12 August 2020

News Flash

नैराश्याची सुबक नोंदवही (भाग १)

एकटेपणा आणि नैराश्य या अतिशय अंतस्थ, शांत आणि ताकदवान अनुभूती आहेत.

हातात असलेली चित्रपटाच्या पटकथांची कधीही न संपणारी कामे, इतर लिखाणाचे संकल्प आणि प्रकल्प हे चालू असताना माझे मन सध्या नकळतपणे आणि संथपणे एका विषयावर काम करते आहे. तो विषय आहे- एकटेपणा.. Loneliness. मला आजच्या काळात भारतात असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये जगताना, माझ्या पौगंडावस्थेतील जाणिवा संपृक्त होत असल्यापासून, मन आणि बुद्धी हळवेपणापासून ते कणखरपणापर्यंत प्रवास करताना माझ्या मनाला ज्या मूलभूत गोष्टींनी नेहमी सोबत केली आहे, त्या दोन अनुभूती आहेत. पहिली आहे- अतिशय सखोल असलेली एकटेपणाची जाणीव. आणि दुसरा आहे- वारंवार मनाच्या पटलावर तीव्र- मंद लाटांच्या स्वरूपात उमटत राहणारा नैराश्याचा अनुभव. मला या दोन गोष्टींविषयी खोल खोल शिरून त्यांचे जे खरे रूप मला नेहमी दिसत आले आहे आणि अजूनही दिसत राहते, त्याविषयी विस्तृतपणे लिहायचे आहे. त्या गोष्टींना न सजवता.

एकटेपणा आणि नैराश्य या अतिशय अंतस्थ, शांत आणि ताकदवान अनुभूती आहेत. सकारात्मकतेसारख्या दुबळ्या आणि साखरपाणी उपायाला त्या जुमानत नाहीत. या दोन्ही अनुभूती ताकदवान तर आहेतच; पण अनेक वेळा मनाला तीव्र असे झटके देऊन गेल्यानंतर बुद्धीला अपार अशी ऊर्जा देण्याची एक विचित्र शक्ती या दोन्ही अनुभूतींमध्ये आहे. मला लिहायचे आहे ते या अनुभवाबाबत. नैराश्य आणि एकटेपणाचा सखोल आणि शांत अनुभव घेण्यासाठी मनाची तयारी व्हायला अनेक वर्षे जावी लागतात. शरीरात वास्तव्याला असलेल्या काळ्याभोर सापाशी संवाद साधण्यासारखी ती प्रक्रिया आहे. तो साप आपण मरून गेल्यावरच शरीर सोडून जाणार असतो. आपण जिवंत असताना गोळ्या घेऊन त्याला झोपवायचा प्रयत्न केला तर तो आपल्यावर हसून काही काळ झोपायचे नाटक करतो आणि आपण झोपलो की सावकाश पुन्हा शरीरात सरपटू लागतो असा माझा अनुभव आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या कोणत्या प्रकारची जनावरप्रवृत्ती अस्तित्वात असते. सामूहिक कोलाहल आणि संस्कृतीचे खोटे आधार निर्माण करून आपण आपल्यातील जनावर नाकारायचा प्रयत्न करीत असलो तरी ते कधीतरी अचानक आपल्याला एकटे असताना गाठतेच. असे जेव्हा घडते तेव्हा आपण कोण आहोत आणि आतून कसे आहोत, याचा लख्ख, सुंदर आणि पारदर्शी अनुभव आपल्याला येतो. कुणाच्या शरीरात उद्दाम धावता घोडा असतो. कुणाच्या शरीरात सुस्त आणि क्रूर अजगर असते.

एकटेपणा आणि नैराश्य या परस्परपूरक गोष्टी आहेत. त्यांची वेणी गुंफलेली असते. आणि त्यामुळे कुठून आणि कशातून काय सुरू झाले, हे वरवर पाहता लक्षात येणे सोपे नसते. कोणत्याही वैचित्र्याला शांतपणे ओळखून आणि समजावून न घेता घाबरून, वरवरचे उपाय करून ते वैचित्र्य बुजवून टाकणे, ही कौटुंबिक आणि मध्यमवर्गीय जाणिवेच्या माणसाची प्रवृत्ती असते. कोणतेही वैचित्र्य समाज नावाच्या समूहाला चालत नाही. वैचित्र्याला सामावून घेण्याची सुसंस्कृत पद्धत आपल्या धर्माने आणि सामूहिक कर्मठ परंपरांनी आपल्याला शिकवलेली नसते. माणसे एकमेकांना घाबरून जगत बसलेली असतात. मी ज्या सामाजिक वातावरणात लहानाचा मोठा झालो त्यामध्ये ‘लोक काय म्हणतील?’ या गोष्टीचा दबाव सर्व माणसांवर असायचा. त्यामुळे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक वैचित्र्य आपल्या आजूबाजूला उगवलेले असेल किंवा उमललेले असेल तर त्याला नाकारणे हा पहिला टप्पा, लपवणे हा दुसरा टप्पा, आणि चुकीच्या उपायांनी ते फक्त तात्पुरते बुजवून टाकणे हा तिसरा टप्पा. या पलीकडे माझ्या आजूबाजूच्या समाजातील सुशिक्षित म्हणवून घेणारी माणसेसुद्धा कधी जाऊ  शकली नाहीत. नैराश्य आणि एकटेपणा याकडे आपला समाज अतिशय आळसाने आणि मंदबुद्धीने पाहत आला आहे यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. काहीही वेगळे आणि विचित्र असले की त्याला माणसे घाबरतात. आपण घाबरट आणि त्यामुळे क्रूर अशी माणसे आहोत. काळाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आणि आपले पंतप्रधान जसे नेहमीच एकमेकाला साजेसे असतात, तसेच आपण आणि आपल्या समाजातील मानसोपचारतज्ज्ञ एकमेकाला नेहमीच साजेसे असतो. आपण ज्या शाळेत गेलो त्याच शाळेत ते गेलेले असतात. आणि बहुतांशी वेळा आपण ज्या भेळवाल्याकडून भेळ खात असतो तिथेच तेसुद्धा भेळ खात असतात. त्यामुळे समाजाकडे आणि संस्कृतीकडे बघायचा तटस्थपणा- जो कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाला असायला लागतो, तो प्रत्येकाकडे असेलच असे नाही. ती माणसे नेहमीच समाजापेक्षा वेगळी नसतात. त्यांच्यातला एखादाच वेगळा असतो. तज्ज्ञ म्हणवून घेणारी माणसे नवीन काही वाचत नाहीत. प्रवास करीत नाहीत. अनेक वेळा ती स्वत: पारंपरिक आणि जुन्या, कर्मठ विचारांची असतात. या सगळ्याचा सावकाश, पण ठोस परिणाम समाजाच्या वैचित्र्य सामावून घेण्याच्या ताकदीमध्ये होत असतो. ज्या कुटुंबात किंवा ज्या समाजात वैचित्र्याला सामावून घेण्याची ताकद किंवा संस्कृती असते, तिथे एकटेपणा आणि नैराश्य याकडे पाहायची आपापली प्रामाणिक, आपल्याला साजेशी आणि काळानुसार बदलणारी दृष्टी साकारायला मदत होते. माझ्या सुदैवाने मी, माझा मानसोपचारतज्ज्ञ आणि माझे कुटुंब अशा व्यवस्थेचा भाग होतो आणि अजूनही आहोत.

नैराश्य ही सतत शांतपणे वाफाळणारी एक अंतर्गत अवस्था आहे. आणि ती एक सत्य अवस्था आहे. तिला ओळखणे आणि ती समोर आलेली असताना आपला वैचारिक संतुलनाचा प्रवाह आणि दिनक्रम अतिशय शिस्तीने चालू ठेवणे यासाठी एक प्रकारची ताकद आपल्याला कमवावी लागते. ती कमावण्यात काही वर्षे जातात. आपल्या आनंद, सुख आणि समृद्धीच्या ज्या कल्पना किंवा समजुती आहेत त्या सगळ्या परिपूर्ण असल्या तरी शांतपणे नैराश्य आतल्या आत धुमसत असते. बहुतांशी माणसांना त्याची जाणीव नसते. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारात मानसिक नैराश्य हे शारीरिक व्याधींच्या स्वरूपात जन्म घेते आणि त्या माणसाचे लक्ष स्वत:कडे वळवून घेते. आपल्यासारख्या समाजात राहणाऱ्या माणसांना दुखरा पाय कळतो, पण दुखरे मन समजत नाही. अशा बाळबोध माणसांना नैराश्य शारीरिक स्वरूपात आपले दर्शन देते. सखोल नैराश्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने माणसे मरून जातात. नैराश्याच्या स्वरूपाला न घाबरणे आणि ते मान्य करून कोणताही संकोच न बाळगता त्यावर तज्ज्ञाकडे जाऊन उपचार घेणे याला पर्याय नसतो. नैराश्य मान्य करण्यात पारंपरिक मानसिकतेच्या भारतीय स्त्री-पुरुषांचा पुरुषार्थ दुखावला जातो. कारण आपण सगळे कोणत्या ना कोणत्या लढवय्या राज्याची बाळे असल्याने आपण कमकुवत झालो आहोत, हे वय वाढले की कुणी कुणाला सांगत नाही. मला अशी अनेक माणसे माहीत आहेत- जी रडत नाहीत. नैराश्य मान्य करण्यात आपलाच अहंकार दुखावला जात असतो. अनेक माणसांना ही पायरी ओलांडून जाणे इतके अवघड जाते, की ती त्याच अवस्थेत कुढत बसून राहतात आणि वेळ निघून गेली की त्याचे परिणाम मोठय़ा प्रमाणात भोगतात.

मला सकारात्मकतेच्या गोळीने लगेच गाई गाई करायला लावणारा तज्ज्ञ भेटला नाही. त्याने मला एक-दोन बैठकांमध्ये ओळखले असावे. एकदा तो म्हणाला की, तुझे अजून दही लागते आहे. अजून ते लागायला वेळ आहे. थंडीच्या दिवसात जसा लागतो, तसा. त्यामुळे तुला सहन करावे लागेल आणि धीर धरावा लागेल. तो असे म्हणाला त्याला वीसएक वर्षे झाली असतील. पण माझ्या मनातून ती गोष्ट कधी गेली नाही. मला माझ्या भाषेत कुणीतरी सांगणारे भेटले होते. अशी व्यक्ती- जी माझी नातेवाईक, धर्मगुरू, पालक, मित्र कुणीही नव्हती. ती एक तरुण तज्ज्ञ व्यक्ती होती- जी मला कोणत्याही प्रकारे मी तिच्यावर अवलंबून राहावे किंवा तिची सवय लागावी यापासून प्रवृत्त करीत होती. मला तो मुलगा भेटला याचे फार बरे वाटले, कारण तो मुलगा एरवी फक्त वयाने लहान असलेल्या  मुलांचा मानसोपचारतज्ज्ञ आहे. लहान मुले, कलाकार, खेळाडू यांची मने त्याला वाचता येत असावीत. न घाबरता, न संकोच बाळगता आणि कोणतीही खोटी आश्वासने न देता त्याने मला स्वत:च्या अस्वस्थ मनाकडे बघायची आणि त्या मनाला हाताळायची एक दृष्टी दिली. माझ्या मनावर तो काम करतो आहे, त्यापेक्षा जास्त आणि सतत काम माझे मला करायला लागणार आहे याची सवय त्याने मला लावली. स्वतंत्र बनवले. नैराश्याची ऊर्जा मी सर्जक कामाकडे वळवायला लागलो. वेगाने लिहायला लागलो. मी आता चाळीस वर्षांचा होताना माझ्या मनातील नैराश्याला ओळखून त्याला हाताळायला फार काळजीपूर्वक शिकलो आहे. सकारात्मकतेने नाही. कारण त्या आध्यात्मिक शब्दाने सापाला हाताळता येणार नाही.

(क्रमश: )

सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2017 1:43 am

Web Title: articles in marathi on loneliness
Next Stories
1 ‘कंपनी’ सरकार!
2 आपल्या जाणिवेचा लेखक
3 श्रद्धांचे प्रश्नोपनिषद
Just Now!
X