राजस्थानविरूद्ध शारजाच्या मैदानात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १८४ धावा केल्या होत्या. त्यात शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस यांचा मोलाचा वाटा होता. पण राजस्थानच्या संघाला मात्र १८५ धावांचे आव्हान पेलले नाही. त्यांचा पूर्ण डाव १९.४ षटकात १३८ धावांतच संपुष्टात आला. दिल्लीच्या संघाचा या स्पर्धेतील पाचवा विजय ठरला असून त्यांनी पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. ४ षटकांत २२ धावा देऊन २ बळी टिपणाऱ्या अश्विनला सामनावीर घोषित करण्यात आले.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरू केली होती, पण त्यात त्यांचेच फलंदाज अडकले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला ५ धावांवर तर पृथ्वी शॉला १९ धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल अशी अपेक्षा होती पण तेवढ्यात दिल्लीच्या डावात माशी शिंकली. अय्यर १७ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्याने ५ धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ षटकारांसह ३० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. ५ षटकारांसह २४ चेंडूत त्याने ४५ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने ८ चेंडूत १७ धावांची खेळी करत संघाला १८०पार मजल मारून दिली.

१८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर जोस बटलर १३ धावांत बाद झाला. स्टीव्ह स्मिथने तडाखेबाज खेळीला सुरूवात केली होती, पण तो १७ चेंडूत २४ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि महिपाल लोमरोर झटपट बाद झाले. चांगली सुरूवात मिळालेला मुंबईकर यशस्वी जैस्वाल ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर राहुल तेवातियाने एक बाजू लावून धरली. तर दुसरीकडे अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाल आणि आर्चर स्वस्तात बाद झाले. विजयासाठी आवश्यक धावगती हाताबाहेर गेल्यानंतर तेवातियाही ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि राजस्थानला ४६ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.