घरचे मैदान आणि चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा काय किमया करू शकतो याचा प्रत्यय घडवत कोलकाता नाइट रायडर्सने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सवर सात विकेट्सनी विजय मिळवला. दोनच दिवसांपूर्वी चेन्नईत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे कोलकाताला चेन्नईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यातील चुका टाळत रॉबिन उथप्पाने सूत्रधाराची भूमिका निभावत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  ४४ वर्षीय ब्रॅड हॉगची फिरकी आणि आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी कोलकाताच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर आणि उथप्पा यांनी ३३ धावांची सलामी दिली. मोहित शर्माने गंभीरचा (१९) अडसर दूर केला.  पवन नेगीने मनीष पांडेला (३) झटपट बाद केले. आयपीएल पदार्पण करणाऱ्या रोनित मोरेने सूर्यकुमार यादवला दोन धावांवरच माघारी धाडले. एका बाजूने सहकारी बाद होत असताना उथप्पाने चिवटपणे खेळ करत डाव सावरला. २८ धावांवर असताना धोनीने उथप्पाला यष्टीचीत करण्याची संधी सोडली. आशिष नेहरानेही स्वत:च्या गोलंदाजीवर उथप्पाचा झेल सोडला. जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवत उथप्पाने सुरेख खेळी साकारली. ड्वेन ब्राव्होच्या पहिल्या षटकात १२ तर नेहराच्या शेवटच्या षटकात १५ धावा लुटत उथप्पा-रसेल जोडीने कोलकाताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. रसेलने उथप्पाला तोलामोलाची साथ देत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. उथप्पाने ५८ चेंडूत ८०, तर रसेलने ३२ चेंडूत ५५ धावा केल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १६५ धावांची मजल मारली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने ड्वेन स्मिथला बाद केले. तरीही ब्रेंडन मॅक्क्युलमने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. ४४ वर्षीय हॉगने मॅक्क्युलमला पायचीत केले, त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांसह १२ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. मॅक्क्युलम पाठोपाठ फॅफ डू प्लेसिसही (२०) तंबूत परतला. पीयूष चावलाने धोनीला त्रिफळाचीत करत चेन्नईची अवस्था ५ बाद ७२ अशी केली. ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने ब्राव्होला (३०) बाद करत ही जोडी फोडली.  ब्रॅड हॉगने एकाच षटकात जडेजा आणि नेगीला बाद केले. जडेजाने २४ तर नेगीने २७ धावांची खेळी केली. कोलकाता नाइट रायडर्सतर्फे ब्रॅड हॉगने २९ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ९ बाद १६५ (ब्रेंडन मॅक्क्युलम ३२, ड्वेन ब्राव्हो ३०; ब्रॅड हॉग ४/२९)  पराभूत विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : १९.५ षटकांत ३ बाद १६९ (रॉबिन उथप्पा नाबाद ८०, आंद्रे रसेल नाबाद ५५; मोहित शर्मा १/२२) सामनावीर :  आंद्रे रसेल