जायंट टेक कंपनी गुगल पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गुगलने एक नवीन प्रोग्राम तयार केला आहे. गुगल वेगवेगळ्या रणनीती वापरून विविध विभागांमध्ये आपले कर्मचारी कमी असल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील अनेक विभागांसाठी गुगलने व्हॉलेंटरी एक्झिट प्रोग्रामची घोषणा केली आहे. तसेच कार्यालयापासून ५० मैलांच्या आत राहणाऱ्या कामगारांसाठी हायब्रिड कामाचे वेळापत्रकदेखील अनिवार्य केले आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही कपातीचा फटका बसल्याची माहिती आहे. गुगल मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या का कमी करत आहे? गुगला नवा एक्झिट प्रोग्राम काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.
गूगलचा नवीन एक्झिट प्रोग्राम काय आहे?
- ‘बिझनेस इनसाइडर’ दिलेल्या माहितीनुसार, गुगलमधील कोअर सिस्टम्सच्या वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्झपॅट्रिक यांनी सांगितले की, कंपनी अमेरिकेतील कोअर गुगलर्सना व्हॉलंटरी एक्झिट प्रोग्राम (VEP) देत आहे.
- याचा अर्थ असा की, या प्रोग्राम अंतर्गत गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्याची आणि त्यांना सेव्हरन्स पेदेखील मिळण्याची परवानगी असेल.
- “व्हॉलंटरी एक्झिट प्रोग्राम हा काही गुगल कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा असू शकतो. जे कर्मचारी कंपनीचे ध्येय आणि उद्दिष्टांबद्दल उत्साहित नाहीत किंवा ज्यांना त्यांच्या भूमिकेतील काम करण्यात अडचण येत आहे, अशांना नोकरी सोडण्याचे परवानगी या नवीन कार्यक्रमाद्वारे मिळते,” असे फिट्झपॅट्रिक यांनी सांगितले.

गुगलच्या नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आणि सेंट्रल इंजिनिअरिंग टीममधील कर्मचाऱ्यांना बायआउट पर्याय देण्यात आला होता. सीएनबीसीनुसार, मार्केटिंग, रिसर्च आणि कम्युनिकेशन्स टीममधील कर्मचाऱ्यांनादेखील हा पर्याय उपलब्ध होता. गुगलने कामगारांना स्वेच्छेने कामावरून काढून टाकण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘मीडिया रिपोर्ट्स’नुसार, कंपनीने त्यांच्या पीपल ऑपरेशन्स विभाग आणि त्यांच्या प्लॅटफॉर्म्स आणि डिव्हाइसेस विभागातील अमेरिकेतली कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला होता.
विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांकवर होणार परिणाम
‘बिझनेस इनसाइडर’च्या वृत्तानुसार, Google Search, Ads, Geo and Commerce यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ही ऑफर देण्यात आली होती. गूगल जनरेटिव्ह एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे आणि ओपन एआयसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी अनेक सुधारणा करीत आहे. अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या मते, गूगलच्या नॉलेज अँड इन्फॉर्मेशन टीमने एआय ओव्हरव्ह्युज, सर्कल टू सर्च, व्हिडीओ अंडरस्टँडिंग आणि सर्च फंक्शनॅलिटीमध्ये सुधारणा सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (डीओजी) एआय मार्केटमध्ये गूगलचा अविश्वास समस्यादेखील वाढत असल्याचे म्हटले आहे.
गूगलची नवीन रिमोट वर्क पॉलिसी काय?
अनेक विभागांमधील रिमोट कर्मचाऱ्यांना म्हणजेच घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता गूगलने हायब्रिड वर्क करण्यास सांगितले आहे. त्यात तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी सोडण्याची संख्यादेखील वाढू शकते. अनेक तज्ज्ञ या धोरणाला ‘बॅकडोअर लेऑफ’ असेही म्हणतात. कंपनीने हे धोरण लागू केल्यास कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढते आणि कंपनीवरील दबावही कमी होतो. हे धोरण लागू केल्यास कर्मचाऱ्यांकडून कायदेशीररीत्या आव्हान देण्याचा धोका कमी होतो. मोठ्या प्रमाणात लेऑफच्या बाबतीत, अमेरिकेतील कंपन्यांना संबंधित कामगार नियामकांना पूर्वसूचना द्यावी लागू शकते.
फिट्झपॅट्रिक यांनी नमूद केले आहे की, गूगलने २०२३ मध्ये सुमारे १२,००० नोकऱ्या म्हणजेच त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सहा टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून गूगलने त्यांच्या व्हॉइस असिस्टंट युनिट्स, हार्डवेअर टीम्स (पिक्सेल/नेस्ट/फिटबिट), जाहिरात विक्री टीम आणि त्यांच्या एआर टीममध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘लेऑफ्स.एफवायआय’च्या माहितीनुसार ७५ गूगल कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गूगलने कोअर गुगलर्सना पाठविलेल्या अंतर्गत मेमोमध्ये कनेक्शन, सहयोग व नवीन प्रकल्पासाठी जास्तीत जास्त कामगारांना ऑफिसमधून काम करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. परंतु, फिट्झपॅट्रिक यांनी असा दावा केला की, कंपनीचा हेतू कोअर गुगलर्सची संख्या कमी करणे हा नसून कंपनी वाढविण्याच्या नव्या संधी निर्माण करणे हा आहे.
इतर कोणत्या कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करीत आहेत?
कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या इतर प्रमुख टेक कंपन्यांमध्ये इंटेल आणि मायक्रोसॉफ्टचादेखील समावेश आहे. ‘ओरेगॉन लाइव्ह’ / ‘द ओरेगॉनियन’च्या अहवालानुसार, इंटेल आपला ऑटोमोटिव्ह व्यवसाय बंद करण्याची आणि तेथील बहुतेक कामगारांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. ‘आउटलेट’च्या वृत्तानुसार अंतर्गत मेमोचा उल्लेख करीत दावा करण्यात आला आहे की, इंटेल त्यांच्या कंपनीतील सुमारे १५ टक्के ते २० टक्के कामगारांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या मते, मायक्रोसॉफ्ट त्यांच्या गेमिंग विभागातील एक्सबॉक्समधील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने सुमारे ३०५ नोकऱ्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्टने मे महिन्यात सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
गुगलची प्रमुख विभागांमध्ये टाळेबंदी
गुगलने २०२५ मध्ये अनेक वेळा नोकरकपातीची घोषणा केली आहे. अनेक विभागांमधून शेकडो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. गुगलने विक्री विभागातील जागतिक व्यवसाय युनिटमधील २०० कामगारांना काढून टाकले आहे. तसेच अँड्रॉइड, पिक्सेल फोन व क्रोम ब्राउझर यांचा समावेश असलेल्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. अधिक सहकार्य वाढविणे आणि ग्राहकांना जलद व प्रभावीपणे सेवा देण्याची क्षमता वाढविणे यांसाठी गुगलकडून अनेक फेरबदल करण्यात येत आहेत. ही नोकरकपातदेखील त्याचाच एक भाग आहे.