बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसाठी वार्षिक करार सूची जाहीर केली. बहुतांश खेळाडूंनी आपापली श्रेणी कायम राखली. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचा प्रथमच करारसूचीत समावेश करण्यात आला. मात्र सर्वाधिक चर्चा झाली श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची. शैलीदार फलंदाज म्हणून नावारुपास आलेला श्रेयस अय्यर आणि तडाखेबंद फलंदाज आणि विकेटकीपर इशान किशन यांना या करार यादीतून डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रीय संघ तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधली प्रतिष्ठेची अशी रणजी करंडक स्पर्धा यामध्ये खेळण्याला प्राधान्य न दिल्याने या दोघांचा वार्षिक करार सूचीसाठी विचार करण्यात आलेला नाही.गेल्या वर्षीच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीनुसार श्रेयस ‘ब’ तर इशान ‘क’ श्रेणीत होता. ‘ब’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना प्रतिवर्षी ३ कोटी तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना प्रतिवर्ष १ कोटी रुपये मानधन मिळतं. श्रेयस आणि इशानला आता हे मानधन मिळणार नाही.

‘खेळाडूंनी डोमेस्टिक क्रिकेटऐवजी आयपीएलला प्राधान्य देऊ नये. डोमेस्टिक क्रिकेट खेळल्याशिवाय राष्ट्रीय संघ निवडीवेळी विचार केला जाणार नाही’, असा स्पष्ट इशारा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिला होता. त्यांनी यासंदर्भात करारबद्ध खेळाडूंना पत्रही लिहिलं होतं.

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रेयसने ४६८ धावा केल्या होत्या. यामध्ये २ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. वनडेत चौथा क्रमांक त्याने आपलासा केला होता.कसोटी प्रकारात त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता येत नव्हता पण त्याची क्षमता तसंच गुणवत्ता लक्षात घेऊन त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलं. सुरुवातीच्या दोन कसोटीत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावेळी त्याला पाठीच्या दुखण्याने सतावलं असल्याचं वृत्त समोर आलं होतं. कामगिरी चांगली नसल्याने मालिकेतील उर्वरित तीन कसोटींसाठी त्याची निवड करण्यात आली नाही.

पाठीचं दुखणं बळावल्यामुळे श्रेयसने रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईच्या प्राथमिक फेरीतील शेवटच्या आणि क्वार्टर फायनल लढतीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितलं. मात्र खेळाडूंच्या दुखापतीचं व्यवस्थापन करणाऱ्या एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीने श्रेयस फिट असल्याचा निर्वाळा दिला. एनसीएने फिट ठरवल्यानंतरही श्रेयसने मुंबईसाठी खेळणं टाळल्याने बीसीसीआयची खप्पा मर्जी झाली. याच काळात आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कॅम्पमध्ये श्रेयस सहभागी झाला होता. राष्ट्रीय संघासाठी खेळत नाही, मुंबईसाठी खेळत नाही आणि आयपीएल संघाच्या शिबिरात सहभागी होत असल्याने बीसीसीआयने श्रेयसला वार्षिक करारातून वगळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईच्या तामिळनाडूविरुध्दच्या सेमी फायनल लढतीसाठी श्रेयसचा संघात समावेश करण्यात आला आहे. २२ मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत श्रेयस कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार आहे.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे निवडसमितीच्या ‘स्कीम ऑफ थिंग्ज’ मधून बाहेर गेले आहेत. त्यादृष्टीने श्रेयसला भारतीय संघातलं स्थान पक्कं करण्याची सर्वोत्तम संधी होती. मात्र वार्षिक करार यादीतून वगळण्यात आल्याने त्याने मोठी संधी वाया घालवली आहे. करार यादीत नाव नसलं तरी श्रेयसची भारतीय संघासाठी निवड होऊ शकते. मात्र निवडसमिती आणि संघव्यवस्थापन करारबद्ध खेळाडूंचाच प्राधान्याने विचार करतं. श्रेयसने १४ टेस्ट, ५९ वनडे आणि ५१ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान वैयक्तिक कारण सांगत इशान किशनने ब्रेक घेतला. कसोटी मालिकेदरम्यान त्याला ब्रेक मंजूर करण्यात आला. सतत संघातून वगळलं जात असल्याने इशान नाराज असल्याचं वृत्त समोर आलं. या काळात इशान दुबईत पार्टी करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हेही बीसीसीआयला रुचलं नाही. जानेवारी महिन्यापासून इशान बडोदा इथे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांच्याबरोबरीने सराव करतो आहे. फिट असूनही इशान रणजी करंडक स्पर्धेत झारखंडसाठीही खेळला नाही. हे बीसीसीआयला पसंत पडलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत इशान नसल्याने दोन कसोटीत के. एस. भरतला संधी मिळाली. त्याला समाधानकारक कामगिरी करता न आल्याने राजकोट कसोटीत ध्रुव जुरेलला भारताची कॅप देण्यात आली. राजकोट कसोटीत त्याने दर्जेदार यष्टीरक्षण केलं. रांची कसोटीत ९० आणि नाबाद ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या डावात संघ अडचणीत असताना ध्रुवने संयमी खेळी केली. ध्रुवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मिळालेल्या संधीचं ध्रुवने सोनं केलं.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना इशानसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘इशानला डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागेल. त्यानंतरच त्याचा संघनिवडीसाठी विचार होऊ शकतो’. रांची कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही नाव न घेता भूमिका घेतली होती. ‘ज्या खेळाडूंना आव्हानात्मक अशा कसोटी प्रकारात खेळायचं आहे, ज्यांच्यात ती भूक आहे, ऊर्मी आहे त्यांचाच संघनिवडीसाठी प्राधान्याने विचार होईल’, असं रोहित म्हणाला होता.

मंगळवारी नवी मुंबईतील नेरुळ इथे आयोजित डीवाय पाटील ट्वेन्टी२० स्पर्धेत इशान खेळण्यासाठी उतरला. इशानने २ टेस्ट, २७ वनडे आणि ३२ ट्वेन्टी२० लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक नावावर असणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये इशानचा समावेश होतो. ऋषभ पंतला अपघात झाल्यानंतर तो जवळपास दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असेल हे स्पष्ट झालं. अशा परिस्थितीत इशानला भारताचा प्रथम प्राधान्य विकेटकीपर होण्याची संधी होती. मात्र प्रत्यक्षात इशानला या संधीचा उपयोग करुन घेता आला नाही.

करारातून वगळल्याचा काय परिणाम?
वार्षिक करारातून वगळल्याचा परिणाम खेळाडूंच्या मानधनावर होतो. ज्या खेळाडूंचा वार्षिक करार सूचीत समावेश होतो त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन मिळतं. जे खेळाडू वार्षिक करार सूचीत नसतात त्यांना फक्त मॅच फी मिळते. उदाहरणार्थ करारबद्ध नसलेला खेळाडू वर्षात दोन कसोटी सामने खेळला तर त्याला एका कसोटीसाठी १५ लाख या पद्धतीने दोन कसोटींसाठी ३० लाख रुपये मिळतील. पण करारबद्ध खेळाडू दोन कसोटी सामने खेळला तर त्याला वार्षिक कराराचे ५ कोटी आणि ३० लाख असं मानधन मिळेल. त्यामुळे करारात समावेश न होणं श्रेयस आणि इशान आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारं आहे.

करारबद्ध खेळाडूला बीसीसीआयकेंद्रित सोयीसुविधांचा वापर करता येतो. खेळाडूंच्या दुखापत व्यवस्थापनासाठी बंगळुरू इथे नॅशनल क्रिकेट अकादमी आहे. करारबद्घ खेळाडू तिथे मार्गदर्शनासाठी, रिहॅबसाठी कधीही जाऊ शकतो. करारबद्ध सूचीत नसलेल्या खेळाडूंना एनसीए किंवा बीसीसीआयच्या अन्य सुविधा केंद्रात जाण्यासाठी त्याच्या स्थानिक संघटनेच्या माध्यमातून जावं लागतं.

करारबद्ध खेळाडूला इन्शुरन्स कव्हर अर्थात विमा कवच मिळतं. एखादा खेळाडू भारतासाठी खेळताना दुखापतग्रस्त झाला आणि आयपीएल खेळू शकला नाही तर त्याचं आर्थिक नुकसान होत नाही. उदाहरणार्थ भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी राष्ट्रीय संघासाठी खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या सगळ्याचा खर्च बीसीसीआय करत आहे. खेळाडूला स्वत:च्या खिशातून यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. श्रेयस आणि इशान यांना आता ती सुविधा मिळणार नाही.