फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ही अमेरिकेतली जगप्रसिद्ध तपास यंत्रणा आहे. एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत सामान्यतः दहशतवादी, आतंकवादी, पोलिसांच्या हाती न येणाऱ्या क्रूर आरोपींचा समावेश असतो. मात्र, आता एफबीआयने एका ४० वर्षीय महिलेचे नाव आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. या महिलेवर स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. मुख्य बाब म्हणजे या महिलेचा संबंध मेक्सिकोसह भारताशीदेखील आहे. कोण आहे सिंडी रॉड्रिग्ज-सिंग? या हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या या महिलेचे नाव एफबीआयच्या १० मोस्ट-वॉन्टेड फरारी व्यक्तींच्या यादीत कसे आले? या महिलेचा भारताशी काय संबंध? त्याविषयी जाणून घेऊ…

प्रकरण काय?

  • सहा वर्षीय नोएल रॉड्रिग्ज अल्वारेझला अखेरचे ऑक्टोबर २०२२ मध्ये पाहण्यात आले होते.
  • त्याच वर्षी त्याची आई सिंडी रॉड्रिग्ज सिंगने जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
  • काही महिन्यांनंतर २० मार्च २०२३ रोजी टेक्सासमधील एव्हरमन पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना मुलाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची आणि तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
  • त्यामुळे राज्याच्या बाल संरक्षण सेवांच्या विनंतीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली.
  • या चौकशीत रॉड्रिग्ज सिंगने पोलिसांना सांगितले की, नोएल मेक्सिकोमध्ये त्याच्या वडिलांबरोबर राहत आहे आणि नोव्हेंबर २०२२ पासून तो तिथेच आहे.

या चौकशीच्या केवळ दोन दिवसांनी म्हणजेच २२ मार्च रोजी सिंडी, तिचा पती अर्शदीप सिंग आणि त्यांची इतर सहा मुले भारताला जाण्यासाठी निघाली. मात्र, यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा नोएल नव्हता. एफबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या मते, नोएल त्या विमानात चढला नाही आणि तेव्हापासून तो दिसला नाही. तेव्हापासून, रॉड्रिग्ज सिंग फरारी आहे आणि तपासकर्त्यांचा असा अंदाज आहे की, ती भारतात किंवा मेक्सिकोमध्ये लपून बसली आहे. मंगळवारी एफबीआयने तिच्या अटकेसाठी इनामी रक्कम जाहीर केली.

तिच्याविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला २५,००० डॉलर्स म्हणजेच २१.४ लाख रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता बक्षिसाची ही वाढवण्यात आली आहे. आता तिच्याविषयी माहिती देणाऱ्याला तब्बल २,५०,००० डॉलर्स म्हणजेच २.१४ कोटी रुपये मिळतील, असे जाहीर करण्यात आले आहे. ‘एफबीआय’ने स्पष्ट केले की, फरारी व्यक्तींसाठी देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम आहे.

नोएलबरोबर काय घडले?

नोएलला फुप्फुसांचा आजार होता आणि त्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता होती, असे म्हटले जाते. परंतु, त्याची काळजी घेण्याऐवजी त्या लहान जीवावर अनेक अत्याचार करण्यात आले. ‘यूएसए टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रॉड्रिग्ज सिंगला तिचा मुलगा दुष्ट आहे, त्याच्यात भूत आहे, असे वाटायचे. तो बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी तिने लोकांना सांगितले होते की, तिला भीती होती की, नोएल तिच्या नवजात जुळ्या मुलांना मारेल. साक्षीदारांनी पोलिसांना सांगितले की, रॉड्रिग्ज सिंगने नोएलला अनेक दिवस अन्न आणि पाणी दिले नव्हते. त्याचे कारण म्हणजे तिला त्याचे डायपर बदलायचे नव्हते. नोएलने पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला मारहाण केल्याचेही एका वृत्तात सांगण्यात आले आहे.

नोएल कुठे आहे, असे विचारले असता, तिने अनेक परस्परविरोधी कथा सांगितल्या. तिने दावा केला की, फिएस्टा मार्ट सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये तिने नोएलला एका महिलेला विकले. परंतु, पोलिसांना हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एव्हरमनचे माजी पोलीस प्रमुख क्रेग स्पेन्सर यांनी स्पष्ट केले की, कधीही याबाबतची विक्री किंवा देवाणघेवाण झाली नाही. तपासकर्त्यांनी एक धक्कादायक माहिती उघड केली. हे कुटुंब देश सोडून पळून जाण्याच्या आदल्या दिवशी अर्शदीप सिंग हा त्याच्या घराजवळील डंपस्टरमध्ये कार्पेट टाकताना दिसला. मानवी अवशेष शोधण्यासाठी प्रशिक्षित पोलीस कुत्र्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळील परिसरात सोडण्यात आले.

सिंडी रॉड्रिग्ज सिंगचे नाव एफबीआयच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत कसे आले?

सिंडी रॉड्रिग्ज सिंग आणि तिचे कुटुंब अमेरिकेतून पळून गेल्यानंतर काही महिन्यांतच नोएल अल्वारेझच्या बेपत्ता प्रकरणाचा कसून तपास सुरू झाला. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिकाऱ्यांनी टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथील टॅरंट काउंटीच्या जिल्हा न्यायालयात सिंडी रॉड्रिग्ज सिंगवर हत्येचा आरोप दाखल केला. काही दिवसांनंतर म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी टेक्सासच्या जिल्हा न्यायालयाने फेडरल अटक वॉरंट जारी केले आणि त्यात तिच्यावर खटला टाळण्यासाठी बेकायदा पद्धतीने विमान उड्डाण केल्याचा केल्याचा आरोप करण्यात आला. मंगळवारी एफबीआयच्या एका पत्रकार परिषदेत, एफबीआयच्या डॅलस फील्ड ऑफिसचे स्पेशल एजंट इन चार्ज आर जोसेफ रोथ्रॉक यांनी सांगितले, “सिंडी रॉड्रिग्ज सिंगला हा संदेश आहे की, आम्ही तिचा शोध घेणे थांबवणार नाही. आम्ही नोएलसाठी न्याय मिळवूनच राहू.”

कोण आहे सिंडी रॉड्रिग्ज सिंग?

सिंडी रॉड्रिग्ज सिंगचा जन्म १९८५ मध्ये टेक्सासमधील डॅलस येथे झाला. तिची उंची अंदाजे ५ फूट १ इंच ते ५ फूट ३ इंच आहे आणि वजन १२० ते १४० पौंड (५४ ते ६३ किलो) दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. एफबीआयच्या ‘लूकआउट बुलेटिन’नुसार, तिचा रंग सावळा आहे, डोळे तपकिरी रंगाचे आहेत आणि तिची पाठ, उजवा हात आणि उजवा पाय यांवर अनेक टॅटू आहेत. या पत्रकार परिषदेत पुढे सांगण्यात आले, “सिंडी रॉड्रिग्ज सिंगला तत्काळ पकडणे हे न्यायाच्या हितासाठी, आपल्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी, तसेच तिच्या ताब्यात असलेल्या इतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला एफबीआयने तिच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना २५,००० डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते; परंतु २ जुलै २०२५ रोजी एजन्सीने बक्षिसाची रक्कम वाढवून, ती २,५०,००० डॉलर्सपर्यंत केली. तसेच तिचे नाव १० मोस्ट वॉन्टेड फरारी व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. एव्हरमनचे पोलीस प्रमुख क्रेग स्पेन्सर म्हणाले, “एफबीआयच्या १० मोस्ट वॉन्टेड फरारी व्यक्तींच्या यादीत सिंडी रॉड्रिग्ज सिंगचा समावेश हा नोएलला न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी पुढे म्हटले, “हे नोएल आणि या समुदायाला दिलेले वचन आहे की, जोपर्यंत जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.”