आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली. सलामीच्या सामन्यात चेन्नईने चार वेळच्या विजेत्या मुंबईचा पराभव करत जबरदस्त सुरुवात केली. मात्र, त्यानंतर झालेल्या तिन्ही सामन्यात चेन्नईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तीन वेळा खिताब पटकवणारी धोनीचा चेन्नई संघ पॉईंट टेबलमध्ये तळाला आहे.

२०१४ पासून आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघाने एकदाही सलग तीन सामन्यात पराभव पाहिला नाही. २०२० मध्ये चेन्नई संघाला सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलेय. त्यामुळे गुणतालिकेत चेन्नईचा संघ तळाशी आहे. चार सामन्यात एका विजयासह चेन्नईचे फक्त दोन गुण आहेत. दुसरीकडे पहिला सामना गमावणारा मुंबईचा संघ ४ गुणांसह आणि नेट रनरेटच्या आधारावर अव्वल स्थानावर विराजमान आहे. चार सामन्यात मुंबईला दोन पराभव आणि दोन विजय पाहावे लागलेत. दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा संघ असून त्यांनी तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. गुणतालिकेतील तिसरे स्थान यावेळी कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे आहे. चेन्नईवरील विजयानंतर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानतर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. यावेळी सहावे स्थान विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाकडे आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे.

पाहा पॉईंट टेबल

 

उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी चेन्नई संघाला उर्वरीत १० पैकी ७ सामन्यात विजय मिळवावा लागेल.  दरम्यान, तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही.