News Flash

मूर्तिमंत गणेश

गणेशाची रूपे वेगवेगळ्या मूर्तीमध्ये, मंदिरांमध्ये, गडकिल्ल्यांमध्ये पाहायला मिळतात

मूर्तिमंत गणेश

– आशुतोष बापट
response.lokprabha@expressindia.com

‘बाप्पा’ म्हणून लाडाने हाक मारल्या जाणाऱ्या ‘वक्रतुंडा’चा प्रवास केवळ भारतातच नव्हे अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या रूपांत झाला आहे. गणेशाची रूपे वेगवेगळ्या अवतारांमध्ये, आख्यायिकांमध्ये, मूर्तीमध्ये, मंदिरांमध्ये, गडकिल्ल्यांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. अशा देखण्या आणि आकर्षक मूर्तीचा हा लेखाजोखा..

देवा तूची गणेशु, सकळ मति प्रकाशु।

म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी ।।

वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी असे आवाहन केले आहे. त्याचे सुखकर्ता, विघ्नहर्ता हे स्वरूप आणि मनामनात असलेले स्थान पाहता कशाचाही प्रारंभ करताना  गणपतीची पूजा केली जाते. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यांच्या काळात फारशी माहिती नसलेला हा देव तुलनेने काहीशा उशिराच देवतासंप्रदायात समाविष्ट झाला आहे. त्याच्या प्राचीन अस्तित्वाचे तुटक तुटक संदर्भ साहित्यातून सापडतात. तरीही हा देव तसा नंतरच्या काळात प्रकट झालेला दिसतो. परंतु असे असले तरीही लोकप्रियतेच्या बाबतीत इतर कुठल्याही देवतांपेक्षा गणपती हा सर्वाधिक लोकप्रिय असलेला देव आहे. त्यामुळेच की काय ‘बाप्पा’ हे प्रेमळ नामाभिधान फक्त याच देवाला प्राप्त झालेले दिसते.

साहित्यात उल्लेख येत असले तरीही मूर्तीमध्ये गणपतीचे अंकन काहीसे उशिरा झालेले दिसते. या देवतेच्या उद्याचा प्रवास हा हत्तीमुखी देवता, यक्ष, विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असा खूप मोठा आणि अर्थातच रंजक असा आहे. पण तो एक वेगळा विषय झाला. गणपती या देवतेच्या मूर्ती आपल्याला गुप्तकाळापासून प्रकर्षांने दिसायला लागतात. स्वतंत्र मूर्ती निर्माण होण्याआधी ही देवता नाण्यांवर अंकित झालेली पाहायला मिळते. बहुसंख्य इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यांवर हत्तीचे चित्र दिसून येते. त्या प्रदेशात हत्ती पवित्र प्राणी मानला जात असावा आणि नाणी सामान्य जनतेसाठी असल्यामुळे हत्तीचे चित्र दाखवले असावे असे तज्ज्ञांचे मत आहे. हत्ती या पवित्र प्राण्याचा देवत्वाकडे जाणारा प्रवास असा सुरू झालेला असावा. ग्रीकांनी मानव आणि घोडा यांचे केलेले मिश्ररूप ‘सेंटॉर’ या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी इ. स. पूर्व ५०च्या सुमारास इंडो-ग्रीक राजा हम्रेस याच्या नाण्यावर हत्तीला मानवी रूप दिलेले दिसते.

पुढे पुराणकाळात गणेश जन्माच्या विविध कथा दिलेल्या आहेत. त्यातली पार्वतीने अंगच्या मळापासून मुलगा निर्माण करणे, मग शिवाकडून त्याचा शिरच्छेद, नंतर हत्तीचे डोके आणून त्याला जोडणे ही कथा तर सर्वश्रुत झालेली आहे. पवित्र प्राण्यापासून ते त्याला देवत्व प्राप्त होण्याचा गणपतीचा प्रवास हा असा रंजक पद्धतीने पुढे सरकत जातो आणि पुढे हा देव मूर्तीमधून प्रकट झालेला दिसतो. सुरुवातीला या मूर्ती बौद्ध स्थापत्यात ‘गजमुखी यक्ष’ म्हणून दिसू लागतात. त्यानंतर गणपतीच्या अतिप्राचीन मूर्ती इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील कुषाणकाळातील आहेत. मथुरेला यमुनेच्या पात्रात सापडलेली मूर्ती ही लालसर दगडात कोरलेली आहे. ती द्विभुज असून डाव्या हातात मोदकपात्र आहे. देव तुंदिलतनू असून गळ्यात जानवे दिसते. मूर्तीचे पाय मात्र भग्न झालेले आहेत. अशाच काही मूर्ती मथुरेच्या संग्रहालयात आहेत. ज्या त्याच काळातल्या समजल्या जातात. गणेशाची मूíतपूजा कुषाणकाळात सिंधू नदीच्या खोऱ्यात सुरू होऊन पुढे गंगा-यमुनेच्या खोऱ्यात आली असावी.

गुप्तकाळात गणेशाच्या मूर्ती मंदिरात बसवायला सुरुवात झालेली दिसते. भुमरा, देवगड या ठिकाणी गणेशाच्या मूर्ती दिसू लागतात. तो आता दोन हातांचा यक्ष नसून रीतसर चार हातांचा देव झालेला प्रकर्षांने जाणवतो. इथे गणपतीला हत्तीचे नसíगक डोके आहे. त्यावर मुकुट किंवा इतर अलंकार दिसत नाहीत. जवळपास सर्वच गणपती डाव्या सोंडेचे आहेत. उदयगिरी इथला गणपती दोन हातांचा असला तरीसुद्धा आता चार हातांच्या मूर्ती दिसू लागल्या आहेत. याच काळात अफगाणिस्थानमधे दोन गणेश प्रतिमा मिळालेल्या आहेत. त्यापकी एकीवर शाही राजा िखगल याच्या वेळचा लेख लिहिलेला दिसतो. या प्रतिमेला ‘महाविनायक’ असे नाव दिलेले आहे. हा दोन हातांचा असून सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. याचे हात मात्र भग्न झालेले आहेत. त्यानंतर चालुक्यांच्या बदामी इथल्या शैव लेणीत आपल्याला गणपतीचे दर्शन होते. इथेदेखील देव दोनच हातांचा आहे. उजवा हात अभयमुद्रेत असल्यासारखा आहे तर डाव्या हातात लाडू असून त्यावर त्याची सोंड टेकवलेली आहे. गळ्यात माळा असून त्याच्या पायाशी दोन गण नाचताना दिसतात. त्याचे वाहन उंदीर मात्र इथे दिसत नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या वेरुळ इथल्या लेणीत आपल्याला गणेशाचे जे दर्शन होते ते निरनिराळ्या रूपांत होते. रामेश्वर लेणीत तो शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगी उपस्थित असलेला दिसतो. इथे तो शिवाचा गण म्हणून येतो असे अभ्यासक सांगतात. नंतरच्या कैलास लेणीत आपल्याला गणेशाचे दर्शन अगदी प्रवेश केल्याकेल्याच होते. कैलास लेणीत प्रवेश केल्यावर लगेच डावीकडे आपल्याला तुंदिलतनू गणपती दर्शन देतो. याच लेणीत वरच्या मजल्यावर आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्या प्रदक्षिणा मार्गावर पुन्हा एकदा बाप्पा दिसतात. तर कैलास लेणीत असलेल्या यज्ञशाळेत गणपती हा सप्तमातृकांसोबत शिल्पांकित केलेला आहे.

गुप्तोत्तर काळात गणपतीची लोकप्रियता कमालीची वाढली हे त्याच्या निर्माण झालेल्या विविध मूर्ती आणि पुराणातील उल्लेखावरून दिसून येते. याचा परमोच्च आविष्कार आपल्याला ९-१० व्या शतकात पाहायला मिळतो. कारण याच काळात गाणपत्य पंथ अस्तित्वात आला आणि त्याला शिव आणि विष्णूच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झाले. इतकेच नाही, तर त्याच काळात ‘गणेशपुराण’ आणि ‘मुद्गलपुराण’ रचली गेली. त्यातल्या कथेत तर शिवसुद्धा गणेशाचा भक्त झाला असे सांगितले गेले. त्रिपुरासुरवधाच्या वेळी शिवाने गणपतीचे साहाय्य मागितले आणि पुढे शिव विजयी झाला, असे उल्लेख गणेशपुराणात आहेत. गणेशाचे महत्त्व असे वाढत जाऊ लागल्यावर त्याच्या निरनिराळ्या मूर्ती निर्माण होऊ लागल्या. त्या मूर्ती कशा असाव्यात याचे वर्णन वराहमिहीराच्या बृहत्संहितेत दिलेले आहे.

रथमाधिपो गजमुख प्रलंबजठरकुठारधारी स्यात्।

एक विषाणो बिभ्रमूलककन्दम् सुनील दल कन्दम्।।

गणेश प्रतिमांची संख्या आणि प्रकार वाढत गेले. मूर्तीची विविधता वाढू लागली. गणपती ही एक प्रमुख देवता झालेली दिसते. आणि त्यानुसार मग मंदिरांच्या दरवाजाच्या माथ्यावर गणपतीचे शिल्पांकन केले जाऊ लागले. त्या भागाला ‘गणेशपट्टी’ असेच संबोधले जाऊ लागले. सर्व कलांचे आधिपत्य गणपतीकडे असल्याचे समजले जाऊ लागले. नृत्य या कलेत तो निपुण आहे हे सांगण्यासाठी नृत्य गणेशाच्या अप्रतिम प्रतिमा मंदिरांवर कोरल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मरकडा देवळावर अशाच नृत्य गणेशाची अतिशय देखणी मूर्ती आहे. अतिशय देखणी अशी ही मूर्ती आठ हातांची आहे. वरच्या दोन हातांत नाग धरलेला असून उरलेल्या हातात परशू, दंत, कमळ आणि बीजपूरक दिसते. उजवा एक हात नृत्यमुद्रेत आहे. गळ्यात सर्पाचे यज्ञोपवित परिधान केलेला देव तल्लीन होऊन नृत्य करताना दिसतो आहे. पायाशी दोन वादक दिसतात. इतकी देखणी मूर्ती क्वचितच कुठे बघायला मिळेल.

होयसळ राजवटीत बांधली गेलेली शिल्पसमृद्ध मंदिरे म्हणजे बेलूर, हळेबिडु आणि सोमनाथपूर इथली मंदिरे ही कर्नाटकात होयसळ राजवटीत बांधली गेलेली अतिशय सुंदर आणि शिल्पसमृद्ध मंदिरे आहेत. यापकी हळेबिडु इथल्या मंदिरावर अशीच अतिशय देखणी नृत्यगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. होयसळांच्या वैशिष्टय़ांनुसार ही मूर्ती दागिन्यांनी अक्षरश: सजलेली दिसते. सोनार जसे सोन्यात बारीक कलाकुसरीचे काम करेल असे काम इथे शिल्पकारांनी दगडात केलेले आहे. होयसळ राजवटीत बांधलेल्या मंदिरांवर केलेली अतिशय बारीक कालाकुसरयुक्त मूíतकाम हेच वैशिष्टय़ होते. इथेही गणपती नृत्य करतो आहे. इथेही त्याच्या हातात नाग असून उर्वरित हातात दंत, परशू दिसतो, दोन हात नृत्यमुद्रेत आहेत.  आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे गणेशाने सोंडेत कमळ धरलेले दिसते. नृत्यमुद्रेतील अजून एक आकर्षक अशी ही मूर्ती आहे.

गणपतीच्या काही निराळ्या मूर्तीमध्ये ‘वैनायकी’ रूपातल्या मूर्तीचा उल्लेख करावा लागेल. काहीजण वैनायकी ही गणपतीची शक्ती असल्याचे सांगतात, तर काही अभ्यासकांच्या मते ती गजमुखी शक्ती आहे. मतप्रवाह विविध असले तरी एक आगळीवेगळी मूर्ती आपल्याला पुण्याजवळ असलेल्या भुलेश्वर इथल्या मंदिरावर बघायला मिळते. पुणे सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीची भुलेश्वर रांग. शिवकाळात इथे मुरार जगदेवांच्या काळात दौलतमंगळ नावाचा एक किल्ला उभारला होता. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे त्याला म्हणू लागले दौलतमंगळ. या किल्ल्याचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत, पण इथे असलेले अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगे आहे. यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सूरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचेसुद्धा या मंदिरावर अंकन केलेले आढळते. या सर्व शिल्पाकृतींमधे स्त्रीरूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. हा काय प्रकार आहे? गणपती असा स्त्री रूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली?, असे प्रश्न मनात येणे अगदी साहजिक आहे. पण ही चूक वगरे काही नाही. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूíतरूपात दाखवायची असेल तर ती स्त्री रूपात दाखवतात. सप्तमातृका हे पण त्याचेच प्रतीक आहे. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाने मदतीसाठी देवांना त्यांच्या शक्ती मागितल्या. देवांनी त्या शक्तीयुद्धात मदत करण्यासाठी शिवाला दिल्या होत्या. त्यांचे शिल्पांकन करताना स्त्री प्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवाची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेले आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. अशीच एक प्रतिमा बीड जिल्ह्यतल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाडय़ात अशीच एक गणेशीची मूर्ती आहे.

गुप्तोत्तर काळात तांत्रिक पंथाचा उगम झाला. गणेशाला त्यातही स्थान मिळाले. तांत्रिक परंपरेत मुळात शक्तीची, शक्तिदेवतांची उपासना होते. तांत्रिक विधी, आचार यांनी युक्त असा तंत्रमार्ग इथेही अनुसरला जाऊ लागला. पंच मकार हे त्यांचे अजून एक वैशिष्टय़ आहे. बौद्ध धर्मातसुद्धा पुढे या तंत्रामार्गाने प्रवेश केलेला दिसतो. याच तांत्रिक परंपरेत काही निराळ्या गणेशमूर्ती निर्माण झालेल्या दिसतात. त्यातली एक म्हणजे उच्छिष्ट गणेशाची मूर्ती. उच्छिष्ट गणपतीचे रूप हे तांत्रिकांच्या वामाचारी पंथाचे रूप आहे. त्यात गणेश आणि त्याची शक्ती क्रीडा करताना शिल्पित करतात. मराठवाडय़ात असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर अशीच एक उच्छिष्ट गणेशाची मूर्ती त्याच्या शक्तीसह शिल्पांकित केलेली पाहायला मिळते. देवाला अधिक प्रबळ, शक्तिशाली दाखवण्यासाठी त्याच्या हातांची संख्या वाढत गेली. गणपतीच्या बाबतीत त्याच्या तोंडाची संख्या वाढत गेल्याचे दिसते. त्या मूर्तीना मग महागणपती, हेरंब अशी नवे प्राप्त झालेली दिसतात.

अशीच एक सुंदर मूर्ती पुण्यात आहे. त्रिशुंड गणपती या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मूर्तीला तीन सोंडा आहेत. गणपती मोरावर बसलेला असून त्याच्या हातात विविध आयुधे दिसतात. त्याच्या मांडीवर त्याची शक्ती बसली असून एका सोंडेने तो तिच्या हनुवटीला स्पर्श करताना दिसतो. या मंदिरावर सुंदर कोरीव काम केलेले दिसते. गणपतीची लोकप्रियता भारताच्या बाहेरही गेलेली दिसते. चीन, जपान, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया या देशांतसुद्धा गणपतीच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. याचाच अर्थ तिथपर्यंत या देवाची कीर्ती पोचलेली होती आणि अर्थात त्याची उपासनासुद्धा होत होती. कंबोडियात थायलंड देशाच्या सीमेला लागून एका डोंगरावर शिखरेश्वर मंदिर आहे. त्याला स्थानिक भाषेत ‘प्रे-विहार’ असे म्हणतात. या मंदिरात गणपतीची मूर्ती दिसते. तिथले लोक त्याला बुद्धाचे एक रूप म्हणून पुजतात. परंतु, ती गणपतीची मूर्ती आहे. उजव्या हातात मुळा असावा, तर डाव्या हातात प्रसादपात्र असून त्यावर सोंड टेकवलेली आहे. डोक्यावर तिथल्या पद्धतीचा मुकुट दिसतो. भारतापासून इतक्या लांब आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती पाहून खूपच छान वाटते. बौद्ध धर्मात तसाही गणपती हा बुद्धाचा सेवक म्हणून दाखवला जातो. तो तिथे यक्ष म्हणूनच येतो. परंतु जैन धर्मात तसे नाही. तिथे गणपतीला विघ्नहर्ता रूपात स्थान मिळाले.  जैन धर्मीय गणेशाची मूर्ती नाशिक जिल्ह्यातील अंकाई-टंकाई इथल्या लेणीत कोरलेली दिसते.

सुखकर्ता-दु:खहर्ता असलेल्या या देवाला पुढे सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळालेला दिसतो. संकटे त्याला शरण येतात, या त्याच्या शक्तीमुळे मध्ययुगीन काळात किल्ले बांधणी करताना सर्वत्र गणपतीची प्रतिष्ठापना प्रत्येक किल्ल्यावर केलेली दिसते. तो कधी दरवाजावर येतो तर कधी किल्ल्यात प्रवेश करताना त्याचे शिल्पांकन केलेले दिसते. राजगडसारख्या किल्ल्यावर तो सुवेळा माचीवर कोरलेला दिसतो, तर कधी हरिश्चंद्रगडावर दिसतो. कधी तो मोरयाचा धोंडा या रूपात मालवणला दिसतो, तर कधी दातेगडावर तो दरवाजातून आत आल्यावर मोठय़ा देवकोष्ठात विराजमान झालेला दिसतो. इथे त्याचे रूप फार सुंदर आहे. त्याचे कान खरोखर सुपासारखे बघायला मिळतात. आणि पुढे अष्टविनायक उपासनेत तर त्याच्या मूर्तीपेक्षा त्याचे तिथले अस्तित्व हेच भक्तांसाठी महत्त्वाचे असते. अष्टविनायकातील कुठल्याच ठिकाणी गणपतीची घडवलेली मूर्ती नाही. परंतु भक्तांना त्यांच्या श्रद्धेमुळे दगडातही देव दिसतो हे आपल्याला अष्टविनायकांना गेल्यावर दिसते.

अत्यंत लोकप्रिय आणि अतिशय लाडके असे दैवत असलेल्या गणेशाची रूपे खरंतर प्रचंड संख्येने आहेत. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह आहे. आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’, अशी अवस्था भक्तांची होते. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नराश्य पळून जाते. इतर कुठल्याही देवांपेक्षा गणपती हा प्रत्येकाला आपला सखा वाटतो, जवळचा मित्र वाटतो. म्हणूनच त्याला त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु:, त्वं अग्नी, त्वं इंद्र असे म्हटलेले आहे. हे सगळे देव किंवा ती तत्त्वे या एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत अशी भक्तांची पक्की धारणा आहे. ओंकारप्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असे तुकोबारायांनी गणेशाबद्दल म्हटले आहे. या प्रेमापोटीच गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती घडवल्या गेल्या असणार जेणे करून त्याची निरनिराळी रूपे भक्तांच्या सतत समोर राहावीत, अशीच त्या शिल्पकारांची भावना झाली. म्हणूनच त्यांनी आपल्या कलेद्वारे मूíतमंत गणेश आपल्यासमोर विविध रूपांत उभा केला.

संदर्भ:
१) श्रीगणेश-आशियाचे आराध्य दैवत, डॉ. म. के. ढवळीकर

२) भारतीय मूíतशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 6:18 pm

Web Title: ganesh temples in different forts in maharashtra scsg 91
Next Stories
1 Video : स्मिता तांबेने साकारला ‘ट्री-गणेशा’
2 ‘या’ कारणामुळे कपूर कुटुंबीय साजरा करणार नाहीत गणेशोत्सव, ७० वर्षांची परंपरा होणार खंडित
3 जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापना करण्याचा विधी आणि मुहूर्त
Just Now!
X