प्लेऑफ गटातील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ३० धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुचे आव्हान १३४ धावात संपुष्टात आले.

एबी डिव्हिलियर्स (५३) आणि पार्थिव पटेल (३३) या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. राजस्थानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुने दमदार सुरुवात केली होती. आठ षटकात बंगळुरुच्या एक बाद ७४ धावा होत्या. पण पार्थिव पटेल बाद झाला आणि बंगळुरुचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि १३४ धावात आव्हान संपुष्टात आले.

श्रेयस गोपाळने उत्तम गोलंदाजी करत चार षटकात १६ धावा देत चार गडी बाद केले अन्य गोलंदाजांनी त्याला योग्य साथ दिली. त्यामुळे राजस्थानला अजिंक्य विजय मिळवता आला. आयपीएलमधील ५३व्या सामन्यात आज बंगळुरूविरुद्ध राजस्थान रॉयल्सने ५ बाद १६४ धावा केल्या होत्या.

सलामीवीर राहुल त्रिपाठीने तुफान फलंदाजी करत ५८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद ८० धावा केल्या. मात्र जोस बाटलरच्या अनुपस्थितीत सलामीला आलेला जोफ्रा आर्चर भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने राहुलला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. रहाणे ३३ धावांवर बाद झाला. पाठोपाठ संजू सॅमसनही पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्यामुळे राजस्थानची अवस्था १ बाद १०० वरून ३ बाद १०१ झाली.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू हेन्रीच क्लासें याने राहुलच्या साथीने डाव सावरला. त्याने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३२ धावा केल्या. क्लासें बाद झाल्यावर आलेल्या गौथमने ५ चेंडूत १४ धावांची फटकेबाजी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर तोही धावबाद झाला. उमेश यादवने ३ तर मोहम्मद सिराजने १ गडी बाद केला.

दरम्यान, राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. १३ सामन्यांत प्रत्येकी सहा विजयांसह गुणतालिकेत हे दोन्ही संघ अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाचे बाद फेरीतील तिकीट जवळपास निश्चित मानले जाणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

आजच्या सामन्यासाठी संघ –

राजस्थान संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, क्लासें, स्टुअर्ट बिन्नी, कृष्णप्पा गौथम, जोफ्रा आर्चर, एस. गोपाल, ईश सोढी, जयदेव उनाडकट, बेंजामिन लाफलीन

बंगळुरू संघ – पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डी व्हीलियर्स, मोईन अली, मनदीप सिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, एस खान, उमेश यादव, टीम साऊदी, मोहम्मद सिराज, युझवेन्द्र चहल