही आंदोलन आणि क्रांतीवर आधारित आहेत. या गाण्यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालचे स्वातंत्र्यसैनिक वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित झाले. नझरूल यांनी स्थापन केलेल्या आणि ते संपादन करीत असलेल्या मासिकातून ब्रिटिशविरोधी मजकूर छापला जात असल्यामुळे १९२३ साली ब्रिटिशांनी त्यांना अटक केली.

आणखी वाचा >> जन्माने हिंदू असलेल्या एआर रेहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? जाणून घ्या

नझरूल यांचे गाणे सादर करताना रहमान यांच्याकडून चूक झाली?

पिप्पा या चित्रपटात नझरूल यांनी लिहिलेल्या गाण्याच्या ओळी वापरल्या गेल्या असल्या तरी त्याला वेगळी चाल देण्यात आली. मूळ नझरूल यांच्या प्रसिद्ध गाण्याची ती चाल नसल्यामुळे हे गाणे वेगळे भासत होते. रवींद्र संगीत किंवा नझरुलगीती यांच्या गाण्यांशी केलेली छेडछाड किंवा सुधारणा बंगाली श्रोत्यांना अजिबात खपणारी नाही. बंगाली श्रोत्यांनी या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली. बंगाली सांस्कृतिक वारसा आणि ओळख जपण्याचा प्रयत्न बंगाली भाषक लोक करताना नेहमीच दिसतात.

अनेकांनी निदर्शनास आणून दिले की, रहमान यांनी दिलेली चाल हलकी-फुलकी, नाजूक व प्रेम दर्शविणारी आहे. मूळ नझरूल यांचे गाणे आणि चाल मात्र तीव्र देशभक्तीने ओतप्रोत अशी असून, त्या गाण्यातून जुलमी सत्तेविरोधातला निषेधाचा सूर कळून येतो. गाण्याच्या चालीतील ताल आणि सूर यांच्या बदलाशिवाय रहमान यांनी बासरी आणि तंतुवाद्याचे स्वर देऊन, मूळ गाण्याचा बाजच बदलून टाकला आहे.

नझरूल यांचे नातू पेंटर काझी अनिर्बन यांनी माध्यमांना सांगितले की, माझ्या आईने ‘पिप्पा’ चित्रपटाच्या निर्मात्यांना या गाण्याचे हक्क प्रदान केले होते; पण आम्ही गाण्याची चाल बदलण्यास सांगितले नव्हते. या गाण्याचा ताल आणि सूर यांची रचना मूळ गाण्यापेक्षा अगदी वेगळी करण्यात आल्यामुळे आम्हालाही धक्का बसला. नझरूल इस्लाम यांनी या पद्धतीने हे गाणे रचले नव्हते. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आम्ही आमच्या कुटुंबाचे नाव जोडू इच्छित नाही.

नझरूल यांची नात अनिंदिता काझी म्हणाल्या, “काझी यांच्या कुटुंबातील सदस्य या नात्याने आणि त्यांच्या रचनेवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या वतीने आम्ही मूळ गाण्याशी केलेली प्रतारणा सहन करू शकत नाही. हे गाणे चित्रपटातून काढून टाकले पाहिजे.

अनिर्बन यांच्या मातोश्री काझी कल्याणी यांनी २०२१ साली पिप्पा या चित्रपटासाठी हे गाणे वापरण्याची परवानगी दिली होती. ही संमती दिल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. निर्माते रॉय कपूर फिल्म्सने आपल्या निवेदनात म्हटलेय की, स्व. कल्याणी काझी यांच्या स्वाक्षरीने आणि श्री. अनिर्बन काझी यांच्या साक्षीने आम्हाला हे गाणे वापरण्याचे आणि त्याचे ताल व सूर बदलण्याचे अधिकार मिळाले होते. या कराराचा आत्मा जपत, आम्ही त्याचे प्रामाणिकपणे पालन केले. “या करारानुसार आम्हाला गाण्यातील ओळींना नवी चाल देण्याचे अधिकार मिळाले होते”, असेही निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

‘पिप्पा’ चित्रपटातील गाण्याला कुणी विरोध केला?

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर लिहिले, “बंगालचे प्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांच्या लोकप्रिय ‘करार ओई लुहो कोपट’ या ब्रिटिशविरोधी गाण्याचा ताल आणि स्वर ए. आर. रहमान यांनी बदलला. त्यामुळे बंगाली चिडलेले आहेत. रहमान यांचे गाणे मागे घेण्यात यावे आणि मूळ गाण्याची चाल तशीच ठेवण्यात यावी, अशी मागणी बंगाली भाषक करीत आहेत.”

भारतीय शास्त्रीय गायक पंडित अजॉय चक्रवर्ती यांनी म्हटलेय, “मला हे गाणे (रहमान यांनी रचलेले) अजिबात आवडले नाही. रहमान यांच्यासारख्या ख्यातनाम संगीतकाराकडून अशी अपेक्षा नाही. बंगाली लोकांच्या या गाण्याला धरून विशिष्ट भावना आहेत. या गाण्यावर काम करताना आधी पुरेसे संशोधन करायला हवे होते.”

बंगाली गायक रेघब चॅटर्जी यांनीही ए. आर. रहमान यांच्यावर टीका केली. “ए. आर. रहमान भारतातील एक प्रथितयश व नामवंत संगीत दिग्दर्शक आहेत. मात्र, ‘करार ओई लुहो कोपट’ हे गाणे त्यांची खासगी मालमत्ता नाही, हे वास्तव आहे, हे त्यांनी जाणले पाहिजे.

आम्ही बंगाली लोक काझी नझरूल इस्लाम यांनी रचलेले ‘करार ओई लुहो कोपट’ गाणे ऐकत मोठे झालो. ए. आर. रहमान यांनी ज्या पद्धतीने मूळ गाण्यात फेरफार करून, नवीन ताल आणि स्वर दिला, तो बंगाली गायक म्हणून मला मान्य करता येणारा नाही.”

संगीतकार देवज्योती मिश्रा म्हणाले, “ए. आर. रहमान एक अलौकिक संगीतकार आहेत, हे आपण जाणतोच. व्यक्तिशः ते माझे जवळचे मित्र आहेत. बंगालचे प्रतिभावंत कवी व संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांच्या गाण्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, रहमान यांनी दिलेली चाल ऐकून मलाही आश्चर्याचा धक्का बसला.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why a r rahman song from pippa film has offended many in bengal kvg

First published on: 15-11-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×