निशांत सरवणकर

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखपदी सदानंद दाते यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे. १ एप्रिल रोजी ते नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. २६/११ च्या हल्ल्यात शौर्य बजावलेले दाते यांची नियुक्ती या हल्ल्यामुळेच स्थापन झालेल्या या यंत्रणेच्या प्रमुखपदी व्हावी, हा योगायोगच. परंतु त्याही पलीकडे एका कर्तृत्ववान, धाडसी अधिकाऱ्याची नियुक्ती करून केंद्र सरकारने ही यंत्रणा अधिक बळकट केली आहे.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) काय आहे?

देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया होत असल्यामुळे त्याचा आंतरराज्य संबंध असल्याचेही निष्पन्न झाले. अशा वेळी केंद्रीय पातळीवर स्वतंत्र तपास यंत्रणा असावी, अशा शिफारशी विविध समित्यांकडून करण्यात आल्या होत्या. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा तपास यंत्रणेची अधिक गरज भासू लागली. राम प्रधान समितीनेही त्याबाबत अहवालात उल्लेख केला होता. अखेरीस ३१ डिसेंबर २००८ रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणा (नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी) कायदा अस्तित्वात आला आणि त्याद्वारे या तपास यंत्रणेची स्थापना झाली. सीमेवरील दहशतवादी कारवाया, देशांतर्गत दहशतवादी हल्ले, बनावट नोटा, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी आदींचा तपास करण्याची जबाबदारी या यंत्रणेवर सोपविण्यात आली. राज्यातील दहशतवादविरोधी पथकांशी समन्वय साधून गुप्तचर यंत्रणेनी दिलेल्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठीही यंत्रणेचा वापर होऊ लागला, अल्पावधीतच ही यंत्रणा महत्त्वाची तपास यंत्रणा म्हणून गणली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे या तपास यंत्रणेचा दोषसिद्धी दरही ९४.७० टक्के आहे.

हेही वाचा >>>फूड ब्लॉगर नताशा डिड्डींना होता डंपिंग सिंड्रोम; काय असतो ‘हा’ आजार

नियुक्ती काय?

सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान महासंचालक दिनकर गुप्ता हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांना मुदतवाढ मिळेल, अशी कुजबुज असतानाच दाते यांच्या नियुक्तीचा आदेश आला आहे. दाते यांची या पदासाठी योग्य उमेदवार म्हणून संभाव्य यादीत निवड झाली होती. दाते यांच्या असामान्य कारकिर्दीमुळेच कॅबिनेट समितीने त्यांचा नावाला पसंती दिली असावी, अशी चर्चा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे मुख्यालय दिल्लीत असून मुंबईसह हैदराबाद, गुवाहाटी, कोची, लखनऊ, कोलकता, चेन्नई, रायपूर, जम्मू, चंडीगड, रांची, इम्फाळ, बंगळुरू, पाटणा, भुवनेश्वर, जयपूर, भोपाळ,अहमदाबाद येथे विभाग कार्यालये आहेत. महासंचालक हे प्रमुखपद असून याआधी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी विशेष महासंचालकपद भूषविले आहे. दाते हे एनआयचे महासंचालक (प्रमुख) हे पद भुषविणारे पहिले अधिकारी ठरणार आहेत. १९९०च्या आयपीएस तुकडीतील दाते यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत दीर्घ काळ महासंचालक म्हणून मिळणार आहे. 

पार्श्वभूमी काय?

मूळचे पुण्याचे असलेले दाते यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले आहे. वाणिज्य शाखेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर इन्स्टिट्यूट ॲाप कॉस्ट अकाऊंटंट ऑफ इंडियाकडून पदवी संपादन करून दाते यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळविली आहे. नियुक्तीसाठी आग्रह धरायचा नाही. ज्या ठिकाणी मिळेल तेथे जायचे. खटके उडाले तर बदलीसाठी तयार राहायचे, असा दाते यांचा स्वभाव. केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन ते जेव्हा मुंबईत परतले तेव्हा मीरा- भाईंदर- वसई- विरार आयुक्तालयाची स्थापना करण्याची जबाबदारी दाते यांच्यावर सोपविण्यात आली. अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर एका अधीक्षकावर सोपविण्यात येणाऱ्या परिसराची जबाबदारी सोपविण्यात आली. तरीही त्यांनी खुशीने ती जबाबदारी सांभाळली. त्या काळात काळे धंदे करणाऱ्यांनी स्वत:हून शांत बसणे पसंत केले होते. राज्याच्या दहशवादविरोधी पथकाची जबाबदारी सोपविली गेली, तेव्हा तेथेच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली. परंतु राजकारण्यांना अडचणीचे ठरणाऱ्या दाते यांना तेथेच ठेवले गेले. दहशतवादविरोधी पथकातही त्यांनी अनेक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली. गेले आठ वर्षे रखडलेली व एटीएसला अत्यंत आवश्यक असलेली अत्याधुनिक प्रणाली मिळवून देण्यात यश मिळविले. मुंबई पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था व त्यानंतर गुन्हे विभागाचे ते सहआयुक्त होते.

हेही वाचा >>>विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

नियुक्ती का महत्त्वाची?

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अनेक महत्त्वाच्या संवेदनाक्षम प्रकरणांवर तपास सुरू आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दहशती कारवायांना वेळीच चाप लावण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश मिळाले आहे. पीएफआयविरोधात देशभरात छापे टाकले गेले तेव्हा महाराष्ट्रातील छाप्यात दाते यांच्या नेतृत्वाखालील राज्य दहशतवाद विरोधी विभागाने जोरदार कारवाई केली होती. आता दाते हेच प्रमुख झाल्याने आणखी शिस्तबद्ध पद्धतीने मुळाशी जाऊन तपास होऊ शकेल, असा जाणकारांचा होरा आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा दाते यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खोटे काहीही करू नका, असे बजावले होते. खोटे आरोपी सादर करण्याच्या पद्धतीला त्यांनी फाटा दिला होता. याचा परिणाम म्हणजे खंडणीबाबत येणारे दूरध्वनीही आपसूक बंद झाले. 

आव्हाने कोणती?

पीएफआयसारख्या संघटना देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पोखरू पाहत आहेत. बंगळुरु येथे झालेल्या स्फोटाचे ‘कनेक्शन’ पीएफआयशी जोडले गेल्यामुळे आताही वेगळ्या पद्धतीने ही संघटना कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थांची तस्करी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. देशभरातील छाप्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. दहशतवादी कारवायांसाठी अमली पदार्थांच्या तस्करीतूनच पैसा पुरविला जातो ही बाब वेळोवेळी उघड झाली आहे. त्यामुळे या दिशेनेही तपास यंत्रणेला सतर्क राहावे लागेल. 

रिबेरो काय म्हणतात..

दाते म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. आजवर अनेक सक्षम अधिकारी न्यायाची आणि सत्याची कास घरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडले आहेत, हे खेदाने कबूल करायला हवं, पण सुदैवाने आपल्याकडे असेही काही अधिकारी आहेत, ज्यांनी घटनेचा मान राखण्याची आपली शपथ तंतोतंत पाळली आहे. दाते हे अशा पोलीस अधिकाऱ्यापैकी एक आहेत, या परिच्छेदाने माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी दाते यांनी लिहिलेल्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेची सुरुवात केली आहे. यातच दाते यांचे मोठेपण सामावलेले आहे. दाते यांचा सगळ्याच क्षेत्रात असलेला वावर राष्ट्रीय तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. 

nishant.sarvankar@expressindia.com