सोव्हिएत युनियनचे वैमानिक व्हिक्टर प्युगाचेव्ह यांनी १९८९ मध्ये पॅरिसजवळील हवाई कसरतींमध्ये विद्युतवेगाने आकाश चिरत जाणारे सुखोई-२७ निमिषार्धात हवेत सरळ उभे राहिल्यासारखे थांबवले आणि पुन्हा सरळ करून पुढे नेले. या स्थितीत विमान नागाने फणा काढल्यासारखे भासते.  प्युगाचेव्ह यांनी ही कसरत करून दाखवली तेव्हा पाश्चिमात्य निरीक्षकांना ही बाब कळून चुकली होती की सुखोई-२७ ने चपळाईची (मनुव्हरेबिलिटी) व्याख्या बदलून टाकली आहे. हा प्रकार प्युगाचेव्ह कोब्रा म्हणून ओळखला जाऊ लागला. तो जगात केवळ सुखोई २७/३०, मिग-२९ आणि अमेरिकी एफ-२२ राप्टर हीच विमाने करू शकतात. कसरतींत तो चित्तथरारक वाटला तरी प्रत्यक्ष हवाई युद्धात (डॉगफाइट्स) जीव वाचवणारा ठरतो. समजा शत्रूचे विमान सुखोईचा पाठलाग करत असेल, तर सुखोई अशा प्रकारे काही क्षण थांबून फणा काढून उभे राहते. तेवढय़ा वेळेत शत्रूचे विमान पुढे निघून गेलेले असते आणि सुखोई त्याच्या मागे येऊन त्याला पाडण्यास सज्ज असते.

अमेरिकेच्या एफ-१५ आणि एफ-१६ या विमानांना टक्कर देण्यासाठी सोव्हिएत युनियनने १९७० च्या दशकात मिग-२९ आणि सुखोई-२७ या विमानांची निर्मिती केली. थोडय़ा लहान आकाराच्या मिग-२९ ला पूरक भूमिकेसाठी लांब पल्ल्याचे एअर सुप्रिमसी इंटरसेप्टर म्हणून सुखोई-२७ ची रचना केली होती. त्याचे पंख फ्युजलाजशी जवळपास एकरूप झालेले आहेत. या रचनेला हायब्रिड किंवा स्ट्रेक विंग्ज म्हणतात. त्याने विमानाला हवेत चांगला उठाव (लिप्ट) मिळतो. तसेच त्याला शेपटाकडे उभे दोन फिन्स आहेत. सुखोई-३० या आवृत्तीत कॉकपिटजवळ फ्युजलाजवर आणखी दोन लहान पंख (कॅनार्ड) आहेत. त्यांनी विमानाला हवेत चांगले संतुलन मिळते.

सुखोईची दोन शक्तिशाली सॅटर्न किंवा ल्युल्का टबरेफॅन इंजिने त्याला ताशी २५०० किमी (माक २.३) इतका वेग मिळवून देतात. त्याच्या मोठय़ा आकारामुळे त्यात अधिक इंधन मावते आणि त्याला ३६०० किमीचा पल्ला लाभतो. त्याचे जेट एक्झॉस्ट किंवा नोझल ३६० अंशांत कोठही फिरवता येतात. त्याला थ्रस्ट व्हेक्टरिंग म्हणतात. त्याने विमान कमी जागेत पटकन वळवता येते. ते एका मिनिटात ६० हजार फूट उंची गाठते. या खुबींमुळे आकार मोठा असूनही सुखोई अत्यंत चपळ विमान आहे. याशिवाय अत्याधुनिक रडार, इलेक्ट्रॉनिक आणि संगणकावर आधारित नियंत्रण प्रणाली, कॅनन, हवेतून हवेत आणि जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आदींमुळे सुखोई जगातील अत्यंत संहारक आणि आघाडीचे लढाऊ विमान बनले आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com