वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्सचा भेदक मारा यांच्या जोरावर कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी मात केली. या विजयासह कोलकाताने प्ले-ऑफ्सच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं. नितीश राणा आणि सुनील नारायण यांच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकाताने दिल्लीला १९५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १३५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

विजयासाठी मोठं आव्हान मिळालेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. पॅट कमिन्सने डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं. शिखर धवनही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यात भागीदारी होत होती, पण वरूण चक्रवर्तीने दिल्लीचा डाव उद्ध्वस्त केला. ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर, कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस आणि अक्षर पटेल या ५ फलंदाजांना वरूणे माघारी धाडले. वरूणने आपल्या IPL कारकिर्दीत पहिल्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, अनिल कुंबळे या दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत त्याने स्थान पटकावले. त्यामुळे दिल्लीचा संघ २० षटकात केवळ १३५ धावाच करू शकला.

त्याआधी, , नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत कोलकाताला तीन धक्के दिले. शुबमन गिल (९), राहुल त्रिपाठी (१३) आणि दिनेश कार्तिकचा (३) अडसर लवकर दूर झाला. पण सलामीला आलेला नितीश राणा (८१) आणि मधल्या फळीत संधी मिळालेला सुनिल नारायण (६४) या दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली आणि संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली.