News Flash

भूदल, नौदल: भूमिका आणि गुणवैशिष्टय़े

अश्मयुगापासून अणुयुगापर्यंत मानवाच्या लढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत गेले.

अश्मयुगापासून अणुयुगापर्यंत मानवाच्या लढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत गेले. त्यात त्याच्या शस्त्रांच्या विकासाने मोठी भूमिका निभावली. शस्त्रे जसजशी प्रगत होत गेली तसतशी लढणे किंवा युद्ध करणे ही प्रक्रिया अधिक सुसंघटित (ऑर्गनाइज्ड) आणि विशेष कौशल्यमय (स्पेशलाइज्ड) होत गेली. सैन्याचे पायदळ (इन्फंट्री), तोफखाना (आर्टिलरी), रणगाडा किंवा चिलखती दल (आर्मर्ड कोअर) या प्रमुख लढाऊ विभागांसह रसद पुरवठा (सप्लाय), संदेशवहन (सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन), शस्त्रनिर्मिती (ऑर्डनन्स) आदी विभाग तयार झाले. मानवी किंवा शारीरिक शौर्याबरोबरच तांत्रिक क्षमतांनाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले.

एकीकडे जमिनीवरील लढाई अशी विकसित होत असतानाच पाण्यातही युद्धाची दुसरी मिती (डायमेन्शन) आकारास येत होती. जमीन आणि पाण्यावरील युद्धतंत्र एकाच वेळी दोन अक्षांवर विकसित होत होते. ते अक्ष पुरते समांतर होते असेही म्हणता येत नाही. कारण इतिहास काळात नौदल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाया आणि आधुनिक काळात नरमडी येथील कारवाईप्रमाणे भूदल, नौदल आणि वायुदलाच्या एकत्रित मोहिमांमध्ये (जॉइंट ऑपरेशन्स) हे अक्ष एकमेकांना मिळत होते. किंबहुना ज्यांनी या तिन्ही दलांची परस्परपूरकता ओळखली त्यांनीच युद्धावर नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे आजवर या सदरातून भूदलाच्या विविध शस्त्रांचा आढावा घेतल्यानंतर नौदलाकडे मोर्चा वळवणे हे नैसर्गिक आहे.

भूदल आणि नौदल यांची रचना किंवा त्यांच्या कारवायांचा पोत वेगळा आहे. मुळात त्यांच्या कारवाईचे माध्यम (जमीन आणि पाणी) भिन्न आहे. त्यानुसार त्यांच्या भूमिका आणि गुणवैशिष्टय़ांमध्ये (रोल्स अ‍ॅण्ड अ‍ॅट्रिब्युट्स) वैविध्य आहे. युद्धशास्त्रात एखाद्या प्रदेशावर प्रभुत्व स्थापन करण्याची एक संकल्पना आहे. ज्या जमीन, पाणी किंवा हवाई क्षेत्रावर आपले नियंत्रण असेल त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि तो वापर शत्रूला नाकारता आला पाहिजे. म्हणजेच यूज अ‍ॅण्ड डिनायल ऑफ यूज ऑफ लॅण्ड, वॉटर ऑर एअर. जमिनीचा वापर  करणे आणि शत्रूला तो नाकारणे या प्रक्रियेत आपल्या ताब्यातील जमिनीचे रक्षण करणे आणि शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करणे अशा बाबी येतात. जमिनीवर एखाद्या प्रदेशात सैन्य कायमचे तैनात करता येते. समुद्रात ती (म्हणजे पर्मनंट डिप्लॉयमेंट किंवा होल्डिंग द ग्राऊंड) शक्यता नसते.

जमिनीवरील मोहिमा (कॅम्पेन) अनेक महिने चालू शकतात, तर युद्धे (बॅटल्स) काही दिवस चालतात. पाण्यात मोहीम बरेच दिवस चालू शकते पण प्रत्यक्ष लढाई काही तासांत संपते. जमिनीवरील डोंगर, मैदाने, दऱ्या, जंगले यांसारखी पाण्याच्या पृष्ठभागावर भूरूपे (लॅण्ड फीचर्स) नसतात. त्यामुळे पाण्यावरील लढाईत लपण्याची किंवा भूरूपानुसार डावपेच आखण्याची सोय नसते. पाणबुडय़ांच्या शोधानंतर पाण्याच्या पृष्ठभागाखाली लपण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

तोफखाना किंवा रणगाडा दले वगळता भूदल हे बरेचसे मानवी साधनसंपत्तीवर आधारित आहे. नौदल आणि वायुदल ही त्या मानाने अधिक तांत्रिक दले (टेक्निकल सव्‍‌र्हिसेस) आहेत. भूदलाच्या उभारणीत प्रथम सैन्यभरती करून त्यांच्यासाठी शस्त्रखरेदी केली जाते. नौदल आणि वायुदलात प्रथम युद्धनौका आणि विमाने (वेपन्स प्लॅटफॉम्र्स अ‍ॅण्ड अ‍ॅसेट्स) निर्माण करून त्यांच्या भोवताली मनुष्यबळाची उभारणी केली जाते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:23 am

Web Title: different types of weapons part 55
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : आल्फ्रेड नोबेल, डायनामाइट आणि अन्य स्फोटके
2 रसदपुरवठा सुनिश्चित करणारे लष्करी ट्रक 
3 गाथा शस्त्रांची : हमर, कुगर आणि सुरुंगरोधी वाहने
Just Now!
X