शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४ गडी राखून विजय मिळवला. मयंक अग्रवालचं धमाकेदार शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक यांच्या बळावर पंजाबने २० षटकात २ बाद २२३ धावा ठोकल्या आणि २२४ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि राहुल तेवातिया यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने ३ चेंडू राखून विजय मिळवला. संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी करत ८० धावा केल्या तर तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार लगावण्याचा धमाका केला.

दरम्यान, पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि राहुल यांनी शतकी सलामी दिली. मयंक अग्रवालने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. त्याने सामन्यात ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर पूरनने ८ चेंडूत २५ धावांची खेळी केली. त्यात ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर पंजाबने २२३ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम करन यांनी १-१ बळी टिपला.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. त्या दोघांनी पंजाबची गोलंदाजी अक्षरश: चोपून काढली. स्मिथ २७ चेंडूत ५० धावा करून बाद झाला. नंतर सॅमसनने फटकेबाजी करत ४२ चेंडूत ८५ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. सॅमसन बाद झाल्यानंतर सामना पंजाबकडे झुकतो असं वाटत असतानाच राहुल तेवातियाने शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात पाच षटकार लगावले. तर दुसरीकडे जोफ्रा आर्चरने शमीला दोन षटकार खेचले. अखेर तीन चेंडू शिल्लक असताना राजस्थानने आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला.