– रेश्मा राईकवार
इतिहासातली काही वादग्रस्त पाने जेव्हा नव्याने पुस्तक वा चित्रपट माध्यमातून येतात तेव्हा त्यावर त्या घटनेच्या बाजूने आणि त्या घटनेविरोधात असे दोन गट नेहमी पडतात. एखाद्या कलाकृतीवरून खुद्द पंतप्रधानांनी त्याचे कौतुक करावे आणि देशभर त्याच गोष्टीवरून राजकीय, सामाजिक मतभेदाचा वणवा पेटावा असा प्रसंग सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या निमित्ताने देश अनुभवतो आहे. गेल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा काश्मिरी पंडितांचे हत्यासत्र हा त्याचा कथाविषय आहे एवढीच कल्पना सगळ्यांना होती. शुक्रवारी चित्रपटगृहातून एक किंवा दोन शो इतक्या मर्यादित प्रमाणात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा एवढा गाजावाजा झाला की दुसऱ्याच दिवशी चित्रपटाचे दिवसाला चार ते पाच शोज दाखवले जाऊ लागले.
सत्य, स्वातंत्र्य की निव्वळ कलाकृती…
इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला तयार व्हा… असा नारा देत इस्लामी दहशतवाद्यांनी १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंवर हल्ला चढवला होता. या काळात काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून बाहेर काढून निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले, लहान निष्पाप मुलांचेही या अतिरेक्यांनी बळी घेतले. पिढ्यान् पिढ्या काश्मीरमध्ये राहिलेल्या पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी तिथून परागंदा व्हावे लागले. अनेक काश्मिरी पंडित आपल्या कुटुंबासह निर्वासितांसारखे छावण्यांमध्ये राहत होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर काश्मिरी पंडितांचा नरसंहार करण्यात आला. त्यांना हाकलण्यात आले, त्यांच्या जमिनी-घरे बळकावली. मात्र हे सत्य कायम तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. हा चित्रपट या घटनेत ज्या काश्मिरी पंडितांनी आपली घरं गमावली, जिवलग गमावले त्यांच्याशी बोलून, संशोधन करून बनवण्यात आला आहे, असे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे सत्य पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहे, असे म्हणत लोकांनी निर्माता-दिग्दर्शकांची प्रशंसा केली आहे. तर दुसरीकडे काश्मिरी पंडितांची हत्या झाली, त्यांना विस्थापित करण्यात आले या घटना सत्य असल्या तरी त्याच काळात काश्मिरी मुसलमानांचीही हत्या करण्यात आली होती. त्याबद्दल या चित्रपटात काहीही म्हटलेले नाही. किंबहुना सध्या जे हिंदुत्ववादी धोरण सत्ताधाऱ्यांकडून राबवले जात आहे त्याला समर्थन देत, देशातील प्रत्येक मुसलमानाविषयी तिरस्काराचे वातावरण निर्माण होईल अशी चित्रपटाची मांडणी करण्यात आला असल्याचा आरोपही दिग्दर्शकावर होतो आहे.
वादांची मालिकाच…
भाजपच्या धोरणांशी साधर्म्य असलेला प्रचारकी थाटाचा चित्रपट म्हणून ‘द काश्मीर फाईल्स’वर टीका करणाराही मोठा वर्ग आहे. हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, त्यामुळे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल, अशी मागणी करणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र प्रत्येकाला कोणत्याही विषयावरील चित्रपट करण्याचे स्वातंत्र्य आहे हे नमूद करत ही याचिका फेटाळण्यात आली होती.
त्यानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाची प्रसिद्धी का केली गेली नाही, असा सवाल एका चाहत्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना केला होता. कपिल तू हे योग्य केले नाहीस, आम्ही तुझा निषेध करतो, अशा शब्दांत कपिलवर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. त्यावर काही काळ शांत बसल्यानंतर सत्य वेगळे आहे, पण लोकांनी आधीच ठरवून ठेवले असेल तर त्यांना समजावण्याचा काय उपयोग, अशा शब्दांत कपिलने आपली भावना व्यक्त केली.
बॉलीवूडही वादात अडकले…
दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावतने या चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहिला पाहिजे, असे म्हटले. स्वरा भास्कर या अभिनेत्रीलाही दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविषयी केलेल्या पोस्टबद्दल टीकेला सामोरे जावे लागले. स्वरा भास्कर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात याआधीही अनेक सामाजिक – राजकीय मुद्द्यांवरून कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे त्याचा संदर्भ देत जर आपल्या यशाचे कौतुक व्हावे असे वाटत असेल, तर आधी लोकांना वाईट बोलू नये, असा टोला अग्निहोत्री यांचे नाव न घेत स्वराने लगावला. त्यावर तुझ्या सॉफ्ट पॉर्न वेबमालिकांपेक्षा हा सत्य सांगणारा चित्रपट सर्वार्थाने महत्त्वाचा आहे, असे ऐकवत तिला लोकांनी टीकेचे धनी केले. आमिर खानलाही याविषयी प्रश्न विचारण्यात आला, मात्र आपण अजून चित्रपट पाहिलेला नाही, असे उत्तर त्याने दिले. तर अक्षय कुमारने अनुपम खेर यांच्या अभिनयाबद्दलची प्रशंसा ऐकल्याचे कौतुक करत लवकरच चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
राजकीय रंग…
काश्मीर हा एकंदरीतच देशाच्या दृष्टीने कायम अनुत्तरित राहिलेला आणि सतत अशांततेत होरपळत असलेला रक्तरंजित प्रश्न. हा प्रश्न सोडवण्याकरता अनेक पक्षांच्या सरकारांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले. अगदी अटलबिहारी वाजपेयी यांनीही कश्मिरियतचे आवाहन करत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. यात कोणालाच यश आले नाही. मात्र काश्मीरला ३७० कलमांतर्गत मिळालेला विशेषाधिकारच या सगळ्या अत्याचारांच्या मुळाशी आहे. हे कलम हटवा आणि काश्मिरी पंडितांना पुन्हा त्यांच्या घरी येऊ द्या, अशी मागणीही काश्मिरी पंडितांनी केली होती इथपासून ते भाजप प्रणित सरकारने ३७० कलम रद्द करण्यापर्यंतच्या घटना आणि त्याचे पडसाद अशा विविध मुद्द्यांना या चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या चमूला भेटण्यापासून त्यांनी सत्य जगासमोर आणल्याबद्दल त्यांचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे ते सत्य कायम दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ज्यांना हा चित्रपट योग्य वाटत नाही, त्यांनी दुसरा चित्रपट करावा. त्यांना कोणी अडवले आहे. तथ्यांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रपटाच्या विरोधासाठी एक इकोसिस्टिम काम करते आहे. अशा परिस्थितीत सत्यासाठी जगणाऱ्या लोकांनी सत्यासाठी उभे राहिले पाहिजे. सत्य सांगणारे असे आणखी चित्रपट झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत केलेल्या भाषणात व्यक्त केली.
एकट्या केरळ काँग्रेसने मांडली भूमिका
एकीकडे या चित्रपटाला देशभरातील भाजप नेत्यांनी उचलून धरले, मात्र त्याविरोधात बोलण्याचे धाडस कोणीही केले नाही. एकट्या केरळ काँग्रेसने यासंदर्भात आपली भूमिका समाजमाध्यमांवर स्पष्ट केली. या चित्रपटातून काँग्रेस पक्षावर करण्यात आलेल्या टीकेचे खंडन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. काश्मिरी पंडितांवर हल्ले सुरू झाले तेव्हा काश्मीरचे राज्यपाल जगमोहन होते. जगमोहन यांनी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी त्यांना जम्मूत स्थलांतरित होण्यास सांगितले. त्यावेळी देशातही व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते, ज्यांना भाजपचा पाठिंबा होता, याकडेही केरळ काँग्रेसने लक्ष वेधले. त्यानंतर काश्मीरमध्ये एकदा आणि केंद्रात दोनदा भाजपची सत्ता होती तेव्हाही काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी नेण्याचा प्रयत्न भाजपला करता आला नाही. भाजपने कायमच काश्मीरचा प्रश्न हा हिंदू – मुस्लिम यांच्यातील प्रश्न म्हणून पाहिला आहे, अशी टीकाही त्यांनी पोस्टमध्ये केली. हिंदूंबरोबरच काश्मिरी मुसलमानांचीही त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हत्या झाली होती, मात्र हेही सत्य दडपण्यात आले असा उल्लेख काँग्रेसच्या पोस्टमध्ये होता. मात्र त्याबाबत टीका झाल्याने हा उल्लेख काढून टाकत पुन्हा पोस्ट टाकण्यात आली. जगमोहन यांच्या उल्लेखानंतर समाजमाध्यमांवर काश्मिरी पंडितांचे वारसदार, भाजप नेते आणि इतर विचारवंत, पत्रकार यांनीही आपापल्या पद्धतीने तत्कालीन परिस्थितीविषयी भाष्य केले आणि हा वाद वाढतच गेला.
करमुक्त करण्याची मागणी
या चित्रपटाला भाजप नेत्यांकडून मिळालेले समर्थन खूप परिणामकारक ठरले. मध्य-प्रदेश, गोवा, आसाम, कर्नाटक जिथे भाजपप्रणित सरकार आहे तिथे हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, यासंदर्भात बोलताना या चित्रपटाच्या आडून राज्यातील कायदा – सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली.
‘द काश्मीर फाईल्स’वरून सुरू झालेला हा वाद अजूनही थांबलेला नाही. उलट त्याला आणखी धार्मिक, राजकीय वादाचे फाटे फुटत आहेत. त्यावरून इतर चित्रपटही विनाकारण वादात ओढले जात आहेत. एखाद्या चित्रपटावरून होणारे वाद नवीन नाहीत, मात्र या चित्रपटावरून देशभरातच गटातटाचे राजकारण रंगू लागले आहे. त्यात आणीबाणी आणि ऑपरेशन गंगासारख्या विषयांवरही चित्रपट व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधानांनी ही चर्चा अधिकच वाढवली आहे. या सगळ्याचा एक चांगला परिणाम म्हणजे चित्रपट तिकीटबारीवर उत्तम कमाई करतो आहे हेही नसे थोडके!