आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांमुळे टीकेचं धनी बनलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी संपूर्ण सामन्याच वर्चस्व गाजवत पंजाबच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिलं नाही. वॉटसनने नाबाद ८३ तर डु-प्लेसिसनेही नाबाद ८७ धावांची खेळी केली. या विजयाबरोबरच चेन्नईच्या संघाने गुणतालिकेमध्ये दोन स्थानांनी झेप घेतली आहे तर पंजाबचा संघ गुणतालिकेमध्ये अगदी तळाला गेला आहे. १० गडी राखून विजय मिळवल्यानंतरही चेन्नईचा संघ सहाव्या स्थानावर आहे. मुंबईने पहिले स्थान कायम राखले आहे.

रविवारी (४ ऑक्टोबर २०२०) आयपीएलमध्ये दोन सामने झाले. पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबादवर विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईनेही आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबला पराभूत केलं. या दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. मुंबईने पाच सामन्यांमध्ये तीन तर दिल्लीने चार सामन्यांमध्ये तीन विजय मिळवले आहेत. मात्र मुंबईची धावगती ही दिल्लीपेक्षा सरस आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आहे. विराट कोहलीच्या बंगळुरु संघानेही तीन विजय मिळवले असले तरी त्यांची धावगती नकारात्मक म्हणजे उणे आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता, पाचव्या स्थानावर राजस्थान, सहाव्या स्थानवर चेन्नई तर सातव्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे. या चारही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यापैकी कोलकाता आणि राजस्थानने एकूण चार सामने खेळले आहेत. तर चेन्नई आणि हैदराबादच्या संघाला आपल्या पाचपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. या चारही संघाचे गुण सारखे असले तरी सरासरी धावगतीच्या आधारे त्यांना गुणतालिकेमध्ये स्थान देण्यात आलं आहे. चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे पंजाबचा संघ पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव झाल्याने तळाशी गेला आहे.


आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.